आजपर्यंत कित्येकांनी ज्या पदार्थाच्या मोहापायी स्वत:चे हात, पाय.. तर कधी जीवही गमावले किंवा कधी काहींनी तुरुंगवासही भोगला, तो पदार्थ म्हणजे ‘सुवर्ण’ किंवा ‘कांचन’! कांचनमृगाचा मोह तर सीतेलाही आवरला नव्हता.. आणि या साऱ्यामागे आहे ‘सुवर्ण’ किंवा ‘सोन्या’चं देखणेपण! परंतु ‘सोनं’ या मूलद्रव्याला महत्त्व प्राप्त होण्यासाठी त्याचं ‘देखणेपण’ हा एवढाच गुणधर्म कारणीभूत नाही; तर त्यासाठी कारणीभूत आहे त्याचं रसायनविज्ञान!

आवर्तसारणीमधल्या संक्रामक मूलद्रव्यांच्या गटातलं सोनं हे ७९ अणुक्रमांकाचं मूलद्रव्य. पण ते त्याच्या गटातल्या बाकीच्या मंडळींइतकं क्रियाशील नाही. अतिशय कमी क्रियाशील असल्यामुळेच, बऱ्याचदा निसर्गत: सोनं ‘शुद्ध’ स्वरूपात सापडतं. काही नदय़ांच्या खोऱ्यांमध्ये किंवा काही खडकांमध्ये शुद्ध सोन्याच्या ‘लगडी’ आढळतात. काही वर्षांपूर्वी, आजपर्यंतची सर्वात मोठी म्हणजे ११२ किलो वजनाची लगड ऑस्ट्रेलियात मिळाली होती. सोन्यावर हवेचा, पाण्याचा, अल्कलींचा आणि बऱ्याचशा आम्लांचा, जवळपास काहीही परिणाम होत नाही. म्हणूनच तर अनेक वास्तूंच्या कोरीव कामामध्ये, हजारो वर्षांपूर्वी वापरलं गेलेलं सोनं आजही त्याच तेजाने झळाळतंय! अनेक वर्ष अत्यंत स्थिरतेने टिकून राहण्याच्या ‘सोन्या’च्या गुणधर्मामुळेच बहुधा कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला किंवा कोणत्याही महत्त्वाच्या घटनेला ५० वर्ष झाली की ‘सुवर्ण महोत्सव’ साजरा केला जात असावा.

जीओलो (Geolo) म्हणजे पिवळे.. यावरून या मूलद्रव्याला ‘gold’ हे नाव पडलं. लॅटिन भाषेत ‘ऑरम (Aurum)’ म्हणजे सूर्योदयाच्या वेळचं सूर्याचं तेज; म्हणून सोन्याचं एक नाव ‘ऑरम’ असंही आहे आणि त्यामुळेच त्याची संज्ञा आहे ‘Au’!

फार पुरातन काळापासून ‘सोनं’ वापरलं जात आहे. १९७२ साली बल्गेरिया इथं झालेल्या उत्खननात, इसवी सनपूर्व ४७०० मध्ये वापरल्या गेलेल्या सोन्याच्या अनेक वस्तू सापडल्या. एकूणच जगभरातल्या अनेक ठिकाणी ४ ते ५ हजार वर्षांपूर्वीचे सोन्याचे दागिने आणि काही कलाकुसरीच्या वस्तू आढळलेल्या आहेत. आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये मिळून दरवर्षी २५०० ते ३००० टन सोनं खाणींमधून बाहेर काढलं जातं. बहुतांशी सोन्याचा उपयोग हा दागदागिने तयार करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आणि अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू किंवा काचा बनवण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत, भारत देश जास्तीत जास्त सोनं खरेदी करणारा एकमेव देश ठरत आहे; जिथं जगातल्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सोन्याच्या २० टक्के सोनं खरेदी केलं जातं.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org