02 March 2021

News Flash

कुतूहल : गुटेनबर्गचा छापखाना

या काळात मेसोपोटेमियामध्ये (आजचा इराक) मातीच्या ग्रंथावर मोहोर उमटविण्यासाठी दंडगोलाकृती मुद्रांचा वापर केल्याचे आढळून येते.

(संग्रहित छायाचित्र)

 शशिकांत धारणे

छपाईचे मूळ इ.स.पूर्व ३००० सालाच्याही मागे जाते. या काळापासून वेगवेगळ्या पृष्ठभागांवर चित्रे व मजकूर उमटवण्यासाठी विविध प्रकारच्या ठशांचा वापर केला जात असे. या काळात मेसोपोटेमियामध्ये (आजचा इराक) मातीच्या ग्रंथावर मोहोर उमटविण्यासाठी दंडगोलाकृती मुद्रांचा वापर केल्याचे आढळून येते. त्याचप्रमाणे जपान आणि इजिप्तमध्ये कापडावर कलाकृती उमटविण्यासाठी ठशांचा वापर करीत. त्यानंतर चीनमध्ये ज्याला छपाईच्या जवळचे तंत्र म्हणता येईल, अशा तंत्राचा वापर इ.स.नंतर दुसऱ्या शतकात कागदाचा शोध लागल्यानंतर सुरू झाला. सुरुवातीला या कागदावरील छपाईसाठी दगडी ठशांचाच वापर केला जाई. सहाव्या शतकापासून चीनमध्ये आणि जपानमध्ये लाकडी ठशांच्या वापराला सुरुवात झाली. मात्र छपाईच्या क्षेत्रातला महत्त्वाचा बदल म्हणजे, एकत्र मजकूर लिहिलेल्या एकाच ठशाऐवजी स्वतंत्र मुद्राक्षरे (टाईप) वापरून केलेले मुद्रण. चीनमधील बाय शेंग याने इ.स. १०४०च्या सुमाराला विकसित केलेल्या या पद्धतीनुसार, माती आणि सरस वापरून बनवलेली मुद्राक्षरे लोखंडी पट्टीवर मेणाच्या साहाय्याने चिकटवली जात व त्यांना शाई लावून त्याद्वारे छपाई केली जात असे.

ज्याला खरेखुरे छपाईयंत्र म्हणता येईल असे पहिले छपाईयंत्र, योहान्नस गुटेनबर्ग याने इ.स. १४४० साली फ्रान्स आणि जर्मनीच्या सरहद्दीवर असणाऱ्या स्ट्राझबर्ग येथे बनविले. यामध्ये त्याने मातीच्या मुद्राक्षरांऐवजी अधिक काळ टिकणारी, मिश्रधातूपासून बनविलेली मुद्राक्षरे वापरली होती. शिसे, अँटिमनी आणि कथील यापासून बनवलेला हा मिश्रधातू कमी तापमानाला वितळत असल्याने, खराब झालेली मुद्राक्षरे टाकून न देता त्यापासून नवी मुद्राक्षरे बनवणे शक्य झाले. चीनमध्ये वापरात असलेली शाई पाण्यात विरघळणारी अशी पातळ शाई होती. न ओघळता मुद्राक्षरांना चिकटून राहू शकेल अशी जाड शाई, अळशीचे तेल आणि काजळी वापरून गुटेनबर्गने स्वत:च बनवली. मुद्राक्षरांवर ही शाई लावल्यानंतर, त्यावर कागद ठेवला जाई. त्यानंतर ही शाई कागदावर व्यवस्थित लागण्यासाठी, एका दट्टय़ाद्वारे या कागदावर दाब देण्याची सोय गुटेनबर्गने आपल्या छपाईयंत्रात केली होती. एक दांडा फिरवून हा दट्टय़ा कागदावर दाबता येत असे. अशा यांत्रिक पद्धतीचा वापर केल्यामुळे, पुस्तकांची छपाई भराभर करणे शक्य झाले. अल्प काळातच युरोपभर लोकप्रिय झालेल्या गुटेनबर्गच्या या छपाईयंत्राने युरोपमधील वाचनप्रियता वाढवण्यास मोठा हातभार लावला.

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:29 am

Web Title: article about gutenbergs print office
Next Stories
1 कुतूहल : कागदनिर्मिती
2 मेंदूशी मैत्री.. : न्युरॉन्सच्या नव्या जुळण्यांसाठी!
3 कुतूहल : चष्म्यावर दृष्टिक्षेप
Just Now!
X