19 October 2019

News Flash

कुतूहल : मानवी उत्क्रांतीची वाटचाल

मानवाची उत्क्रांती ही संपूर्ण पृथ्वीलाच बदलून टाकणाऱ्या प्रजातीची उत्क्रांती आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख

मानवाची उत्क्रांती ही संपूर्ण पृथ्वीलाच बदलून टाकणाऱ्या प्रजातीची उत्क्रांती आहे. तिचा प्रवास समजून घ्यायचा तर तीन कोटी वर्षांपूर्वीपासून चालू असलेल्या घटनाक्रमाचा नेमका शोध घ्यायला हवा. तत्कालीन पृथ्वीवरील हवा हळूहळू थंड होत होती, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होत होते, दाट जंगले कमी होऊन गवताळ प्रदेश वाढू लागले होते. १९७० च्या दशकाच्या अगोदरच्या शास्त्रज्ञांच्या मते, याच सुमारास वानरसदृश जातीपासून मानव उत्क्रांत होत गेला असावा; पण १९६८ सालच्या सुमारास, अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील व्हिन्सेन्ट सॅरीच आणि अ‍ॅलन विल्सन या संशोधकांनी वानर आणि नर यांच्या डीएनएचा अभ्यास करून असे ठाम प्रतिपादन केले की, वानर आणि नर दोन्ही समांतर, परंतु वेगवेगळे उत्क्रांत होत गेले. असे असले तरी मानव, चिम्पान्झी आणि गोरिला यांचा ऐंशी लाख वर्षांपूर्वीचा पूर्वज एकच. आधुनिक चिम्पान्झी आणि मानव यांच्या जीनोममध्ये म्हणजेच संपूर्ण जनुकीय आराखडय़ात आताही ९६ टक्के साम्य आहे. यावरून आपण एकाच पूर्वजाचे वंशज असल्याचे नक्की होते. पुढील संशोधनावरून असेही लक्षात आले की, आपल्या या वंशजांचे वास्तव्य आफ्रिका खंडात होते.

मानवाच्या उत्क्रांतीतले चार महत्त्वाचे टप्पे आहेत – बेचाळीस लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला, दोन पायांवर चालू शकणारा ऑस्ट्रेलोपिथेकस; जमिनीवरच्या जीवनाला पूरक शरीर असणारा, आफ्रिकेच्या बाहेर पडलेला, सुमारे पंधरा लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला होमो इरेक्टस; आजच्या मानवाशी बऱ्याच अंशी साधम्र्य असलेला, तसेच हत्यारांचा, अग्नीचा, कपडय़ांचा वापर करणारा साडेतीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला निअ‍ॅन्डरथल मानव आणि सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी जन्माला आलेला आजचा आधुनिक मानव – होमो सेपियन्स. होमो सेपियन्सच्या उदयाच्या काळातदेखील ‘होमिनीन’ गटातील तीसहून अधिक निरनिराळ्या मानवसदृश प्रजाती एकाच वेळी अस्तित्वात होत्या. आज मात्र फक्त होमो सेपियन्स ही एकमेव प्रजाती शिल्लक राहिली आहे.

या होमो सेपियन्स प्रजातीतल्या, म्हणजे आपल्यापैकीच काही मानवांनी मानवाचा हा रंजक प्रवास जाणून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. यातले पहिले नाव म्हणजे इ.स.पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेला ग्रीकवंशीय हेरोडोटस. मानववंशशास्त्राचा जनक मानल्या गेलेल्या हेरोडोटसच्या काळापासून आतापर्यंत मानव उत्क्रांतीचे कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालूच आहेत आणि त्यातूनच मानवी उत्क्रांतीचे चित्र आपल्यापुढे उभे राहिले आहे.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

First Published on January 2, 2019 1:35 am

Web Title: article about path of human evolution