फुलपाखराची अळी रूपाने बेंगरूळ म्हणायची. मग या अळीपासून सुंदर फुलपाखरू कसे निर्माण होते, हा आबालवृद्धांच्या कुतूहलाचा विषय! अळी अवस्थांतर करत कोषात जाते तेव्हापासून पुढे तिचा घनआहार पूर्णपणे बंद होतो. कोषाच्या आत अळीच्या शरीराचे पूर्णपणे विघटन होते. विघटन झालेल्या शरीराचे विविध खंड तयार करण्याचे काम कोषामधील द्रवामार्फत पार पाडले जाते. मग हे द्रवच खंडांचे विविध पेशीसमूहांमध्ये रूपांतरण करते. प्रत्येक पेशीसमूहाचे वेगवेगळे कार्य असते.

आता हा पेशीसमूह आतील द्रवाच्या संपर्कात येऊन त्यापासून प्रथम उदराचा भाग तयार होतो. या उदरामध्येदेखील पचनसंस्था, श्वसनसंस्था, प्रजननसंस्था यांसारखे व इतर अवयव आकार घेतात. त्यानंतर बाह्य़ अवयव- जसे की पाय, डोळे, सोंड, स्पर्शिका म्हणजेच अँटेना, इत्यादी तयार होतात. मग पंखांवरील छोटय़ा-छोटय़ा तंतुरेखा एकत्र तयार होऊन त्या रेषांमध्ये कोषातील द्रव जाऊन बसतो. फुलपाखराच्या लिंगानुसार पंखांची ठेवण- जसे की आकार, नक्षी, रंग यांसह खवलेयुक्त पंख आकार घेऊ लागतात. कोषातील अत्यल्प उपलब्ध जागेमुळे हे पंख गुंडाळलेल्या अवस्थेत असतात. सुमारे दोन आठवडय़ांच्या कालावधीनंतर कोषाच्या आतील द्रवाचा वापर पूर्ण होऊन, सर्व अवयव विकसित झाले की मग आतील पूर्ण वाढ झालेले प्रौढ फुलपाखरू बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू होते.

यामध्ये बाहेरील वातावरणाचा अंदाज घेऊन, पूर्ण ताकदीने कोषाच्या आवरणाला छेद देऊन प्रथम डोके बाहेर येते आणि मग इतर अवयव कोषाच्या बाहेर येतात. हाच फुलपाखराचा उदय होय! यानंतर पंखांमध्ये उड्डाणासाठी लागणारी शक्ती यावी म्हणून लवचीक असणारे पंख ताठ होणे आवश्यक असते. गुंडाळलेल्या अवस्थेतील पंख उलगडून ताठ होण्यासाठी पंख सुकणेदेखील तेवढेच महत्त्वाचे असते. हा कालावधी फुलपाखराच्या जीवनातील सर्वात असुरक्षित कालावधी असतो. कारण या काळात, एकाच ठिकाणी फुलपाखरू टांगलेल्या अवस्थेत बराच काळ असल्यामुळे त्याची सहज शिकार होऊ शकते. गुरुत्वाकर्षणामुळे द्रव एकतर खाली पडून जातो किंवा हवेशी संपर्क येऊन तो सुकून जातो. सुमारे अर्धा तास चालणारी ही क्रिया अत्यंत महत्त्वाची असते. इंग्रजीमध्ये म्हणूनच या फुलपाखरू उदयाला ‘इमर्ज’ हे यथार्थ नाव पडलेले असावे. यानंतर फुलपाखरांची भटकंती सुरू होते.

– दिवाकर ठोंबरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org