करोना विषाणूचे कूळ अतिशय मोठे आहे. त्यातील सात प्रकारचे विषाणू मानवांमध्ये रोगांसाठी कारणीभूत ठरतात. या सातपैकी एमईआरएस, सार्स आणि कोविड-१९ या तीन रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचा उगम वन्य प्राण्यांमध्ये असल्याचे आढळून आले आहे.

जगातील सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपैकी ७५ टक्के रोगांना कारणीभूत असणारे जिवाणू, विषाणू व अन्य रोगकारक परजीवी यांचा संसर्ग प्राण्यांपासून होत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. वन्यप्राण्यांमध्ये हा संसर्ग एका प्राण्याकडून दुसऱ्या कुळातील प्राण्याकडे होत असतो. परंतु नैसर्गिकरीत्याच असे बाधित प्राणी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळत असल्याचेदेखील प्राणीशास्त्रज्ञांना ज्ञात आहे. गेल्या काही दशकांमध्ये वन्यप्राण्यांच्या अधिवासाचा मानवामुळे झालेला नाश आणि जैवविविधतेचा ऱ्हास या कारणांमुळे मानव व वन्यप्राणी थेट किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकांच्या जास्त संपर्कात येत आहेत.

गोठय़ातील गायीगुरे व इतर पाळीव प्राणी, तसेच कुक्कुटपालनासारखे व्यवसाय या माध्यमांतूनसुद्धा असे रोग मानवापर्यंत पोहोचतात. दुग्धजन्य पदार्थाच्या सातत्याने वाढत असलेल्या मागणीमुळे अधिक दूध उत्पन्न होण्यासाठी कृत्रिम रेतनासारख्या पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. यामुळे गायींमधील जनुकीय विविधता कमी होत आहे. दूध, मांस, अंडी यांच्या अधिक उत्पादनाकरिता विदेशी जातींचे प्राणी पाळले जात आहेत. उत्पादन वाढवण्यासाठी जनुकीय बदल करणे, देशी जातींचा वापर टाळणे यामुळे प्राण्यांमध्ये जनुकीय विविधता लोप पावत आहे. देशी जातींमध्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासात असल्याकारणाने रोगांविरुद्धची प्रतिकारशक्ती सक्षम असते.

जैवविविधतेचा नाश झाल्यामुळे विषाणू कायम नवीन प्रकारच्या प्राण्याच्या (होस्ट) शोधात असतो. तो न सापडल्यामुळे या विषाणूंमध्ये जनुकीय बदल होऊन बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू यांसारखे रोग प्राण्यांपासून मानवापर्यंत येऊन पोहोचले आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे आणि नैसर्गिक घटकांमुळे सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे प्रमाण गेल्या एक कोटी वर्षांत जितके होते, त्याच्या कित्येक पट वाढले आहे. निसर्गातील जैवविविधता जर अबाधित व सुरक्षित असेल, तर अशा कोणत्याही रोगाणूचा फैलाव होणे टाळता येते. यासाठी वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास जपणे, पाळीव प्राण्यांच्या तब्येतीची काळजी घेणे आणि प्राणी पाळताना देशी जातींवर भर देणे आवश्यक आहे.

– सुधा मोघे-सोमणी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org