डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख

सुमारे पंचवीस कोटी वर्षांपूर्वी सरीसृप प्राण्यांनी पृथ्वीचा जणू ताबाच घेतला. या सरीसृपांपैकी डायनोसॉर कुळातील विविध प्राणी हे सुमारे एकोणीस कोटी वर्षे पृथ्वीवर सर्वत्र मुक्तपणे वावरत होते. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर नष्ट झाले असले तरी, उत्क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या वैशिष्टय़पूर्ण डायनोसॉरनी गेली दोन शतके प्राणिशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. पक्ष्यांची उत्पत्ती हीसुद्धा डायनोसॉरसारख्या सरीसृपांपासून झाली आहे.

डायनोसॉरचा शोध लागला तेव्हा डायनोसॉरच्या अस्तित्वाबद्दल काहीच कल्पना नव्हती. इंग्लंडमधील एका वस्तुसंग्रहालयाचा प्रमुख असणाऱ्या रॉबर्ट प्लॉट याला इ.स. १६७६ साली इंग्लंडमधील कॉर्नवेल येथील एका चुन्याच्या खाणीत एक मांडीचे मोठे हाड सापडले. हे हाड आज अस्तित्वात नाही. परंतु या हाडाच्या चित्रावरून, ते हाड डायनोसॉरचे असण्याची शक्यता कालांतराने व्यक्त केली गेली. डायनोसॉरचा हाच पहिला ज्ञात शोध असावा. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मोठय़ा प्राण्यांच्या हाडांचे आणखी अवशेष सापडले. भूशास्त्राचा अभ्यासक विल्यम बकलॅण्ड याला, तसेच एका भूवैज्ञानिकाची पत्नी असणाऱ्या मेरी अ‍ॅन मँटेल हिला, दक्षिण इंग्लंडमध्ये १९२०च्या दशकात सापडलेल्या जीवाश्मांचा यात उल्लेख करता येईल. ‘प्राण्यांच्या’ या प्रजातींचा उल्लेख तेव्हा अनुक्रमे मेगॅलोसॉरस आणि इग्वानोडॉन असा केला गेला.

डायनोसॉरची ओळख झाली.. परंतु हे अवशेष एखाद्या मोठय़ा अस्तंगत झालेल्या प्राण्याचे असल्याचे मानले जात होते. या ‘प्राण्यांना’ वेगळी ओळख दिली ती इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ रिचर्ड ओवेन याने. इ.स. १८४२ साली रिचर्ड ओवेन याने हे प्राणी सरीसृपांच्या वर्गातील असल्याचे मत दर्शवून, त्यांच्या कुळाला ‘डायनोसॉर’ हे नाव दिले. इ.स. १८६९ साली भूवैज्ञानिक फिलिप मातेराँ याला दक्षिण फ्रान्समध्ये डायनोसॉरच्या अंडय़ाचाही शोध लागला. इ. स. १८७० च्या सुमारास सापडलेल्या, ‘बर्लिन स्पेसिमेन’सारख्या काही जीवाश्मांत डायनोसॉर आणि पक्षी या दोघांचीही वैशिष्टय़े दिसून येत होती. यावरून इंग्लिश संशोधक थॉमस हक्सली याने पक्ष्यांची उत्क्रांती डायनोसॉरपासून झाली असल्याचे मत व्यक्त केले. डेन्मार्कच्या गरहार्ड हाइलमान या प्राणितज्ज्ञाने, १९१०च्या दशकात प्रकाशित केलेल्या लिखाणाद्वारे, डायनोसॉर हे पक्ष्यांचे पूर्वज असल्याचे सचित्र उदाहरणांसह स्पष्ट केले. पक्ष्यांच्या उत्क्रांतीबद्दलचे हाइलमानने व्यक्त केलेले हे मत अनेक संशोधकांनी आज ग्राहय़ धरले आहे.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org