निसर्गात अनेक विलोभनीय गोष्टी आहेत, त्यांपैकी एक म्हणजे फुलपाखरू! फुलपाखरू असे म्हटले तरी डोळ्यांपुढे उभा राहतो, तो रंगीबेरंगी पंख लाभलेला, मुक्तपणे विहारणारा, फुलातील मकरंदाच्या शोधात फुला-फुलांवर बसणारा असा कीटक!

फुलपाखरांचे नुसते रूपच देखणे नसून, त्यांचा जीवनक्रमदेखील मोहवून टाकणारा आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात फुलपाखरे पंख उघडून सूर्यस्नान घेतात. या उन्हातून त्यांना दिवसभर बागडण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळते. पंखांद्वारे उडून, पायांच्या आधारे फुलावर बसून, सोंडीद्वारे ते फुलांमधला मकरंद पीत असतात. काही ठरावीक फुलपाखरे मात्र कधीच फुलांवर येत नाहीत; अशांपैकी नवाब, टावनी राजा, बॅरॉन यांसारख्या फुलपाखरांना कुजलेली फळे, प्राणी-मनुष्य यांचे मलमूत्र प्रिय असते. यामधून त्यांना नायट्रोजन, सोडियम, मीठ हे आवश्यक घटक मिळतात.

फुलपाखरांतील नर-मादी एकमेकांभोवती पिंगा घालत असताना, त्यांना न्याहाळणे खूप रंजक असते. मादी एक विशिष्ट प्रकारचा फेरोमोन-संप्रेरक हवेत सोडते आणि त्याच प्रजातीच्या नराला तो फेरोमोन आकर्षित करतो. त्यानंतर नर आणि मादी हे एकत्र येऊन विहार करायला सुरुवात करतात. हा विहार म्हणजे एकमेकांची क्षमता जोखणे होय. यालाच फुलपाखरांचे प्रियाराधन असेही म्हणतात. रात्रीच्या वेळी अथवा भर पावसात पानांच्या खालच्या बाजूला बसून ही फुलपाखरे विश्राम करतात.

या फुलपाखरांसाठी अत्यंत आवश्यक अशा दोन प्रकारच्या वनस्पती आहेत. एक म्हणजे ‘नेक्टर प्लान्ट’ अर्थात ज्यामध्ये रस असतो अशी फुलझाडे; उदा. घाणेरी, रिठा, जमैकन स्पाइक्स, एक्सझोरा, सदाफुली वगैरे आणि दुसरे म्हणजे, त्यांच्या खाद्य वनस्पती. फुलपाखरांचा संपूर्ण जीवनपट या वनस्पतींवर अवलंबून असतो. फुलपाखराच्या मादीने अंडे देणे, त्यातून निघणारी अळी, अळीपासून पुढे निर्माण होणारा कोष आणि शेवटी कोषातून बाहेर पडणारे फुलपाखरू; हे सारे ज्या वनस्पतीवर घडते, ती वनस्पती म्हणजे ‘खाद्य वनस्पती’ होय. आपल्या अवतीभोवतीच्या परिसरांत वाढणारी कढीपत्ता, लिंबू, बोर, मेहंदी, रुई, सीताफळ, आंबा, अशोक यांसारखी अनेक झाडे या फुलपाखरांच्या खाद्य वनस्पती आहेत. म्हणूनच यांसारख्या झाडांचे संवर्धन करणे म्हणजे एक प्रकारे फुलपाखरांचेही संवर्धन करणेच आहे.

– दिवाकर ठोंबरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org