श्रुती पानसे

‘आयक्यू’ – बुद्धिगुणांक समाधानकारक असला तरी वास्तव जीवनात त्याचा उपयोग करता यायला हवा. स्वत:च्या भावना ओळखणं, त्याचं योग्यप्रमाणे नियमन करणं व मार्ग काढून त्या भावनिक पातळीवर हाताळणं, यातून यश मिळतं.

एकवेळ परीक्षेत गुण मिळणं सोपं; मात्र नोकरी- व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर मुलामुलींचं जग खऱ्या अर्थाने बदलतं. वास्तव जगात तयार प्रश्नपत्रिका नसते. त्याची तयार उत्तरपत्रिकाही नसते. प्रश्न कसा सोडवायचा, योग्य उत्तर कसं मिळवायचं, हे स्वत:लाच अक्कल-हुशारीने शोधावं लागतं. माणसांशी विविध पद्धतीने व्यवहार करावा लागतो. चतुर असावं लागतं. आपल्या व्यवसायाशी निगडित नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्याची कुवत असावी लागते.

शिक्षण संपताना आपल्याला एक उच्च पदवी मिळते. पण ती पुरेशी नसते. एकाचा व्यवसाय यथातथा चालतो. तीच पदवी असणाऱ्या दुसऱ्याकडे मात्र नव्या कामांची रांग लागलेली असते. याचं कारण दुसरी व्यक्ती भावनिक बुद्धिमान असू शकते. ज्या वर्गातले शिक्षक प्रेमळ असतात, तो वर्ग नेहमीच उत्साहाने रसरसलेला असतो. शाळा सोडून अनेक वर्ष झाली तरी प्रेम करणारे, नीट समजून सांगणारे, समजून घेणारे शिक्षक कायम लक्षात राहतात, असं दिसतं. भावनांशिवाय माणूस नाही. एखाद्या मोठय़ा मीटिंगची सुरुवात एकमेकांना अभिवादन करण्यातून होते. एकमेकांची विचारपूस करण्यातून होते.भावना चांगल्या असतात, तशा वाईटही असतात. या भावना दडपल्या, दाबल्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांना अति गोंजारलं तरी हातात आलेलं यश दुसरीकडे वळू शकतं.

ज्यांना भावनांचं नियमन चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं ती माणसं आयुष्यात यशस्वी होतात; मग त्यांचा आय.क्यू. काहीही असो!

डॅनियल गोलमन यांच्या मते योग्य प्रयत्नाने, स्वत:ला भावनिकदृष्टय़ा समर्थ करता येतं. आपल्या नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक भावना वाढवता आल्या की व्यक्ती जीवनात यशस्वी होते. म्हणून ते म्हणतात, केवळ बुद्धिगुणांकाला (आयक्यू) काहीच महत्त्व नाही. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्धिगुणांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशांचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं.

contact@shrutipanse.co