नैसर्गिक अधिवासातील जिराफ आफ्रिकेतील जंगलांमध्येच आढळतात. परंतु जगभरातील विविध प्राणिसंग्रहालयांमध्ये वास्तव्यासाठी आणलेल्या जिराफांची संख्या साधारण २००० च्या आसपास आहे. भारतात विविध प्राणिसंग्रहालयांत मिळून एकूण ३८ जिराफ आहेत.

अशा प्रकारे प्राणिसंग्रहालयात बंदिस्त ठेवण्यात आलेल्या जिराफांवर सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन आणि आवश्यक ते नियम पाळून संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनातून जिराफांबद्दल आजवर माहिती नसलेली काही वैशिष्टय़े समोर येत आहेत. नैसर्गिक अधिवासातील बाभूळ व तत्सम काटेरी वनस्पतींची पाने, फुले, फळे हे जिराफांचे अन्न. गाई-म्हशी या प्राण्यांप्रमाणेच जिराफदेखील सुरुवातीला हे अन्न आधी गिळतात आणि मग सावकाश रवंथ करताना अन्न चावून चोथा करणे, त्यावर इतर प्रक्रिया करणे हे घडते. या सगळ्या प्रक्रियांत त्यांची तब्बल १९ इंच लांबीची जीभ सतत कार्यरत असते. बंदिस्त अवस्थेतील जिराफांसाठी मात्र या पद्धतीने अन्नग्रहण करण्यावर मर्यादा असतात आणि त्यामुळे जिभेची पाहिजे तेवढी आणि पाहिजे तशी हालचाल होत नाही.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
75 years of nato,
यूपीएससी सूत्र : भारतातील गहू उत्पादन अन् नाटोची ७५ वर्ष, वाचा सविस्तर…

कोलकाता प्राणिसंग्रहालयातील जिराफांवर सुरू असलेल्या संशोधनादरम्यान, तेथील जिराफ स्वत:चे अंग त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील भाईबंदांसारखे नेहमीच्या पद्धतीने न चाटता अतिशय विचित्र पद्धतीने चाटतात असे निदर्शनास आले. या वर्तणुकीवरून प्राणिसंग्रहालयातील नैसर्गिक पद्धतीने अन्नग्रहण करण्यापासून वंचित असलेले जिराफ मानसिक तणावाखाली असल्याचे पुढे सिद्ध झाले. यावर हा मानसिक ताण घालविण्यासाठी त्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास वाटेल असे वातावरण निर्माण (सिम्युलेशन) करण्यात आले. यामुळे आता हे जिराफ तणावमुक्त झाले आहेत.

दुसरे महत्त्वाचे संशोधन तमिळनाडूमधील उटी येथे असलेल्या रेण्वीय जैवविविधता प्रयोगशाळेत (मॉलेक्यूलर बायोडायव्हर्सिटी लॅबोरेटरी) पश्चिम बंगाल प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि नामिबियातील जिराफ कॉन्झव्‍‌र्हेशन फाऊंडेशन यांच्या सहयोगाने सुरू आहे. भारतातील प्राणिसंग्रहालयांमध्ये असलेले जिराफ आफ्रिकेतील नैसर्गिक अधिवासात आढळणाऱ्या चार प्रजाती आणि पाच उपप्रजातींपैकी नेमके कोणत्या प्रजातींचे आहेत, यावर हे संशोधन सुरू आहे. यासाठी प्राणिसंग्रहालयातील जिराफांच्या विष्ठेचे नमुने घेऊन त्यांच्या पेशींमधील डीएनएच्या (आनुवंशिक लक्षणांचे वाहक असलेले रेणू) रेणूंची चाचणी करण्यात येते. या रेणूंवर असलेली जनुके (जीन्स) आफ्रिकेतील जिराफांच्या जनुकांबरोबर पडताळून पाहिले जातात. त्यानुसार कोलकाता प्राणिसंग्रहालयात ‘नॉर्दन जिराफ’ ही मुख्य प्रजाती आणि ‘नुबियन’ ही उपप्रजाती असल्याचे आढळून आले आहे. भारतातील इतर प्राणिसंग्रहालयांतही असाच अभ्यास करून जिराफांबद्दल अधिकाधिक माहिती करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

– तुषार कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org