सुनीत पोतनीस

ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या ‘इम्पिरियल ब्रिटिश ईस्ट आफ्रिका’ कंपनीने युगांडातील बुगांडा राज्याशी संरक्षक म्हणून तसेच विकासकामे करण्याचा करार केला. परंतु युगांडातल्या यादवींमुळे आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेल्या ‘इम्पिरियल’ कंपनीने हा करार रद्द करून कंपनी बंद केली. युगांडात वसाहत स्थापण्यापेक्षा युगांडा आणि शेजारच्या नाईल नदीवरील व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवून व्यापारी लाभ उठविण्याची ब्रिटिश साम्राज्याची योजना होती. ब्रिटिश सरकारने १८९४ साली बुगांडाच्या राजाशी त्यांच्या राज्यप्रदेशाच्या संरक्षणाचा,  विकासकामांचा करार  केला. ते पाहून त्यांच्या शेजारच्या तोरो, अंकोल आणि बुन्मोरो या राज्यांनीही ब्रिटिशांशी संरक्षण, प्रशासकीय करार केले.  या चार राज्यांशी करार करून ब्रिटिशांनी तेथे आपली पकड बसविली. ब्रिटिशांनी संरक्षक (प्रोटेक्टोरेट) म्हणून १८९४ साली युगांडाचा पूर्ण कारभार नियंत्रणाखाली घेतला तो १९६२ पर्यंत. या काळात ब्रिटिश, इतर युरोपिय फार थोडय़ा संख्येने युगांडात स्थायिक झाले, पण येथील व्यापार-उदिमाचा खरा लाभ घेतला तो भारतीयांनी! हजारो गुजराती कुटुंबे येथे स्थायिक झाली आणि त्यांनी युगांडाच्या व्यापारावर पकड बसवली. दक्षिण युगांडात, देशाची राजधानी कंपाला येथील विविध प्रदेशांत कीटकांपासून उद्भवणाऱ्या साथींचे गंभीर आजार ही नित्याचीच बाब होती. ब्रिटिशांच्या संरक्षक म्हणून कारकीर्दीत १९०० ते १९२० दरम्यान ‘स्लीपिंग सिकनेस’या  साथीमुळे अडीच लाखांहून अधिक लोक मृत्यू पावले. अखेरीस ९ ऑक्टोबर १९६२ रोजी युगांडावरील ब्रिटिशांचा अंमल संपून तो एक स्वतंत्र नवदेश म्हणून उदय पावला. एक वर्षांने १९६३ मध्ये तिथे प्रजासत्ताक सरकार स्थापन झाले, तरीही त्यांनी ‘कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’ या संघटनेचे सदस्यत्व कायम ठेवले. स्वातंत्र्यानंतरच्या निवडणुकीत ‘युगांडा पीपल्स काँग्रेस’ आणि इतर दोन पक्षांच्या युतीचे सरकार स्थापन झाले. मिल्टन ओबोटे  पहिले पंतप्रधान तर बुगांडाचा राजा नामधारी राष्ट्राध्यक्षपदावर नियुक्त झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा युगांडाचा इतिहास हा साथींचे गंभीर आजार, वांशिक-धार्मिक रक्तरंजित दंगली, गनिमी युद्धे यांनी भरलेला आहे. राष्ट्राध्यक्ष असलेला बुगांडाचा राजाही सरकारमध्ये नवनवीन बखेडे उभे करीत होता.

sunitpotnis94@gmail.com