ज्ञानपीठ  पुरस्कारविजेते कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने आजपासून तीन दिवस आपण भाषा आणि गणित यांचे नाते समजून घेऊ.

एकदा शिक्षकांनी वर्गात विचारले, ‘भाजक आणि विभाजक यांत फरक काय?’ विद्यार्थ्यांना कळत होते, यांनी आपण एखाद्या संख्येला भागतो. पण नेमका फरक सांगितला एका विद्यार्थिनीने : ‘भाजक ही केवळ भागणारी संख्या. पण विभाजक ही नि:शेष भागणारी संख्या!’ गणितातही शब्दांचे बारकावे माहीत असावे लागतात हेच यातून दिसते. ‘वि’ हा उपसर्ग लागला की विशेष असा भाजक असा अर्थ होतो. पण गंमत अशी की ‘वि’ याच उपसर्गाचा दुसरा अर्थ ‘विरुद्ध’ असाही होतो. आणि मग प्रतलीय प् वितलीय अशी जोडी मिळते.

प्रत्येक विषयाला स्वत:चे शब्दभांडार असते, नियम असतात, तर काही संकेतही असतात. कठीण शब्दांचा अर्थ कळला तर संकल्पना सुस्पष्ट होतात. जसे की, इष्टिका म्हणजे सोप्या भाषेत ‘वीट’! हा अर्थ माहीत असला तर विटेची आकृती नजरेसमोर येते व गुणधर्म समजणे सोपे होते. आवली म्हणजे ओळ, मांडणी हे माहीत असेल तर विशिष्ट गणिती क्रियांनी जोडली गेलेली पदांची ओळ ती ‘पदावली’ हे चटकन समजेल. सूची म्हणजे सुई. त्यामुळे ज्या घनाकृतीचे वरचे टोक निमुळते होत जाते, ती ‘सूची’ आणि तळाचे व वरचे अशी दोन्ही पृष्ठे एकरूप असतात ती ‘चिती’! हे शब्दार्थ नक्की माहीत असले की वृत्तसूची-वृत्तचिती यांच्यातील फरक लक्षात राहणारच. केवळ घोकंपट्टी पुरेशी नाही. त्याचबरोबर चित्रे, प्रतिकृती दाखविल्यास अचूक अर्थ समजण्यास मदत मिळते.

छेदणे, विभागणे, दुभागणे अशी क्रियापदे अर्थभेदासह कळायला हवीत. विशिष्ट चिन्हे शब्दांसाठी वापरण्याचे संकेत माहीत हवेत. गणितीय भाषा ‘आवश्यक व पुरेसे’ (नेसेसरी अ‍ॅण्ड सफिशिएंट) या जोडीवर आधारित असते. व्याख्यांमध्ये कमीत कमी शब्दांमध्ये सर्व अटींचा व निष्कर्षांचा समावेश लागतो. भूमितीतील प्रमेय जर-तर स्वरूपाच्या वाक्यरचनेत लिहिले तरच पक्ष काय व साध्य काय, हे कळते व सिद्धतेकडे जाता येते.

गणिताची भाषा आटोपशीर, नेमकी हवी. तिच्यात संदिग्धता, भोंगळपणा नको. शाब्दिक उदाहरणांची भाषा सोपी, अर्थवाही असेल तर मुलांना प्रश्न नीट समजतो. शिक्षकाचे शब्दोच्चार, बोलण्याची शैली यांचेही महत्त्व आहेच. एकूण काय, गणिताचा आणि भाषेचा छत्तीसाचा आकडा अजिबात नाही; तर दोन्ही हातात हात घालून असतील तरच शिक्षण मजेत होणार!

–  डॉ. मेधा लिमये

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org