News Flash

मनोवेध : भावनांच्या पातळ्या

‘मी’कडून ‘आम्ही’कडे होणारा प्रवास नंतरच्या पातळीवरील भावनांमुळे शक्य होतो.

प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स

डॉ. यश वेलणकर

माणसाच्या भावना तीन पातळीवरच्या असतात. त्या उत्क्रांतीने विकसित झालेल्या असून मेंदूत त्यांची मुख्य केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जीव आणि वंशसातत्य यासाठी आवश्यक असणाऱ्या भावनांना आदिम किंवा जैविक भावना म्हणतात. काही लाख वर्षांपूर्वीचा माणूस केवळ याच भावना अनुभवत असावा. कोणताही धोका जाणवला, की भावनिक मेंदू ‘अमीग्डला’च्या प्रतिक्रियेमुळे शरीर-मनात युद्धस्थिती निर्माण झाल्याने भीती, राग किंवा उदासी या भावना निर्माण होतात. वासना, उन्माद व खंत याही जैविक भावनाच आहेत. त्या मनात असतात तेव्हा अमीग्डला अधिक सक्रिय असतो. या भावना मुख्यत: ‘मी’शी निगडित असतात.

‘मी’कडून ‘आम्ही’कडे होणारा प्रवास नंतरच्या पातळीवरील भावनांमुळे शक्य होतो. यांचे मुख्य केंद्र वैचारिक मेंदू म्हणजे ‘सेरेब्रल कॉर्टेक्स’ हे असते. साधारण ५० हजार वर्षांपूर्वी माणूस या भावना अनुभवू लागला. त्यामुळेच तो संघटित होऊ लागला. शरीराची शक्ती अन्य प्राण्यांपेक्षा कमी असूनदेखील संघर्षांत टिकाव धरू शकला. या भावना विचार करून निर्माण होतात, विचार बदलून बदलता येतात. चिंतनाधारित ‘कॉग्निटिव्ह थेरपी’चे ध्येय या भावना विकसित करणे हेच असते. ‘माझेच खरे’ असा दुराग्रह कमी करून सहिष्णुता, दुसऱ्याचे मत समजून घेऊन त्यांचा आदर करणे, अनेक विचारांत समन्वय साधणे या पातळीवर शक्य होते. कुटुंब व त्यापेक्षा मोठय़ा संघटना या भावना विकसित झाल्या तरच निर्माण होतात, वाढतात. समन्वय, सहिष्णुता, समानुभूती, परोपकार, प्रेम, स्नेह, स्वार्थत्याग या दुसऱ्या पातळीवरील भावनांना प्रगत किंवा विचाराधारित भावना म्हणतात. मात्र या पातळीवर ‘आम्ही आणि इतर’ हा भाव तीव्र असतो. संघटनेबाहेरील घटकांविषयी परकेपणा, द्वेष वाटू शकतो. विचारांची पातळी ‘मी’कडून ‘आम्ही’पर्यंत विकसित झाली असली तरी ती सर्वव्यापी नसते.

तिसऱ्या पातळीवरील भावनांनी ती होते. त्यांचे केंद्र ‘प्री-फ्रण्टल कॉर्टेक्स’ असते. साधारण १० हजार वर्षांपूर्वीचा माणूस या उन्नत भावना अनुभवू लागला. दुसऱ्या पातळीवरील भावनांमधील प्रेम हे ‘माझ्या विचारांच्याच’ माणसाबद्दल असते. तिसऱ्या पातळीवर मात्र ते प्रेम सर्वव्यापी होते. सर्वाचे मंगल होवो, असे पसायदान उन्नत पातळीवरच शक्य होते. साऱ्या माणसांच्या मेंदूत हे तीनही भाग असल्याने या तिन्ही पातळ्यांवरील भावना कुणीही माणूस अनुभवू शकतो.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:08 am

Web Title: article on levels of emotion abn 97
Next Stories
1 कुतूहल : जैविक घडय़ाळाची लय
2 मनोवेध : सकारात्मक राग
3 कुतूहल : जैवविविधता आणि प्रदेशनिष्ठता
Just Now!
X