दक्षिण-पूर्व नायजेरियामध्ये नायझर नदीच्या त्रिभुज प्रदेशात ‘ओगोनी’ नावाची स्थानिक आदिवासी जमात राहते. आजही हा एके काळी अतिशय सुपीक असलेला प्रदेश ‘ओगोनीलॅण्ड’ म्हणून ओळखला जातो. १९५८च्या सुमारास ओगोनींच्या या सुपीक प्रदेशातील जमिनीत तेलसाठा असल्याचा सुगावा बहुराष्ट्रीय तेल कंपन्यांना लागला. इथूनच ओगोनींचे शोषण सुरू झाले. त्यांच्या समृद्धीला जणू ग्रहण लागले. शेलसारख्या बलाढय़ बहुराष्ट्रीय तेल कंपन्यांनी ओगोनी प्रांत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ओगोनी जमातीच्या मालकीच्या जमिनींमधून तेल काढून या कंपन्यांनी भरघोस कमाई केली होती. परंतु मूळ जमीनमालक असलेल्या ओगोनींना याचा काहीच मोबदला मिळाला नाही. उलट त्यांच्या जमिनीतून तेल काढून घेतल्यानंतर नापीक, ओसाड जमिनी तशाच सोडून या कंपन्या दुसऱ्या प्रांतात कब्जा करत होत्या. यामुळे हवा, पाणी यांचे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होऊ लागले होते.

अखेर १९९० च्या सुमारास, ओगोनी जमातीतील एक पत्रकार-लेखक म्हणून नावाजल्या गेलेल्या केन सारो-विवा यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चालवलेल्या या शोषणाविरोधात आवाज उठवला. विवा यांच्या नेतृत्वाखाली ‘मोसोप’ (मूव्हमेंट फॉर द सव्‍‌र्हायव्हल ऑफ द ओगोनी पीपल) या संघटनेची स्थापना करण्यात आली. ओगोनींच्या जमिनीतून काढल्या गेलेल्या तेलाचा मोबदला द्यावा आणि स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तेल कंपन्यांनी देश सोडून जावे, असा इशारा बहुराष्ट्रीय तेल कंपन्यांना या संघटनेच्या वतीने देण्यात आला. तेल कंपन्यांकडून होणाऱ्या शोषणाविरोधातला हा पहिलाच संघटित आवाज होता. ४ जानेवारी १९९३ रोजी या तेल कंपन्यांविरोधात नायजेरियात एक शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने ओगोनींचा लढा जगासमोर आला.

त्यानंतर तेल कंपन्या बंद करण्याची मागणी संपूर्ण नायजेरियात जोर धरू लागली होती. परंतु करोडो डॉलर्सचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या या कंपन्या नायजेरियन हुकूमशाहीला हव्या होत्या. दरम्यान नायजेरियन हुकूमशहाने केन सारो-विवा यांनाच अनेक गुन्ह्य़ांमध्ये दोषी ठरवत अटक केली आणि १० नोव्हेंबर १९९५ रोजी केन यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना फाशी देण्यात आली. दरम्यान, अराजकता आणि जागतिक दबाव याचा विचार करून शेल कंपनीने आपला गाशा गुंडाळला. परंतु त्यांनी सोडलेल्या पर्यावरण विनाशाच्या खुणा आजही ओगोनींना त्रासदायक ठरत आहेत. अर्थात, विवा यांच्या मृत्यूनंतर आजही त्यांच्या कार्याचा गौरव केवळ नायजेरियातच नव्हे तर संपूर्ण आफ्रिकी राष्ट्रांमध्ये केला जातो.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org