– डॉ. यश वेलणकर

तुमच्या-आमच्या घरात पुरुष आणि स्त्रिया एकत्र राहतात. त्यांच्या मेंदूत काही वेगळेपण असते का, यावरही संशोधन सुरू आहे. १९९८ साली अ‍ॅलन आणि बार्बरा पिझ या लेखक दाम्पत्याचे ‘व्हाय मेन डोन्ट लिसन अ‍ॅण्ड विमेन कान्ट रीड मॅप्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यामध्ये त्यांनी निसर्गत: स्त्री-पुरुषांच्या मेंदूत कोणता वेगळेपणा दिसतो याची बरीच उदाहरणे आणि कारणमीमांसा दिली आहे. स्त्रिया रंगांच्या छटांमधील सूक्ष्म फरक अधिक चांगला ओळखू शकतात. त्यांची पाचही ज्ञानेंद्रिये पुरुषांपेक्षा अधिक तल्लख असतात. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांना समोरील माणसाची देहबोली चांगली समजते. पुरुषांना देहबोली समजून घेणे मुद्दाम शिकावे लागत असले, तरी त्यांच्या मेंदूत दिशांची आणि आकाराची जाणीव करून देणारा भाग अधिक विकसित असतो. लाखो वर्षे जंगलात राहत असताना ‘ती’ गुहा सांभाळत असे आणि ‘तो’ शिकारीसाठी प्राण्यांच्या मागे जात असे.

अशी वेगवेगळी कामे पिढय़ान्पिढय़ा करीत राहिल्याने त्यांस अनुकूल असे बदल मेंदूत झाले असावेत. हे बदल गर्भावस्थेत असतानाच होऊ लागतात. प्रत्येक नवीन जीव हा सुरुवातीचे काही दिवस स्त्री शरीराचाच असतो. त्याची आठवण पुरुष त्यांच्या शरीरात स्तनाग्राच्या स्वरूपात पाहू शकतात. मात्र गर्भात ‘वाय’ गुणसूत्र असेल, तर ‘टेस्टोस्टेरॉन’ तयार होऊ लागते आणि शरीरात त्याचप्रमाणे मेंदूतही वेगळेपणा दिसू लागतो. हे ‘वाय’ गुणसूत्र नसेल, तर ‘इस्ट्रोजेन’ हे लैंगिक संप्रेरक गर्भात निर्माण होते आणि त्यानुसार शरीराची जडणघडण होते.

शिशू अवस्थेत ठरावीक अवयव सोडले, तर अन्य शरीरात काही बदल दिसत नसला तरी मेंदूत काही बदल दिसतात. त्याचमुळे मुली लवकर बोलू लागतात. स्वमग्नता मुलींपेक्षा मुलांत चारपट अधिक दिसते. बालवाडीतील मुली माणसांचे चेहरे चांगले लक्षात ठेवतात, तर मुलगे आकारांतील फरक चांगले ओळखू शकतात. अर्थात, नंतर मेंदूला मिळणाऱ्या अनुभवानुसार मेंदूत बदल होत जातात. त्यामुळे सराव करून स्त्रिया चांगले ‘ड्रायव्हिंग’ करू शकतात. पुरुष देहबोली जाणून घेऊन दुसऱ्याच्या भावना समजून घेणारे चांगले समुपदेशक होऊ शकतात.

स्त्री-पुरुष समानता असायलाच हवी, पण समानता म्हणजे सारखेपणा नाही. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि त्या वेगळेपणात लैंगिक संप्रेरके महत्त्वाची भूमिका बजावत असतात. नाते चांगले राहण्यासाठी या वेगळेपणाचा आदर करायला हवा.

yashwel@gmail.com