News Flash

नवदेशांचा उदयास्त : ‘आफ्रिकेच्या शिंगा’तला सोमालिया!

प्राचीन काळातही सोमालियाचा प्रदेश व राज्यकर्ते भारतीय आणि रोमन व्यापाऱ्यांशी जवळचे संबंध ठेवून होते.

सोमालिया

– सुनीत पोतनीस

आफ्रिका खंडाच्या मध्य पूर्व किनारपट्टीवर एडनच्या आखाताच्या दक्षिणेस असलेल्या आणि अरबी समुद्रात घुसलेल्या जमिनीच्या सुळक्याचा आकार गेंड्याच्या शिंगासारखा आहे. या प्रदेशाला ‘आफ्रिकेचे शिंग (हॉर्न ऑफ आफ्रिका)’ म्हणतात! आफ्रिकेच्या या शिंगामध्ये अंतर्भूत असलेल्या चार देशांपैकी सोमालिया या देशाने शिंगाकृती प्रदेशाचा संपूर्ण समुद्रकिनारा व्यापला आहे. इटली आणि युनायटेड किंगडम यांच्याकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर- १ जुलै १९६० रोजी सध्याचा प्रजासत्ताक सोमालिया स्वायत्त देश म्हणून अस्तित्वात आला. या देशाच्या भौगोलिक सीमा पूर्वेकडे हिंदी महासागर आणि उत्तरेला एडनचे आखात, तर पश्चिमेला इथिओपिया, नैर्ऋत्येला केनिया आणि वायव्येला जिबुती या देशांच्या सीमांना भिडलेल्या आहेत.

सोमालियाच्या हिंदी महासागरातील मोक्याच्या भौगोलिक स्थानामुळे ते प्राचीन आणि मध्ययुगीन काळात आफ्रिकेतले सर्वाधिक महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र होते. मध्ययुगीन काळात अजुरन सल्तनत, अदाल सल्तनत आणि गीलेदी सल्तनत या प्रबळ राजवटींचे सोमालियाच्या व्यापारावर वर्चस्व होते. भारत आणि इतर पौर्वात्य देशांमधील व्यापारी मालवाहू जहाजे हिंदी महासागरातून एडनच्या आखातात आणि पुढे सुवेझ कालवामार्गे युरोपात जात असत. या जहाजांच्या मार्गात सोमालियाची किनारपट्टी असल्यामुळे इथून होणारी चाचेगिरीही वाढली होती. हे सोमाली चाचे खोल समुद्रात जाऊन जहाजे लुटत. काही वेळा पूर्ण जहाजेही आपल्या अड्ड्यावर आणीत. प्राचीन काळातही सोमालियाचा प्रदेश व राज्यकर्ते भारतीय आणि रोमन व्यापाऱ्यांशी जवळचे संबंध ठेवून होते.

सातव्या-आठव्या शतकात अरेबियात इस्लाम मूळ धरू पाहात असताना, अनेक इस्लामी अनुयायी मक्केतून बाहेर पडले; त्यांपैकी अनेकजण उत्तर सोमालियात येऊन स्थायिक झाले. या मंडळींच्या प्रभावातून सोमालियातल्या अनेक अरबांनी इस्लाम धर्म स्वीकारला. अशा रीतीने जगात सर्वप्रथम इस्लामी धर्मांतर झाले ते सोमालियामध्येच! आठव्या शतकात उत्तर सोमालियात बांधलेली मशीद आजही सुस्थितीत आहे.

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 12:07 am

Web Title: article on somalia in the africa abn 97
Next Stories
1 कुतूहल : पायथागोरसचे प्रमेय
2 नवदेशांचा उदयास्त : मादागास्करचे जैववैविध्य
3 कुतूहल : द्विपद प्रमेय
Just Now!
X