– डॉ. यश वेलणकर

माणसाच्या मेंदूचे वैशिष्टय़ म्हणजे तो दोन भिन्न संकल्पनांना एकत्र जोडतो. सर्जनशीलतेसाठी ही क्षमता महत्त्वाची आहे. ही क्षमता तपासण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. त्यांनी लाडू, पेढा, मध, केक, गूळ अशा ३० पदार्थाची एक यादी शंभर माणसांना दाखवली. नंतर ती यादी बाजूला ठेवून घर, खुर्ची, गूळ, केक अशी वेगळी यादी दाखवली आणि त्या यादीतील कोणते पदार्थ पूर्वीच्या यादीत होते ते ओळखायला सांगितले. मात्र असे करताना त्यांनी एक गंमत केली. पहिल्या यादीत साखर हा शब्द नव्हता पण दुसऱ्या यादीत तो होता. ही स्मरणशक्तीची चाचणी आहे असे सांगून माणसांना पहिल्या यादीत पाहिलेले शब्द दुसऱ्या यादीत शोधायला सांगितले असता ८० टक्के व्यक्तींनी साखर हा शब्द पहिल्या यादीत होता असे सांगितले. याचे कारण पहिली यादी वाचत असताना हे सारे गोड पदार्थ आहेत हे साऱ्यांच्या लक्षात आले. पण त्यामध्ये साखर हा शब्द नव्हता याची नोंद केवळ २० टक्के लोकांच्या मनात झाली. अन्य सर्वानी गोड पदार्थ ही संकल्पना लक्षात ठेवली. दुसऱ्या यादीतील गोड पदार्थ त्यांनी बरोबर ओळखले पण त्याच्या जोडीला साखर गोड असल्याने तीही पहिल्या यादीत होती असे त्यांना वाटले. हे प्रत्यक्षात नसलेले पाहण्याची क्षमता काही वेळा उपयोगी असली तरी बऱ्याचदा त्रासदायक ठरते. माणसाला आकलन होताना तो मनात कप्पे तयार करतो. असे कप्पे करणे लक्षात ठेवायला मदत करते, पण त्यामुळेच सार्वत्रिकीकरण होऊ लागते आणि चुकीचे समज निर्माण होतात. पहिल्या यादीत सारे गोड पदार्थ होते म्हणजे साखर हा शब्ददेखील होता हे गृहीत धरले जाते. सारे परदेशी भोगी, सारे भारतीय अंधश्रद्ध हे समज असेच तयार होतात. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ या उक्तीमध्ये कवीची कल्पना करण्याची क्षमता सांगितली आहे. पण काही वेळा कवितेच्या ओळी वाचल्या की वाचकाला कवीला अभिप्रेत नसलेले अर्थही सुचू शकतात.. ‘रीडिंग बिट्वीन द लाइन्स’ हे कौशल्य, याच क्षमतेचा परिणाम आहे. पण आपल्याला सुचलेला विचार ही एक शक्यता आहे याचे भान सुटले की वादविवाद सुरू होतात. सजगतेचा सराव करताना काय दिसले आणि कोणता विचार आला याची नोंद करायची असते. असे केल्याने पूर्वस्मृतींचा चष्मा लक्षात येऊ लागतो. वास्तव आणि मनाने बनवलेली कथा यांत फरक करता येतो.

yashwel@gmail.com