जंगलाला आग लागून जंगलाचा विनाश झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो. अशा आगीपासून वनसंपत्ती वाचवण्यासाठी उपाययोजना म्हणून वन खात्यातर्फे नुकताच वनवणवा प्रतिबंधक सप्ताह साजरा करण्यात आला. जंगलात जाळ, वणवा लागून वनस्पती, प्राणी, कीटक, वनोपज अशी खूप सारी जंगलसंपत्ती जळून नष्ट होऊ नये म्हणून ‘जाळरेषा’ घेतली जाते, म्हणजेच जाळ (वणवा) वाचवण्यासाठी जाळाचा उपयोग.. आहे ना मजेदार? जाळरेषा घेणे हे वन व्यवस्थापनातील महत्त्वाचे तंत्र आहे. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी अनेकदा जंगलात वणवे लागतात. कारण काहीही असले तरी, या वणव्यांमुळे जंगलसंपत्तीचे अतोनात नुकसान होते. मागच्या वर्षी अ‍ॅमेझॉनच्या जंगलात लागलेला वणवा आपल्या लक्षात असेलच. काही प्रकारचे वणवे वाचवण्यासाठी जाळरेषा हे तंत्र अमलात आणले जात.

पावसाळ्यात जंगलामध्ये भरपूर प्रमाणात गवत वाढते. पावसाळा संपला की हे गवत सुकू लागते. हे सुकलेले गवत सहजपणे पेट घेते आणि मोठा वणवा लागू शकतो. साधारणत: जानेवारीपर्यंत जंगलाच्या चारी बाजूंनी जाळरेषा घेऊन  जंगल सुरक्षित केले जाते. याची पूर्वतयारी बऱ्याच आधीपासून करावी लागते. पावसाळा संपला की लगेच गवत काढायला सुरुवात करावी लागते. जिथे जाळरेषा घ्यायची, त्या कडेला हे गवत जमा करून ठेवायचे आणि ते पूर्ण कडकडीत वाळू द्यायचे. जिथे जाळरेषा घ्यायची त्या जागेवरचे आणि त्याच्या दोन्ही बाजूंचे गवत पूर्ण साफ करावे लागते. असे केल्याने आग पसरत नाही.

जाळरेषा तयार करण्याचे काम शक्यतो सकाळी लवकर किंवा दुपारी ऊन उतरल्यावर केले जाते. सुकलेले गवत जाळरेषा घ्यायच्या जागेवर पसरवून ते त्यातील थोडा थोडा भाग पेटवत पुढे जावे लागते. सुकलेले गवत भर्रकन पेटते व लगेच जळते. हे विझत आले की, थोडेसे पेटलेले गवत काठीने उचलून पुढच्या गवतावर टाकले जाते. असे करत करत पुढे जात चारही बाजूंची जाळरेषा पूर्ण केली जाते. कधी जाळ पसरू लागतो; पण हिरव्या-ओल्या फांद्या घेऊन दोन्ही बाजूंनी माणसे असतात, ती लगेच पसरणारी आग विझवतात. अतिशय चपळाईने हे सर्व काम केले जाते. सुकलेले गवत जेव्हा एकदम पेटते तेव्हा लालपिवळा आगीचा डोंब होतो. दहा फुटांवरही धग जाणवते. पेटलेले गवत विझते तेव्हा जमिनीवर काळा पट्टा दिसतो.

एकुणात, बाहेरून येणारी आग तिथेच थांबवण्याचे महत्त्वाचे काम करते- जाळरेषा!

संगीता जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org