फुलपाखरांच्या पंखांवरील सुंदर नक्षीकाम, रंगसंगती, ठिपके, झालर , पॅटर्न (नमुने) या गोष्टी नक्की कुठून आल्या? त्यांचे प्रयोजन काय? असे प्रश्न पडत असतील. फुलपाखरांच्या पंखांमध्ये अत्यंत सूक्ष्म रंगकोषिका (पिगमेंट्स) असतात. या कोषिकांनुसार  फुलपाखरांच्या पंखांचे रंग ठरत असतात. हे रंग रचनात्मक (स्ट्रक्चरल)असतात. फुलपाखरांचे पंख खवल्यांचे बनलेले असतात. या पारदर्शी खवल्यांवर सूर्यप्रकाश पडल्यावर, या प्रकाशाचे किरण एकाच रंगात परावर्तित होतात. तोच रंग आपल्या डोळ्यांना दिसतो. म्हणजेच फुलपाखराचे रंग हे आभासी असतात. पंखांमधील पारदर्शक खवले, त्यांची सूक्ष्म रचना, यांचा सूर्यप्रकाशाशी होणारा संयोग हे फुलपाखरांच्या पंखाच्या रंगसंगतींचे महत्त्वाचे घटक आहेत. बघणाऱ्याच्या डोळ्यांचा कोनदेखील यात महत्त्वाची भूमिका बजावतो. ‘पॅरिस पीकॉक’ किंवा ‘इंडियन पर्पल एम्परर’सारख्या फुलपाखरांचे पंख हे आपल्या डोळ्यांना विविध कोनांतून निरनिराळ्या रंगांचे दिसतात. हजारो वर्षांपासूनच्या उत्क्रांतीमधून  फुलपाखरांच्या पंखांचे नमुने ठरलेले असतात. पंख केवळ सौंदर्यवर्धक नसून ते फुलपाखरांचे रक्षणही करतात. उदा. ‘बुश ब्राऊन’, ‘पॅन्सी’ यांच्या पंखांवरील नक्षीचे नमुने.

अत्यंत आकर्षक रंगसंगती लाभलेल्या ‘रोझ’, ‘जेझबेल’ प्रजातींच्या फुलपाखरांची  शरीरे  विषारी असल्याची चेतावणी त्यांच्या बेफिकीरपणे उडण्याच्या लयीत सामावलेली असते. हे त्यांचे बिनधास्तपणे  विहारणेच  त्यांच्या संरक्षणचे प्रमुख अस्त्र आहे. अशा फुलपाखरांपासून भक्षक (पक्षी) लांब राहातात. फुलपाखरांचे पंख बाहेरील बाजूच्या तुलनेत आतून  जास्त रंगाकर्षक व  चमकदार असतात. त्यामुळे पंख मिटून बसलेले फुलपाखरू भक्ष्याच्या नजरेस सहजी पडत नाही. तसेच पंखांच्या आतील बाजूचे रंगदेखील, निसर्गातील कीटक, दगड, झुडपे,  इ. बाबींशी साधर्म्य साधून बरेचदा शत्रूंना फसवण्याचे काम करतात.

काही प्रजातींमधील नर-मादीच्या पंखांवरील रंग, नक्षी, नमुने, खूपच वेगळे असतात. जणू काही वेगळ्या प्रजातींची फुलपाखरेच. उदा.- ब्लॅक प्रिन्स (कृष्णराज) , मॉरमॉन (बहुरूपी), एगफ्लाय (मोठा चांदवा) इत्यादी. त्यांच्या पंखावरील ठरावीक नक्षी साम्य दर्शवते.  फुलपाखराच्या मादीला वंश वाढवायची प्रमुख कामगिरी पार पाडायची असल्यामुळे ती सहसा मोकळ्यात उड्डाण करीत नाही. मादीच्या आयुष्याला खूपच महत्त्व असते म्हणूनच ती दुर्मीळदेखील असते. शत्रूंच्या लक्षात येऊ नये म्हणून मादी फुलपाखराचे

रंग नराच्या तुलनेत फिक्कट, कमी आकर्षक असतात.

– दिवाकर ठोंबरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org