– डॉ. यश वेलणकर

ध्यानावर आधारित मानसोपचार ‘डिप्रेशन’चा पुनरुद्भव टाळण्यासाठी उपयोगी आहेत, हे सिद्ध करणारे अनेक अभ्यास झाले आहेत. एका संशोधनानुसार, औषधांना ध्यानाची जोड दिली तर एक वर्षांच्या काळात ‘डिप्रेशन’चा पुनरुद्भव तीनपटींनी कमी होतो. ब्रिटनमधील एका संशोधनात ‘डिप्रेशन’मधून बाहेर पडलेल्या रुग्णांचे दोन गट केले गेले. हे रुग्ण अनेक वर्षे ‘डिप्रेशन’मध्ये होते, त्यांना पुन:पुन्हा हा त्रास होतो असा इतिहास होता. त्यातील एका गटाला ‘डिप्रेशन’वरची फक्त औषधे चालू ठेवली आणि दुसऱ्या गटाला ध्यानावर आधारित मानसोपचार सुरू केले व औषधांचा डोस कमी केला. एक वर्षांच्या काळात केवळ औषधे घेणाऱ्या ६० टक्के रुग्णांना पुन्हा त्रास सुरू झाला आणि ध्यान करणाऱ्या ४७ टक्के रुग्णांनाच हा त्रास पुन्हा झाला. त्यानंतर ध्यान करणाऱ्या ७५ टक्के रुग्णांची औषधे त्यांच्या डॉक्टरनी बंद केली आणि ५३ टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले.

साक्षीध्यान हे ‘डिप्रेशन’मध्ये प्रभावी उपचार ठरते हे सिद्ध झाले आहे. त्याचा उपयोग का होतो, याची चार कारणे असू शकतात असे शास्त्रज्ञ मानतात. पहिले म्हणजे, हे ध्यान आपल्याला क्षणस्थ होण्याची सवय लावते; त्यामुळे भूतकाळ आणि भविष्यकाळात राहणे कमी होते. दुसरे, आपण श्वासावर किंवा संवेदनांवर लक्ष पुन:पुन्हा केंद्रित करतो तेव्हा मनात तेच तेच येणारे विचार कमी होतात; ‘डिप्रेशन’मध्ये तेच तेच निराशाजनक विचार पुन:पुन्हा येत असतात. तिसरे म्हणजे, सजगता ध्यानाच्या अभ्यासाने कोठे लक्ष केंद्रित करायचे ती नियंत्रण क्षमता (सिलेक्टिव्ह अटेन्शन) वाढते. तर चौथे, परिस्थितीचा आणि स्वत:चा स्वीकार करण्याची प्रवृत्ती वाढते.

‘डिप्रेशन’चा रुग्ण स्वत:ला अपयशी, कुचकामी, क्षुद्र समजत असतो; त्यामुळेच त्याला उदास वाटत असते. साक्षीध्यानामुळे अशी प्रतिक्रिया करण्याची सवय घालवली जाते. त्यामुळे तो स्वत:चा, स्वत:च्या आजाराचा स्वीकार करू लागतो. कोणतीही शारीरिक किंवा मानसिक वेदना मान्य केली, तिला विरोध कमी केला, की तिच्यामुळे होणारे दु:ख कमी होते. इतर प्राण्यांना वेदना होतात; पण ‘हा त्रास मलाच का होतो आहे, मीच कमनशिबी का’ वगैरे विचार त्यांच्या मनात येत नाहीत. त्यामुळे त्या विचारांचे दु:ख त्यांना नसते. माणूस मात्र हे दु:ख वाढवून घेतो. ध्यानाने परिस्थितीचा स्वीकार करण्याची क्षमता वाढली, की या विचारांनी येणारे ‘डिप्रेशन’ येत नाही.

– डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com