क्षयरोग हा फार जुन्या काळापासून माहीत असलेला रोग आहे. हा रोग सत्तर हजार वर्षांपूर्वीच्या सजीवांच्या अवशेषांत दिसून आला आहे. चार-पाच हजार वर्षांपूर्वीच्या ममींमध्येसुद्धा या रोगाची लागण झाल्याचे पुरावे दिसून आले आहेत. अनेक उदाहरणे सापडूनही या रोगामागची कारणे अठराव्या शतकापर्यंत अज्ञातच राहिली होती. इ.स. १७२० मध्ये इंग्लिश वैद्यकतज्ज्ञ बेन्जामिन मार्टिन याने क्षयरोग हा ‘सूक्ष्म सजीवां’मुळे होत असल्याचा अंदाज व्यक्त केला. या क्षयरोगाचे संसर्गजन्य स्वरूप जिया-अन्त्वान विलेमिन या फ्रेंच लष्करी वैद्यकतज्ज्ञाच्या लक्षात आले. हे स्वरूप सिद्ध करण्यासाठी विलेमनने एक प्रयोग केला. क्षयाची बाधा होऊन मृत्यू पावलेल्या एका रुग्णाच्या शरीरातून त्याने द्रव काढून तो एका सशाला टोचला. त्या सशात क्षयरोगाची कोणतीच लक्षणे दिसली नाहीत, परंतु तीन महिन्यांनी जेव्हा तो मृत्यू पावला, तेव्हा त्याच्या शवविच्छेदनात त्याच्या शरीरात मोठय़ा प्रमाणावर क्षयरोग पसरला असल्याचे दिसून आले.

क्षयरोगाचे जिवाणू शोधण्याचे प्रयत्न अनेक संशोधकांकडून केले जात होते. यासाठी अभिरंजनाची (स्टेनिंग) पद्धत वापरली जात होती. या पद्धतीत रंगद्रव्ये वापरून, ठरावीक प्रक्रियेद्वारे जिवाणूंना रंग दिला जातो. त्यामुळे हे जिवाणू सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकतात. या प्रत्येक जिवाणूच्या बाबतीत अभिरंजनासाठी कोणते रंगद्रव्य वापरले आहे आणि त्यासाठी कोणती प्रक्रिया केली आहे, यावर या पद्धतीचे यश ठरते. रॉबर्ट कॉख या जर्मन वैद्यकतज्ज्ञाने क्षयरोगाचे जिवाणू शोधण्यासाठी ही अभिरंजनाची पद्धत अनेक प्रकारे वापरून पाहिली. परंतु हे जिवाणू शोधण्यात सुरुवातीला त्याला अपयश आले. मात्र मेथिलिन ब्लू आणि वेसुविन या रंगद्रव्यांचा क्रमाने वापर करणारी विशिष्ट प्रक्रिया कॉखने शोधली आणि रंगद्रव्यामुळे निळे झालेले, लांबट आकाराचे हे जिवाणू कॉखला तपकिरी पाश्र्वभूमीवर सूक्ष्मदर्शकाखाली, सहजपणे दिसू शकले. त्यानंतर रॉबर्ट कॉखने गाईच्या रक्तद्रवाच्या माध्यमात या जिवाणूंची वाढ घडवून आणली. हे जिवाणू गिनीपिग या प्राण्यांना टोचल्यावर त्यांनाही क्षयरोग होत असल्याचे त्याने दाखवून दिले. दिनांक २४ मार्च १८८२ रोजी रॉबर्ट कॉख याने क्षयरोगाच्या मायकोबॅक्टिरियम टय़ुबरक्युलॉसिस या जिवाणूंवरील हे संशोधन बर्लिनमधील ‘सोसायटी ऑफ फिजिऑलॉजी’मध्ये सादर केले. या संशोधनामुळे रॉबर्ट कॉख १९०५ सालच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरला.

 डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org