News Flash

कुतूहल : जैवविविधता

असे म्हणतात की, पृथ्वीवर अडीच लाखांच्या आसपास फुलझाडांच्या प्रजाती आहेत.

कुतूहल : जैवविविधता

सन १९९२ मध्ये रिओ-दि-जानेरो येथे पर्यावरणासंबंधी आंतरराष्ट्रीय संमेलन पार पडले, तेव्हापासून जैवविविधता, तिचे रक्षण, संगोपन इत्यादींविषयी बरेच बोलले-लिहिले जात आहे. येत्या काळात सर्व तऱ्हेच्या जीवमात्रांच्या शाश्वतीबद्दल चच्रेत काळजी व्यक्त करण्यात आली आणि त्यांच्या संरक्षणाबद्दल विचार करण्यात आला. येथे आपण वनस्पती वैविध्याचा विचार करू या.

वनस्पती विविधता म्हणजे काय? दाट जंगल, त्यात खूप झाडे असली म्हणजे वैविध्य समजायचे का? स्वीडनची सुमारे ७०% जमीन जंगलाखाली आहे, म्हणजे ते जंगल वैविध्यपूर्ण समजायचे का? सतत आठ तास जंगल पालथे घातले तरी जेमतेम सहा वृक्षप्रजाती दिसतात. इथे खंडाळ्याच्या दरीत उतरून फक्त अर्धा-एक तास चाललो तर १५-२० वृक्षजाती भेटतात, झुडपांचा आकडा वेगळा, शिवाय गवताचे ५-६ प्रकार, आणि नेचे. जीव-वैविध्याच्या स्थळाच्या यादीत खंडाळ्याला खूप वरचे स्थान!

असे म्हणतात की, पृथ्वीवर अडीच लाखांच्या आसपास फुलझाडांच्या प्रजाती आहेत. एका अंदाजाप्रमाणे त्यातील १८,०८६ प्रजाती भारतात आहेत. पृथ्वीवर अशी विविधता कोठे निर्माण होते? जेथे हवामान जीवांना योग्य असते तेथे – १५ ते ३५ डिग्री सेल्सिअस तापमान, ४० ते ७०% आद्र्रता, १००० मिमी वा जवळपास पाऊस, सूर्यप्रकाश, जमिनीत अन्नद्रव्ये आणि अनुकूलनास सज्ज असलेली जनुके. चार्ल्स डार्वनिने    ” Survival of the fittest”   तत्त्व मांडले, म्हणजे ‘परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्याला मरण नाही’ – हे तत्त्व वनस्पतींनाही लागू होते. बदलत्या परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेण्याच्या क्रियेत नवीन प्रजाती निर्माण होतात. विविधतेत भर पडते. विविध प्रजाती, त्यापासून निर्माण होणाऱ्या नवीन प्रजाती ज्या क्षेत्रात आहेत ती क्षेत्रे त्या प्रजातींची जन्मस्थाने गणली जातात. पृथ्वीवरील अशी प्रजाती जन्मस्थाने   (Centres of Origin of Species)  पुढीलप्रमाणे – विषुववृत्तीय अमेरिका आणि आफ्रिका, भूमध्य सामुद्रिक युरोप-आफ्रिका-आशियाचा चंद्राकार सुपीक पट्टा (fertile crescent),   येथे जैवविविधता मोठय़ा प्रमाणावर आहे. भारतातील हिमालयाचा पायथा प्रदेश, ईशान्येकडील राज्ये, मध्य भारतातील विंध्य-सातपुडा डोंगर, पश्चिम आणि पूर्व घाट, अंदमान-निकोबार बेटे हे भाग वनस्पतींच्या प्रजातींची जन्मस्थाने आहेत. या जन्मस्थळांना संरक्षण मिळाले तर जैवविविधता टिकून राहण्याची शक्यता वाढेल, वाढत्या मानव-संख्येला अन्नशाश्वती मिळेल.

– प्रा. शरद चाफेकर, मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

नागर आख्यान : धगधगते मॉस्को

रशियन झार राजवटीची राजधानी इ.स. १७१२ ते १९१७ या काळात सेंट पीट्सबर्ग येथे होती. रशियावर रोमानोव्ह या घराण्याची सत्ता साधारणत तीन शतकभर टिकून होती. या काळातील झारशाहीत रशिया हा युरोप खंडातील सर्वाधिक विषमता, निरक्षरता, आíथक असमतोल, धार्मिक कट्टरता, राजकीय दडपशाही आणि झोटिंगशाही असणारा देश होता. झारशाही राजवटीच्या तीनशे वर्षांच्या इतिहासात सत्तांतरे करणाऱ्या ‘पॅलेस रिव्होल्यूशन्स’ अनेक वेळा झाल्या, परंतु लोकशाहीवादी संस्था स्थापून सामान्य जनतेचा विकास करण्याच्या हेतूने कोणतेही आंदोलन झाले नव्हते. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे एकसूत्री शासनाला पर्याय आहे हे मॉस्को आणि त्याच्या परिसरातल्या लोकांना कळले आणि झार राजवटीविरुद्ध बौद्धिक क्षोभ निर्माण झाला. फ्रान्समधील क्रांतीनंतरच्या काळातील प्रस्थापित झालेल्या राज्यघटना, लोकस्वातंत्र्य, समता यांची माहिती झाल्यावर मॉस्को आणि सेंट पीट्सबर्गच्या परिसरातील लोकांमध्ये झारशाहीविरुद्ध कट शिजू लागले. २७ डिसेंबर १८२६ रोजी झार निकोलस प्रथमच्या राज्यारोहणाच्या दिवशी सेंट पीट्सबर्ग येथे कटवाल्यांनी पहिला उठाव केला. अर्थातच हा उठाव झारने मोडून काढला आणि बंडखोरांची सबेरियात हद्दपारी केली. या बंडखोरांना ‘डिसेंबरिस्ट’ म्हणतात. झार निकोलस आणि त्यानंतरचा झार अलेक्झांडर द्वितीय यांनी काही काळ नरमाईचे धोरण स्वीकारून समाजातील वेठबिगारी बंद केली आणि स्थानिक प्रतिनिधींना काही अधिकार दिले. परंतु गुप्त संघटनांचे काम चालूच राहिले. राजकीय कैद्यांना अत्यंत क्रूर शिक्षा देणाऱ्या त्रेपोक या पोलीस अधिकाऱ्याला वेरा या तरुणीने गोळ्या घालून ठार मारले. झार अलेक्झांडर द्वितीयचा खून झाला. पोलिसांचे अनेक अधिकारी आणि खबऱ्यांचे खून पडले. पकडल्या गेलेल्या बंडखोरांची सरसकट सबेरियात हद्दपारी होत असे. डिसेंबरमधील हा उठाव म्हणजे पुढील क्रांतिकारी उठावाची नांदी होती. या उठावातून वरिष्ठ वर्गातील सुशिक्षित लोक राजकारणात येऊ लागले.  १८५५ साली झार निकोलस प्रथम मृत्यू पावला. मॉस्कोच्या चौका चौकातून लोक जमा होऊन एकमेकांना ही आनंदाची बातमी सांगत होते!

– सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2016 2:29 am

Web Title: biodiversity
Next Stories
1 नेपोलियनची चढाई व माघार
2 मॉस्कोच्या झारशाहीचा उदयास्त
3 उडीद
Just Now!
X