कर्नाटकमधील १८४ किमी लांबीची काली (काळी) नदी. नर्मदेचे पौराणिक आणि कावेरीचे राजकीय वलय नसले, तरी सहा धरणांचे ओझे अंगावर पेलणारी. सातवे नियोजित धरण बांधण्याचा घाट पूर्ण झाल्यास तिचे अस्तित्वच नष्ट होते की काय, अशी परिस्थिती. पण या सातव्या धरणाला प्रखर विरोध करत उभे राहिले ते कर्नाटकच्या दांडेली परिसरातील पर्यावरण कार्यकर्ते आणि वकील अजित नाईक!

काली नदी आणि परिसरातील जंगलाच्या होत असलेल्या विध्वंसाविरोधात अजित नाईक यांनी लढा उभारला. नदीवर बांधण्यात आलेल्या सहा धरणांवर जलविद्युतप्रकल्प सुरू आहेत. काली नदीचे पाणी प्रदूषित करणाऱ्या या प्रकल्पांना नाईक यांनी विरोध केला. या प्रदूषित पाण्याचा परिणाम नदी परिसरातील शेतकरी-गावकऱ्यांवर होत होता. नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने मासेमारी रोडावली होती. नदीच्या पाण्याने जनावरेच नव्हे, तर लहान मुलेही दगावत होती. स्त्रियांमध्ये स्त्रीरोगविषक आजार वाढत होते. जठर-आतडय़ांतील दाह, मूत्रपिंडाचे आजार बळावू लागले होते. शेतीत हे पाणी वापरल्याने अनेक ग्रामस्थांमध्ये त्वचारोगाचे आजार वाढीस लागले. हे ध्यानात घेऊन नाईक यांनी सर्व गावकऱ्यांना त्याविरोधात एकत्रित आणण्याची कामगिरी केली.

दांडेली परिसरात असणाऱ्या एका कागदनिर्मिती कारखान्याचे, तसेच इतर औद्योगिक कारखान्यांमधील रासायनिक पाणी थेट काली नदीत सोडले जात होते. सर्वच स्तरांवर पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करत असणाऱ्या कागद कारखान्याच्या विस्तारासाठी जागतिक बँकेकडून भरघोस निधी उपलब्ध झाला होता. याविरोधातही अजित नाईक उभे राहिले. कारखान्याद्वारे बेकायदेशीर ऊर्जा प्रकल्प उभारण्याविरोधात, तसेच दांडेलीजवळील जंगलातील मौलंगी येथे जमीन हडपण्याच्या विरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात गुन्हा दाखल करण्याची तयारी नाईक करत होते.

काली नदीच्या प्रदूषणाबरोबरच सहा मोठय़ा धरणांमुळे उत्तर कर्नाटकमधील सुमारे ३५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यात नियोजित सातव्या धरणामुळे दांडेली आणि आसपासच्या गावांचे अस्तित्वच संपुष्टात येणार होते. या धरणामुळे नदीच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला असता. त्यामुळे हे सातवे धरण होऊ न देणे हे नाईक यांचे ध्येय होते. भूमिपुत्रांच्या आणि ‘काली बचाव आंदोलना’च्या या अथक लढय़ाला अखेर यश आले. कर्नाटक सरकारने हा सातव्या धरणाचा प्रकल्प रद्द केला. परंतु यात अ‍ॅड. अजित नाईक यांना आपले प्राण गमवावे लागले. २७ जुलै २०१८च्या रात्री कार्यालय बंद करून घरी परतत असताना नाईक यांच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचे निधन झाले.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org