05 July 2020

News Flash

कुतूहल : छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र   

आज्ञापत्रात छत्रपतींनी आपल्या सैन्याला सूचना दिल्या आहेत.

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. लोकोत्तर राजांच्या कारकीर्दीचा अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरण प्रेम जाणवते. तसेच महाराजांची, प्रजेविषयी असलेली जबाबदारीची जाणीवही प्रतीत होते. विपुल वृक्षसंपत्ती सर्वत्र विखुरलेली असताना संरक्षणाकरिता लागणाऱ्या झाडांच्या लाकडाबद्दल महाराजांचे आज्ञापत्र याची साक्ष आहे.

या आज्ञापत्रात छत्रपतींनी आपल्या सैन्याला सूचना दिल्या आहेत. आरमारासाठी चांगले लाकूड लागते त्यासाठी आपल्या राज्यामध्ये अरण्यामध्ये सागाची झाडे आहेत. त्यातील जे उपयोगी पडेल ते योग्य परवानगीने तोडून न्यावे. याशिवाय जे लागेल ते लाकूड परमुलुखातून खरेदी करून आणावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी लाकडेही आरमाराच्या उपयोगाची आहेत. परंतु त्यांना हात लावण्याची खुली मुभा देऊ नये. याचे कारण म्हणजे ही झाडे वर्षां-दोन वर्षांत परत वाढत नाहीत. जनतेने ही झाडे लावून आपल्या मुलांसारखी भरपूर वर्षे सांभाळून वाढवली आहेत. ती  झाडे तोडल्यावर त्यांच्या दु:खास पारावर राहणार नाही. असे दु:ख देऊन काम करणारे त्या कामासकट स्वल्पकाळात बुडून नाहीसे होतात. किंबहुना राजाचे पदरी प्रजेला त्रास दिल्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावाने हानीच होते. त्याकरिता ही गोष्ट सर्वथा होऊ देऊ नये. कदाचित एखादे झाड जे भरपूर जीर्ण झाले असेल आणि कामातून गेले असेल तर त्याच्या मालकास राजी करून योग्य ते पैसे देऊन त्याच्या संमतीने आनंदाने न्यावे. झाडे तोडण्याबाबत बळाचा वापर म्हणजे बलात्कार करू नये.

शिवरायांची मुद्रा असणाऱ्या या पत्राने राज्यकर्त्यांसाठी काही आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. सर्वप्रथम लाकडासाठी फक्त सागाची झाडे योग्य परवानगीनेच तोडावी. अन्य कोणतीही झाडे कोणत्याही कारणासाठी तोडू नये. इतर उपयोगी झाडे तोडल्यास ती वाढायला भरपूर वर्षे लागतात. झाडे लावणाऱ्याच्या मनाविरुद्ध झाडे तोडल्यास प्रजेला दु:ख होते. असे दु:ख देऊन झाडे तोडल्यास कार्य सिद्धीस जात नाही. जीर्ण झाडेही कापताना त्याच्या लावणाऱ्याचे मन वळवून काम करा. आज झाडे कमी झालेली असताना. पर्यावरणाचे विज्ञान त्यांचे अस्तित्व असावे असे सप्रमाण सांगत असताना. महाराजांचे आज्ञापत्र महत्त्वाचे आहे.

– विद्याधर वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 12:07 am

Web Title: chhatrapati shivaji maharaj article kutuhal akp 94
Next Stories
1 मनोवेध : मेंदूतील भाग
2 कुतूहल : फुलपाखरांचे स्थलांतर 
3 मनोवेध : मेंदूतील बुद्धी
Just Now!
X