डॉ. यश वेलणकर

एरिक बर्न यांनी ‘बालक, पालक आणि प्रौढ’ या सिद्धांताच्या पद्धतीला ‘ट्रान्झॅक्शनल अ‍ॅनालिसिस’ म्हणजे देवाणघेवाणीचे विश्लेषण असे नाव दिले. याचे कारण त्यांच्या मते, सुप्त मनातील या प्रवृत्ती नातेसंबंधातील संवादातून- म्हणजेच माहितीच्या देवाणघेवाणीत प्रकट होत असतात. कोणत्याही माणसातील ‘पेरेन्ट’ म्हणजे पालक इगो प्रकट होतो त्या वेळी त्याला दुसऱ्याची काळजी वाटत असते, योग्य-अयोग्य या विषयी ठाम मते असतात. ती त्याच्या बोलण्यातून जाणवतात. ‘चाइल्ड’ म्हणजे बालक इगोमध्ये असणारी व्यक्ती आधाराची अपेक्षा असलेली, भविष्याचा फारसा विचार न करणारी अशी असते. ‘अ‍ॅडल्ट’ म्हणजे प्रौढ इगो हा माहितीचे विश्लेषण करणारा असतो.

एखादा माणूस दुसऱ्याला उपदेश करीत असताना पालक या भूमिकेत असतो आणि समोरील व्यक्ती बालक या भूमिकेत आहे हे त्याने गृहीत धरलेले असते. मात्र ऐकून घेणारी व्यक्ती बालक भूमिकेत राहू इच्छित नसेल तर संघर्ष सुरू होतो. याचसाठी कोणताही संवाद परिणामकारक करायचा असेल, तर समोरील व्यक्तीच्या इगोची त्या-त्या वेळची अवस्था (इगो स्टेट) समजून घेणे आवश्यक असते.

‘प्राप्ते तु षोडषे वर्षे पुत्रे मित्रवत् आचरेत’ (सोळा वर्षांवरील अपत्यांना मित्र समजून जन्मदात्यांनी वागावे) असे एका संस्कृत सुभाषितात सांगितले आहे, ते याच अर्थाने आहे! दोन मित्र एकमेकांशी समान पातळीवर राहून गप्पा मारत असतात, त्या वेळी दोघेही प्रौढ या भूमिकेत असतात. ते माहितीची देवाणघेवाण करीत असतात. पण त्यामध्येदेखील एखादा मित्र अकारण उपदेश करू लागतो त्या वेळी ‘तो शहाणपणा शिकवतो’ असे म्हणून अन्य मित्र त्याला टाळू लागतात. सोळा वर्षांच्या मुलांना त्यांच्या काळजीपोटी आई-वडील असा उपदेश करू लागतात, त्या वेळी स्वत:ला प्रौढ समजू लागलेली मुले त्यांना टाळू लागतात, उलट उत्तरे देऊ  लागतात. पालक इगो हा उपदेश करणारा, शिकवणारा असतो, तर बालक इगो लहान मुलासारखा हसणारा, रुसणारा, कल्पनेत रमणारा आणि नवीन शिकायला उत्सुक असतो. सर्जनशीलतेसाठी हा इगो आवश्यक असतो. कोणत्याही एकाच इगोमध्ये सतत न राहता जाणीवपूर्वक आपण आपला इगो बदलू शकतो. वय वाढल्यानंतरदेखील निज शैशवास जपणे म्हणजे असे बालक होऊन थोडीशी मजा करणे, काही तरी नवीन शिकणे होय. संवाद साधताना स्वत:चा ‘इगो स्टेट’ आवश्यकतेनुसार बदलणे गरजेचे असते.

yashwel@gmail.com