News Flash

गोंडवनचा पीर- हेमेनडॉर्फ

एक परकीय, ऑस्ट्रियन ख्रिस्तॉफ हेमेनडॉर्फ हे मानववंशशास्त्रज्ञ हैदराबाद संस्थानात गोंड आदिवासी पाडय़ांमध्ये राहिले ते त्यांच्या सामाजिक जीवनाचा आणि वंशशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी.

एक परकीय, ऑस्ट्रियन ख्रिस्तॉफ हेमेनडॉर्फ हे मानववंशशास्त्रज्ञ हैदराबाद संस्थानात गोंड आदिवासी पाडय़ांमध्ये राहिले ते त्यांच्या सामाजिक जीवनाचा आणि वंशशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी. आदिलाबाद जिल्ह्य़ातील मार्लवई नावाच्या एका छोटय़ा खेडय़ात १९४२ ते १९४४ अशी तीन वष्रे पत्नी एलिझाबेथसह आदिवासी पाडय़ांमध्ये राहिले. दोघांनीही गोंडी-कोलामी भाषेवर प्रभुत्व मिळवलं होतं. त्यांच्या चालीरीती, परंपरा त्यांनी आत्मसात केल्या. आदिवासींच्या विकासकार्यात शिक्षणाचं महत्त्व ओळखून हेमेनडॉर्फनी मार्लवई आणि आसपासच्या गावांमधून शाळा आणि अध्यापक वर्गाचं जाळं निर्माण केलं. आदिवासी भागातील दारूच्या दुकानांवर बंदी घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सरकारदरबारी आपलं वजन खर्च करीत, आदिवासींना शेतजमिनी मिळवून देण्यात, शेतीतंत्रात सुधारणा करण्यात ख्रिस्तॉफ यांची कामगिरी लक्षणीय होती.

आपल्या सुखदु:खाशी समरस झालेल्या, आपली भाषा बोलणाऱ्या या गोऱ्या परदेशी दाम्पत्याला आदिवासी समाजानं आपल्यात पूर्णपणे सामावून घेतलं. एलिझाबेथला ते मार्लवई गावची लेक मानत! मार्लवई गावचा आदिवासी सरपंच होता लच्छू पटेल. हेमेनडॉर्फ दाम्पत्याने, पुढे झालेल्या आपल्या पहिल्या अपत्याचं नाव लच्छू पटेल ठेवलं! आदिवासी जनजीवनाबद्दल अपार ओलावा असलेले हेमेनडॉर्फ एखाद्या रूक्ष संशोधकाच्या भूमिकेतून कधीच वावरले नाहीत. आदिवासी जीवनाबद्दल हेमेनडॉर्फनी १६ ग्रंथ लिहिले. ‘द गोंड्स ऑफ आंध्र प्रदेश’, ‘द रेड्डीज ऑफ बीसन हिल्स’, ‘द राज गोंड्स ऑफ आदिलाबाद’, ‘द चेंचूझ’, ‘द हिमालयन ट्राइब्स’ हे त्यापकी काही मान्यताप्राप्त ग्रंथ.

हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर हेमेनडॉर्फनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते लंडनला गेले. १९८७ साली त्यांच्या पत्नी एलिझाबेथ लंडनमध्ये वारल्या. विशेष म्हणजे एलिझाबेथ यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर लंडनमध्ये हिंदू पद्धतीने दहन करून त्यांच्या अस्थींचे दफन तेलंगणात  मार्लवईत केले गेले. ख्रिस्ताफना तेलंगणाच्या आदिवासी पाडय़ांची ओढ एवढी होती की ते दरवर्षी लंडनहून येऊन आठ-पंधरा दिवस तिथे राहत असत. १९९५ मध्ये लंडनमध्ये त्यांचे निधन झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:51 am

Web Title: christoph hammondorf 2
Next Stories
1 दुभंग
2 हेमेनडॉर्फचे आदिवासी-विषयक अहवाल
3 कुतूहल : धरतीचं वय
Just Now!
X