News Flash

कुतूहल – शेतजमिनीचे वर्गीकरण – ३

खालसा जमीन : ज्या जमिनीच्या वसुलीचा मालक सरकार आहे, सरकारने वहिवाटलेली अथवा जप्त केलेली जमीन व त्याबरोबर इनामी अथवा व

| October 25, 2013 12:05 pm

खालसा जमीन : ज्या जमिनीच्या वसुलीचा मालक सरकार आहे, सरकारने वहिवाटलेली अथवा जप्त केलेली जमीन व त्याबरोबर इनामी अथवा वतनी जमिनीचे हक्क संपुष्टात आल्यावर खाजगी मालकीहक्कात ज्याचे वर्गीकरण झाले आहे, अशा जमिनीस खालसा जमीन म्हणून संबोधले जाते. सरकारला ठराविक नजराणा भरून आणि जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन खालसा जमीनधारकाला अशा जमिनीची विक्री करता येते अन्यथा विक्री करता येत नाही.
आदिवासी जमीन : आदिवासींना त्यांच्या उपजिविकेसाठी त्यांनी स्वत: कसण्याच्या बोलीवर ज्या जमिनी त्यांना सरकारने प्रदान केलेल्या असतात, त्या जमिनी आदिवासी जमिनी म्हणून ओळखल्या जातात. सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय बिगर आदिवासी व्यक्तींना अशा जमिनी कोणत्याही सबबीखाली खरेदी करता येत नाहीत. अन्यथा असे व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात. त्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही. एवढेच नव्हे तर अशा बिगर आदिवासी खरेदीदारास न्यायालयात स्वत:चा बचाव करण्यासाठी वकिलाची नेमणूकही करता येत नाही. म्हणजेच, आदिवासी जमिनी सरकारच्या यथायोग्य कायदेशीर परवानगीशिवाय खरेदी करता येत नाहीत.
महाराष्ट्रात फक्त शेतकरी असलेली व्यक्तीच शेतजमीन खरेदी करू शकते.असा खरेदी व्यवहार करताना व्यक्ती शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून त्यांच्या इतरत्र वा अन्य राज्यात असलेल्या त्या व्यक्तीच्या शेतजमिनीच्या सातबाराचा उतारा खरेदी पत्रासोबत जोडल्याशिवाय असा व्यवहार पूर्ण होत नाही वा करता येत नाही. म्हणजेच, बिगर शेतकरी व्यक्ती जमीन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात अपात्र ठरते. कुटुंबातील पती वा पत्नी लग्नापूर्वी शेतकरी असतील तर ते लग्नानंतर शेतकरी ठरतात व त्यांची मुलेही आपोआपच शेतकरी या संज्ञेत येतात व यासाठी पात्र ठरतात. कायद्याप्रमाणे शेतजमीन खरेदी करण्यास बिगर शेतकरी व्यक्ती पात्र नसते.
शेतजमिनीचा वापर शेती, विहीर अथवा तळी खोदणे, शेतीच्या जनावरांसाठी गोठे बांधणे, शेतमाल व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी निवारे व शेड बांधणे, शेतजमीन मालकासाठी व शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी निवासस्थाने बांधणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी करता येतो.
– भरत कुलकर्णी (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  –  सुरस कथा/पुराणे
एकदा एका बऱ्यापैकी भरलेल्या सभागृहात मी ज्ञानेश्वरीवर गोष्टी सांगत तडाखेबंद भाषण दिले. ज्ञानेश्वरीवर बोलताना आर्जव मार्दव वठवायचे असते आणि भक्तिरसाने ओथंबून निघायचे असते, ते मला काही जमत नाही. ‘भिडलास तर छातीत पळालास तर पाठीत बाण घुसतील तेव्हा तुझे तू ठरव’ ह्या ओवीनेच मी ग्रासला गेलो आहे. सभा आटोपल्यावर सगळे चालते पडले. थोडेफार सभ्य छान बोललात म्हणाले. एक शहाणा थांबला आणि म्हणाला, आज तुम्ही नवे काय सांगितलेत. हे सगळे मला माहीत होते. मी चपापलो, सावरलो आणि त्याच्या छातीत बाण मारत म्हणालो, ‘तुला हे कसे कळले? स्वप्नात आले का? तेव्हा तो वरमला आणि म्हणाला, नाही, नाही. आईवडिलानी सांगितले आणि वाचलेही आहे. मी त्याला म्हटले, तुझ्या आईवडिलांनाही कोणीतरी सांगितले असणार. परंपरेने आलेल्या ह्य़ा गोष्टी आहेत. गोष्टीवर समाज तगतो, तत्त्वज्ञानावर नाही. किंबहुना तत्त्वज्ञानात प्रकांड असलेला जर पुराणातल्या गोष्टी सांगू शकत नसेल तर त्याची विद्वत्ता व्यर्थ आहे असे एक संस्कृत सुभाषित आहे. खरे तर महाभारत आणि रामायण दोन्हीही पुराणे ह्य़ा सदरातच मोडतात.
जिथे पुरा (जुने) नव (नवे) भवति (होते) ते पुराण अशी व्याख्या आहे. पुराणांमुळे भूगोल कळतो. रामाच्या वनवासात तो कुठून कुठे गेला वगैरे चालीरीती कळतात, इतिहासाचा स्पर्श जाणवतो. विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव, चालवणारा विष्णू, मारणारा शंकर, नारद नावाचा मुत्सद्दी, गाणारे, भूल घालणारे गधर्व आणि किन्नर आणि दुष्ट राक्षस वगैरे गोष्टीमुळे मनाची थोडीफार घडी व्हायला मदत होते.
ज्ञानेश्वरीत अष्टादशपुराणे तीच गणपतीच्या अंगावरची मणिभूषणे आहेत अशी पाचव्या ओवीची सुरवात आहे. ही रत्ने पद्याच्या कोंदणात बसवली आहेत, असा ओवीचा उत्तरार्ध आहे. तत्त्वज्ञानाची प्रमेय पद्यामध्ये रोवली आहेत असा अर्थ आहे. शंकराचार्यावरच्या मेनन यांच्या पुस्तकात ‘देवपूजा, घंटा वाजवणे, प्रसाद देणे-घेणे, उदबत्ती लावणे, फुले वाहणे ही लहान मुलांना खेळणी देतात, त्याप्रमाणे केलेली व्यवस्था’ आहे असे विधान आहे. त्यात चेष्टेचा उद्देश नाही. वस्तुस्थितीचा उलगडा आहे. प्रमेय सांगण्यासाठी गोष्टी असतात तसेच हे. शेवटी लुगडय़ाला काठ-पदर, दारावर तोरण आणि मंडपाला कनात असावी लागते.
पुराणांच्या लेखकांच्या कल्पनाशक्तीला माझा सलामच. सर्पमुख अस्त्र, वज्रास्त्र, अग्नीचे अस्त्र असल्या कल्पना वाचल्या की हल्लीच्या Cobra gunship Thunderbolt Missile   किंवा Spitfire Aircraft या गोष्टी समोर येतात. ते आहे विज्ञानाचे विद्रूप स्वरूप आणि तंत्रज्ञानाचे आविष्कार. त्याबद्दल उद्यापासून.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – आयर्न डेफिशियन्सी : आयुर्वेदीय इलाज
मानवी जीवनात दिवसेंदिवस विविध रोगांचे, जुन्यानव्या नवनव्या रोगांचे वाढते आक्रमण आहे. जितकी मानवी सुधारणेची रंगीबेरंगी स्वप्ने तुम्ही आम्ही पाहतो, तितकेच रोगजंतूंचे तुमच्याआमच्या मानवी शरीरावर दर क्षणाला आक्रमण होत असते. त्यामुळे आपणाला विविध रोगसमस्यांकरिता आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवावी लागते. शहरी जीवनात अनियमितता आली आहे. जीवनशैली बदलली आहे. अमेरिका, जपान, जर्मनी, इंग्लंड येथे जेव्हा दिवस असतो तेव्हा त्यांच्या सोयीकरिता ‘आम्ही कॉम्प्युटरवाली मंडळी रात्रपाळी करतो. रात्रपाळी केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी पुरेशी झोप घेता येत नाही. आसपासचे प्रदूषण, सतत वाघ मागे लागल्यासारखे काम, अवेळी, अपुरे, निकस जंकफूड, क्वचित तंबाखू, मद्यपानासारखी व्यसने यामुळे शरीराचे सम्यक पोषण होत नाही. खाल्लेल्या अन्नाचे आहाररसात, आहाररसाचे रसधातूत, रसधातूचे रक्तधातूत परिणमन होत असते, असा सामान्य शरीर पोषणाचा, रक्त बनण्याचा निसर्गनियम आहे. शरीरात चांगले रक्त बनले तर तुम्ही आम्ही रोज नव्या जोमाने कोणत्याही आवाहनांचा ‘दणदणादण’ सामना करत असतो. आपल्या शरीरात पुरेसे रक्त बनले तर शरीरात ‘नैसर्गिक लोह’ तयार होते, असे मानवी वंशशास्त्रज्ञ म्हणतात.
प्राचीन काळापासून पांडुरोग ही संज्ञा प्रसिद्ध आहे. सामान्यपणे वयात आलेल्या माणसाचे रक्ताचे प्रमाण तेरा ते सतरा असायला हवे असते. रक्त खर्च होण्याचा वेग ईएसआर १०-१५चे वर नको असतो. हातापायांना मुंग्या, पोटऱ्या दुखणे, अकाली थकवा, डोळे, नखे, त्वचा पांढुरकी झाली की थोर थोर डॉक्टर वैद्य मंडळी, आयर्न डेफिशियन्सीकरिता आयर्न गोळय़ा सुचवितात. शरीराने त्यांचे मोठे डोस सात्म्य केले नाही की मलप्रवृत्ती काळी होते. खूप आयर्न टॅब्लेट खाण्यापेक्षा पालेभाज्या, टरफलासकट कडधान्ये, विविध ताजी फळे, चंद्रप्रभा, सुवर्णमाक्षिकादिवटी, पुष्टीवटी, लाक्षादिगुग्गुळ, आस्कंदचूर्ण यांचा सहारा घ्या. आयर्न डेफिशियन्सी समस्या संपवा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – २५ ऑक्टोबर
१९२२ > प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक पांडुरंग नारायण कुलकर्णी यांचा जन्म. ‘संशोधन धारा’ या ग्रंथातून त्यांनी प्राचीन कवींच्या कवितांवर तोपर्यंत झालेल्या संशोधनातील चुका दाखवून निर्णायक मत व्यक्त केले. याशिवाय ‘नागेशमाहात्म्य’चे संपादन त्यांनी केले.
१९३७ > संगीताचार्य अशोक दामोदर रानडे यांचा जन्म. ‘म्युझिकॉलॉजी’ (संगीतशास्त्र) या विषयाचे मराठीतील दालन त्यांच्यामुळे समृद्ध झाले, ‘व्हॉइस कल्चर’ (आवाज साधनाशास्त्र) हा शब्दही मराठीत त्यांच्यामुळे रुजला. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक, राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्राचे उपसंचालक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. ‘भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ’, ‘संगीताचे सौंदर्यशास्त्र’, ‘लोकसंगीतशास्त्र’ अशी मराठी पुस्तके, तर मराठी व भारतीय नाटय़संगीत, चित्रपट संगीत आदींवर इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली होती. जुलै २०११ मध्ये ते निवर्तले.  
१९९८ > वेद, वैदिक विधी, पुराणे, आर्षकाव्ये यांचे विवेचक सदाशिव अंबादास डांगे यांचे निधन. ‘पुराणकथांचा अर्थ : वाद आणि विवेचन’, ‘हिंदू धर्म व तत्त्वज्ञान’, ‘अश्वत्थाची पाने’ या मराठी पुस्तकांशिवाय काही इंग्रजी पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2013 12:05 pm

Web Title: classification of agricultural land 3
टॅग : Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल – शेतजमिनीचे वर्गीकरण – २
2 कुतूहल – शेतजमिनीचे वर्गीकरण- १
3 कुतूहल – शेतजमिनीचा इतर कारणांसाठी वापर
Just Now!
X