News Flash

कुतूहल –  कृतिशील गणित शिक्षण

एखादा अभ्यासू विद्यार्थी पाय ही अपरिमेय संख्या आहे असे उत्तर देईल, पण ‘पाय हा वैश्विक स्थिरांक आहे.

कुतूहल –  कृतिशील गणित शिक्षण

पाय ही संख्या सर्वांना परिचयाची असते, पण पायबद्दल तुम्हाला काय आठवते? असा प्रश्न विचारल्यास २२/७, ३.१४ अशीच उत्तरे दहापैकी नऊजण देतात. एखादा अभ्यासू विद्यार्थी पाय ही अपरिमेय संख्या आहे असे उत्तर देईल, पण ‘पाय हा वैश्विक स्थिरांक आहे. कितीही मोठे अथवा लहान वर्तुळ असले तरी त्याच्या परिघाचे व्यासाशी असणारे गुणोत्तर समान असते आणि त्या गुणोत्तराला पाय म्हणतात’ हे उत्तर देणारा विद्यार्थी क्वचितच सापडतो. यात विद्यार्थ्यांची फारशी चूक नसते. कारण पुस्तकात व्याख्या असली तरी या स्थिरांकाचे वैश्विक असणे त्यांनी अनुभवलेलेच नसते. वहीत, फळ्यावर, मैदानात वेगवेगळ्या आकाराची वर्तुळे काढून त्यांचा परीघ व व्यास मोजून, गुणोत्तर सारखेच येते हे पडताळण्याचा सोपा प्रयोग वर्गात केला तर तो आनंददायी अनुभव पाय या संख्येचे सौंदर्य, महत्त्व, व्याख्या हे सगळेच मनावर ठसवील.

विज्ञानासाठी बहुतेक शाळांमध्ये प्रयोगशाळा असतात. कृतीतून स्वत: वैज्ञानिक तत्त्वे शोधणे मुलांसाठी अपार आनंदाचे ठरते आणि स्मरणातही राहते. गणितालाही हे तितकेच लागू आहे. पण अजूनही गणित प्रयोगशाळा ही संकल्पना आपल्याकडे फारशी रुजलेली नाही. अमूर्तता हे गणिताचे सौंदर्य; पण अनेकदा, विशेषत: शालेय पातळीवर, ही अमूर्तता संकल्पना समजण्यातला अडथळा ठरते. संकल्पना समजली नाही तर विषयाची भीती, नावड निर्माण होते. अनुभवजन्य गणित शिक्षण हा यावरचा प्रभावी उपाय आहे असे सर्व शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. खरे तर गणिताच्या प्रयोगशाळेकरता फार महाग उपकरणे, यंत्रेही गरजेची नाहीत. भूमितीतल्या अनेक संकल्पना ओरिगामी प्रतिकृतींमधून शिकवता येतात. पुठ्ठे, कागद, दोरे अशा सहज उपलब्ध वस्तूंमधून विद्यार्थी स्वत:च शिक्षकाच्या मदतीने या प्रतिकृती बनवू शकतील.

शालेय भूमितीतले त्रिकोणांचे, चौकोनांचे गुणधर्म, क्षेत्रफळाची, घनफळाची सूत्रे, बैजिक सूत्रांच्या भौमितिक सिद्धता, पायथागोरसच्या प्रमेयाच्या वेगवेगळ्या सिद्धता हे सर्व कागदी घडय़ांमधून वा कागद कापून सिद्ध करता येते. कागदी नळी आणि कोनमापक वापरून क्लीनोमीटर बनवून इमारतीची वा झाडाची उंची शोधण्याचा प्रयोग त्रिकोणमितीची उपयोगिता मनावर बिंबवू शकतात. सावलीची लांबी मोजून झाडाची उंची शोधणे, भास्कराचार्यांनी सांगितलेली अक्षांश, रेखांश वापरून पृथ्वीचा परीघ शोधण्याची पद्धत वापरून पाहणे असे अनेक कल्पक आणि अत्यल्प खर्च असणारे प्रयोग शालेय शिक्षणात सहज वापरता येऊ शकतात. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील गणित प्रयोगशाळा व त्याविषयीची मार्गदर्शक पुस्तिका या संदर्भात उपयुक्त ठरू शकतात. जिओजिब्रासारख्या संगणक प्रणालीही गणित शिक्षणात गुरुकिल्ली ठरतात.

– प्रा. माणिक टेंबे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 1:34 am

Web Title: creative mathematics teaching zws 70
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : स्लोव्हाकिया
2 कुतूहल: असा असावा गणितशिक्षक
3 नवदेशांचा उदयास्त – चेक प्रजासत्ताक
Just Now!
X