हवेतील प्रदूषकांच्या दुष्परिणामांबद्दल चर्चा करत असताना मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचीच जास्त चर्चा होते, प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपायांचा विचार करण्यात येतो. परंतु सजीव सृष्टी, विविध परिसंस्था यांच्यावरदेखील हवेच्या प्रदूषणाचे विघातक परिणाम होत असतात, हे सहसा ध्यानात घेतले जात नाही. परिसंस्था मुळातच अतिशय सक्षम आणि सहनशील असतात. त्यामुळे त्यांतील घटकांवर; विशेषत: वनस्पती-वृक्षवेलींवर होणारे दुष्परिणाम हे आपल्याला जाणवत नाहीत किंवा दिसून येत नाहीत. प्राण्यांच्या तुलनेत वनस्पती सातत्याने विविध प्रकारच्या घातक प्रदूषकांच्या थेट संपर्कात येत असतात. विशेषत: औद्योगिक वसाहतींमधील किंवा अतिशय वर्दळीच्या रस्त्यांच्या कडेची झाडे अशा प्रदूषकांना सामोरे जात असतात. हवेतील वायुरूपात असलेली सल्फर आणि नायट्रोजनची ऑक्साइड्स, त्याचप्रमाणे कार्बन मोनॉक्साइड आणि हवेत तरंगणारे सूक्ष्म धूलिकण ही प्रदूषके झाडांच्या पानांवर असलेल्या असंख्य सूक्ष्म छिद्रांमधून (पर्णरंध्रे) पानाच्या अंतर्गत भागात शिरतात आणि शेवटी पेशींमध्ये प्रवेश करतात. या प्रदूषकांमुळे वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषण, श्वसन आणि ऊर्जानिर्मिती प्रक्रिया, पर्णरंध्रांची उघडझाप करण्याची प्रक्रिया, या व अशा विविध चयापचयाच्या (मेटॅबॉलिझम) क्रियांवर विपरीत परिणाम होतो.

परंतु या पेशींमध्ये अशा प्रदूषक रेणूंना प्रतिसाद देऊन विशिष्ट रासायनिक प्रक्रियांद्वारे आपल्या ‘अंतर्गत पर्यावरणात’ अनुकूल असे बदल घडवून आणण्याची नैसर्गिक क्षमता असते. हे बदल घडवून आणताना, वनस्पतींची ‘संवेदनशीलता’ किंवा ‘सहनशीलता’ किती प्रमाणात आहे याचे निदान करण्यासाठी पानांमधील पीएच (pH), हरितद्रव्याचे (क्लोरोफिल) प्रमाण, अ‍ॅस्कॉर्बिक अ‍ॅसिड (क जीवनसत्त्व) आणि पेशीद्रव्यातील पाण्याचे सापेक्ष प्रमाण (रिलेटिव्ह वॉटर कंटेण्ट) या चार प्रमुख घटकांचे विश्लेषण करून ‘एअर पोल्युशन टॉलरन्स इण्डेक्स (एपीटीआय)’ म्हणजेच हवेचे प्रदूषण सहन करण्याच्या क्षमतेचा निर्देशांक काढण्याचे शास्त्र गेल्या काही दशकांमध्ये विकसित झाले आहे.

हा निर्देशांक काढण्यासाठी शुद्ध आणि प्रदूषणविरहित वातावरणात वाढत असलेली एका ठरावीक प्रजातीची झाडे आणि त्याच प्रजातीची औद्योगिक क्षेत्रात, अतिप्रदूषित वातावरणात वाढत असलेली झाडे निवडण्यात येतात. या घटकांपैकी पीएच, हरितद्रव्याचे प्रमाण, अ‍ॅस्कॉर्बिक अ‍ॅसिड यांचे प्रमाण तपासण्यासाठी विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करून या झाडांच्या पानांचा रस काढण्यात येतो. शास्त्रीय पद्धतीने रसातील घटकांचे विश्लेषण केल्यानंतर ती वनस्पती प्रदूषणाला किती संवेदनशील आहे किंवा सहनशील आहे, याचे अनुमान काढण्यात येते. औद्योगिक किंवा अतिप्रदूषित हवेत मोठय़ा प्रमाणावर झाडे लावायची असतात, अशा वेळी हा निर्देशांक उपयोगी ठरतो.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org