21 November 2019

News Flash

रोग संक्रमण

फ्रेंच वैद्यकतज्ज्ञ लुई पाश्चरच्या, १८६० च्या दशकातल्या बायोजेनेसिस सिद्धांतानुसार जीवाची उत्पत्ती ही जीवापासूनच व्हायला हवी.

फ्रेंच वैद्यकतज्ज्ञ लुई पाश्चरच्या, १८६० च्या दशकातल्या बायोजेनेसिस सिद्धांतानुसार जीवाची उत्पत्ती ही जीवापासूनच व्हायला हवी. खाद्यपदार्थाचा उघडय़ा हवेशी संपर्क आला, की त्यात जंतू, अळ्या, बुरशी यांसारखे जीव वाढतात, हे पाश्चरने आपल्या प्रयोगांद्वारे दाखवून दिले. मात्र मानव, प्राणी आणि वनस्पतींमध्ये रोगनिर्मिती ही नेमकी कशी होते, याचे कारण मात्र तोपर्यंत समजू शकलेले नव्हते. रोगनिर्मितीलासुद्धा सूक्ष्मजीव कारणीभूत असावेत, असे गृहीतक मांडून, त्या गृहीतकाची सत्यता पडताळण्यासाठी पाश्चरने रोगग्रस्त प्राण्यांतील सूक्ष्मजंतूंचा शोध घेण्यास सुरुवात केली.

लुई पाश्चरने आपल्या या संशोधनाची सुरुवात रेशमांच्या किडय़ांवरील रोगापासून केली. रेशमाच्या किडय़ांना होणाऱ्या पेब्रिन नावाच्या रोगामुळे फ्रान्समधील रेशीम उद्योग संकटात सापडला होता. या रोगात रेशमाच्या किडय़ांवर काळे ठिपके निर्माण होत. अशा किडय़ांपासून योग्य आणि पुरेसे रेशीम मिळत नसे. हा पेब्रिन रोग ज्या सूक्ष्म जीवाणूंमुळे होतो ते जीवाणू पाश्चर याने १८६५ साली शोधून काढले. रेशमाच्या किडय़ांच्या अंडय़ात परजीवी म्हणून राहणारे नोझेमा बॉम्बिसिस हे गोलाकार सूक्ष्म जीवाणू मुख्यत: पेब्रिनला कारणीभूत ठरत होते. जर अशी रोगट अंडी काढून टाकली आणि रेशमाच्या किडय़ांची पदास काळजीपूर्वक केली, तर या रोगाला आळा घालता येतो, हे पाश्चरने दाखवले. त्यानंतर त्याने गाईगुरे, डुकरे, कोंबडय़ा, तसेच माणूस यांना होणाऱ्या विविध रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंचा शोध घेतला.

पाश्चरने आपले पुढील प्रयोग कोंबडीच्या पिल्लांवर केले. कोंबडय़ांच्या पिल्लांना कॉलरा या रोगाचा प्रादुर्भाव नेहमी होतो, हे त्याला माहीत होते. या रोगाच्या जीवाणूंना प्रयोगशाळेत रोगट कोंबडय़ांच्या पिल्लांच्या शरीरातून त्याने वेगळे केले. त्यानंतर योग्य अशा पोषक माध्यमात या जीवाणूंची वाढ करून, त्यांना शुद्ध अवस्थेत मिळवण्यात तो यशस्वी झाला. हे शुद्ध अवस्थेतील जीवाणू निरोगी कोंबडय़ांच्या पिल्लांमध्ये टोचल्यावर त्यांना कॉलऱ्याचा प्रादुर्भाव झाला. मात्र हा कॉलरा होण्यास, कॉलऱ्याचेच जंतू हवेत; इतर रोगाच्या जीवाणूंमुळे कॉलरा होत नाही, हे त्याच्या लक्षात आले. अँथ्रॅक्स, अमांश अशा विविध रोगांवर त्याने याच प्रकारचे प्रयोग केले. विशिष्ट रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या विशिष्ट रोगजंतूंमुळेच तो रोग होतो, हे पाश्चरने सिद्ध केले. लुई पाश्चरच्या या सिद्धांताला ‘रोगसंक्रमणाचा सिद्धांत’ म्हटले जाते.

– डॉ. रंजन गग्रे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on July 4, 2019 12:04 am

Web Title: disease infection mpg 94
Just Now!
X