गेल्या दोन सहस्रकांमध्ये परदेशांतून भारतात आलेल्यांपैकी बहुतेक जण काहीतरी लाभाच्या आशेने इथे आले. त्यापैकी अनेकांनी आपल्या मूळच्या हेतूबरोबरच भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि समाजकल्याणही साधले. या पाश्र्वभूमीवर, केवळ समाजकल्याण हाच हेतू मनाशी धरून नि:स्पृहतेने पंजाबमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या ब्रिटिश नागरिक डेम एडिथ मेरी ब्राऊन यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आशियातील स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षणाचे दालन प्रथमच उघडणाऱ्या, लुधियानातील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या संस्थापिका एडिथ मेरी ब्राऊन या मूळच्या ब्रिटिश नागरिक होत.

एडिथचा जन्म १८६४ सालचा इंग्लंडमधील कंबरलँड परगण्यातला. थोरली बहीण मिशनरी होती. तिने एडिथमध्ये वैद्यकीय मिशनरी कार्याची आवड निर्माण केली. केंब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून एडिथने वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर ती बाप्टिस्ट मिशन सोसायटीमार्फत १८९१ मध्ये भारतात लुधियानाला आली. त्या काळात स्त्रिया पुरुष वैद्याकडे औषधोपचारासाठी जात नसत. पंजाबमधील तत्कालीन वैद्यकीय सुविधांची अत्यंत खराब स्थिती पाहून एडिथला धक्काच बसला.

तिने मग लुधियानात एका भाडय़ाच्या जागेत आपल्या काही मिशनरी सिस्टर्सच्या सहकार्याने १८९४ साली एक छोटे रुग्णालय आणि स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची शाळा सुरू केली. पहिल्या वर्षी या ‘नॉर्थ इंडियन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन’मधून चार मुली प्राथमिक वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडल्या. उत्तरोत्तर विद्यार्थिनींची संख्या वाढत जाऊन या ‘मेडिकल स्कूल’चे रूपांतर १९५२ साली ‘ख्रिश्चन मेडिकल कॉलेज’मध्ये झाले; म्हणजेच, त्याच वर्षी पूर्ण स्वरूपातला एमबीबीएस शिक्षणक्रम येथे सुरू झाला. आता इथे पुरुष विद्यार्थ्यांनाही प्रवेश आहे. कॉलेजला जोडून असलेल्या छोटय़ा रुग्णालयाचे रूपांतर १९५७ साली ‘ब्राऊन मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये झाले आहे. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीसोबतच आलेल्या फाळणी व दंगलींमध्ये आणि पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना वैद्यकीय उपचार आणि आश्रय देण्याचे मोठे समाजकार्य या ब्राऊन मेमोरियल हॉस्पिटलने केले. एडिथ ब्राऊन यांचे निधन श्रीनगरमध्ये १९५६ साली झाले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com