मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील बेपत्ता मूलद्रव्य शोधण्यासाठी किमयागारांमध्ये सुरू असलेल्या चुरशीत हंगेरियन रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज हेवसी हे हाफ्निअम शोधून काढण्यात यशस्वी झाले. नील्स बोहर यांच्या अणू-प्रतिकृतीच्या आधारे ७२ प्रोटॉन्स असलेल्या मूलद्रव्याचा शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली आणि १९२२ मध्ये या मूलद्रव्याचा शोध त्यांनी लावला.

जॉर्ज हेवसी यांचा जन्म एक ऑगस्ट १८८५; बुडापेस्ट येथील एका प्रतिष्ठित घराण्यातला. बुडापेस्ट येथे शालेय शिक्षण संपवून त्यांनी बुडापेस्ट विद्यापीठ, पुढे बर्लिनमधील तंत्र-विद्यापीठ आणि फ्रॅबर्ग (freiburg) येथील विद्यापीठात रसायनशास्त्राचा अभ्यास केला. सन १९०८ मध्ये भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यावर काही काळ त्यांनी कार्ल्सरुहे इथे फ्रिट्झ हेबर यांच्याबरोबर तर मँचेस्टरला अन्रेस्ट रुदरफोर्ड यांच्यासह काम केले. त्यानंतर त्यांनी बुडापेस्ट, फ्रॅबर्ग, कॉन्रेल विद्यापीठ, नील्स बोहर संस्था, स्टॉकहोम येथील सेंद्रिय रसायनशास्त्र संशोधन संस्था अशा विविध ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम केले.

खनिजातील समस्थानिकांना एकमेकांपासून विलग करण्याचे काम करत असताना १९२२ साली जॉर्ज हेवसी व त्यांचे सहकारी यांनी खनिजाच्या क्ष-किरण वर्णपटावरून हाफ्निअम या मूलद्रव्याचा शोध लावला.

यानंतर हेवसी यांनी क्ष-किरण प्रतिदीप्ती (फ्लुरोसन्स) विश्लेषण पद्धती विकसित केली आणि समारिअम-अल्फा किरणांचा शोध लावला. या दरम्यानच हेवसी यांनी नैसर्गिक किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग करून प्राण्यातील चयापचयगतीचा अभ्यास सुरू केला. रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करण्यासाठी समस्थानिकांचा वापर करण्याच्या संशोधनासाठी १९४३ मध्ये रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले.  नैसर्गिक किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर ‘किरणोत्सारी दर्शक’ म्हणून होण्याची सुरुवात इथूनच झाली. सन १९२३ मध्ये हेवसी यांनी ‘212- Pb’ या नैसर्गिक किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर किरणोत्सारी दर्शक म्हणून करून घेवडय़ाची मुळे, खोड, पाने यांत होणारे शोषण व स्थानांतर यावर एक शोधनिबंध प्रसिद्ध केला.

आपल्या कार्यकाळात हेवसी यांना अनेक मानसन्मान लाभले. कोपले पदक, फॅरॅडे पदक हे त्यापैकीच! उप्पास्ला, कोपनहेगन, फ्रॅबर्ग आणि इतर युरोपीय विद्यापीठांनी मानद डॉक्टरेटच्या पदवीने त्यांचा सन्मान केला. इतकेच नव्हे तर १९५९ साली हेवसी यांना त्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांच्या शांततामय उपयोगासाठी फोर्ड फॉउंडेशनच्या ‘शांततेसाठी अणू’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुलभा कार्लेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org