मूलद्रव्यांची ओळख पटवण्यात वर्णपटशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावते. ७ ऑगस्ट १८६९ रोजी उत्तर अमेरिकेतून दिसलेल्या खग्रास सूर्यग्रहणात विल्यम हार्कनेस आणि ऑगस्टस यंग या संशोधकांना सूर्याभोवती दिसणाऱ्या सौरप्रभेच्या (करोना) वर्णपटात एक हिरवी रेषा दिसली. या रेषेचे वर्णपटावरील स्थान पाहता ही रेषा सौरप्रभेतील लोहामुळे निर्माण झाल्याचे दिसून येत होते. पण या वर्णपटात लोहाच्या इतरही अनेक रेषा दिसायला हव्या होत्या. या इतर रेषा मात्र या वर्णपटात दिसत नव्हत्या. त्यानंतर १८९८ साली जेव्हा अधिक अचूक उपकरणांद्वारे या रेषेची तरंगलांबी मोजली गेली, तेव्हा लोहामुळे निर्माण होणाऱ्या रेषेपासून ही रेषा किंचितशी दूर असल्याचे दिसून आले. यावरून ही रेषा एका नव्या मूलद्रव्यामुळे निर्माण झाली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हे मूलद्रव्य सौरप्रभेत आढळल्याने त्याला ‘करोनियम’ हे नाव दिले गेले. आवर्तसारणीची निर्मिती करणाऱ्या दीमित्री मेंडेलीव्हनेही या मूलद्रव्याची दखल घेतली. मेंडेलीव्हच्या मते, या अज्ञात मूलद्रव्याचा अणू हायड्रोजनच्या अणूच्या तुलनेत कमी वस्तुमानाचा असायला हवा.

दरम्यानच्या काळात, अणुरचनाशास्त्रातील प्रगतीमुळे वर्णपट आणि अणूंची रचना यांतील संबंध स्पष्ट झाला. सन १९४० च्या सुमारास, जर्मन संशोधक वाल्टेर ग्रोट्रिआन आणि स्वीडिश संशोधक बेंग्ट एडलेन यांनी आपल्या संशोधनाद्वारे सौरप्रभेच्या वर्णपटावरील ही रेषा करोनियम या मूलद्रव्यामुळे नव्हे, तर लोहामुळेच निर्माण होत असल्याचे दाखवून दिले. लोहाच्या अणूतील २६ इलेक्ट्रॉन्सपैकी जर १३ इलेक्ट्रॉन्स दूर केले, तर लोहाचा उर्वरित आयनिभूत अणू अशा प्रकारची रेषा निर्माण करू शकत होता. मात्र, लोहाचे इतक्या मोठय़ा प्रमाणात आयनिभूत होणे, हे सौरप्रभेचे तापमान किमान दहा लाख अंश सेल्सियस असले तरच शक्य होणार होते. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान फक्त सहा हजार अंश सेल्सियस असताना सूर्यापासून हजारो किलोमीटरच्या अंतरापर्यंत पसरलेली ही सौरप्रभा इतकी तप्त असणे, हे एक वैज्ञानिक आश्चर्यच मानले गेले. ही सौरप्रभा ‘सौरवाऱ्यां’च्या स्वरूपात अंतराळात सर्वत्र प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनसारखे विद्युतभारित कण उधळत असते. पृथ्वीचे चुंबकत्व हे आपल्या दिशेने येणाऱ्या कणांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काही किलोमीटर अंतरावर व्हॅन अ‍ॅलन पट्टय़ांच्या स्वरूपात थोपवते आणि यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे या कणांपासून रक्षण होते.

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org