26 February 2021

News Flash

कुतूहल – (५) वस्त्रोद्योगाची ओळख

परिधानयोग्य वस्त्रांचा व वस्त्रपद्धतींचा हा प्रवास जितका रमणीय तितकाच जागतिकीकरणाने भारतातील वस्त्र विश्वावर झालेला परिणाम.

| January 7, 2015 01:09 am

परिधानयोग्य वस्त्रांचा व वस्त्रपद्धतींचा हा प्रवास जितका रमणीय तितकाच जागतिकीकरणाने भारतातील वस्त्र विश्वावर झालेला परिणाम. पूर्वी वस्त्र म्हणजे मानवी शरीराला संरक्षणासाठी आवश्यक असलेले कवच, एवढेच त्याचे कार्य समजले जाई. आता निरनिराळ्या क्षेत्रात वस्त्रशास्त्राने संशोधनाअंती औद्योगिक व तांत्रिक वस्त्रनिर्मितीत मिळविलेले यश आजमावूया.
यामध्ये भूगर्भ, अवकाश, वैद्यकशास्त्र, आधुनिक माहिती तंत्रज्ञान, डिजिटल (अंकात्मक) तंत्रज्ञान तसेच नेटवìकगमध्ये लागणारे फायबर ऑप्टिक्स या सर्वामध्ये सूत व वस्त्रांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
या सर्व तंत्रज्ञानांच्या कमी उत्पादन खर्चाच्या गरजांची परिपूर्ती हे वस्त्रशास्त्राचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतिशील संशोधनास योगदान आहे. या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाची समन्वयात्मक भूमिका वस्त्र बजावत आहे. याचबरोबर तंत्रज्ञानाच्या संशोधनातील गरुडझेपेमुळे वस्त्रांच्या वाढत्या उपयुक्ततेस चालना मिळाल्याने वस्त्रांचा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये झालेला प्रवेश आपण अभ्यासणार आहोत. बांधकाम, अवकाशयान, डिजिटल (अंकात्मक) अशा अनेक तंत्रज्ञान क्षेत्रातील वस्त्रांचा चंचूप्रवेश व त्यामुळे ऊर्जा घेऊन येणाऱ्या पिढय़ांतील वस्त्रांनी स्वत:भोवती निर्माण केलेलं आभामंडल व त्यांची आकर्षकता या सदरामधील लेखांमधून अनुभवता येईल.
आतापर्यंत आपल्याला अवगत असलेल्या विणकाम (आडव्या/ उभ्या धाग्यांच्या) शास्त्रांव्यतिरिक्त साखळी अथवा शृंखला-वीण वस्त्रशास्त्र (निटिंग); तसेच विनावीण वस्त्रशास्त्र  (नॉन-वोव्हन); त्याचे तंत्रज्ञान व यंत्रज्ञान, यामुळे संभव झालेले तांत्रिक वस्त्र हे बांधकाम क्षेत्र, अवकाशयान यामध्ये कसे वापरले जाते व त्यातही भारताने कशी गरुडझेप घेतली आहे याची माहिती आपण करुन घेऊ.
 नसíगक व कृत्रिम स्रोतापासून तयार होणाऱ्या तंतू/ सूत/ वस्त्र याची माहिती तर आपण घेणारच आहोत. पण यातील संशोधनानी वस्त्रविश्वात आणलेली विविधता विलोभनीय आहे. या सर्वाचा आढावा या सदरातील लेखांमधे असेल. वस्त्रांचे रंग, छपाई, आधुनिक फिनििशग पद्धती, या सर्वामागचे तंत्रज्ञान या सदरातून आपण जाणून घेणार आहोत.
श्वेतकेतू मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

बखर संस्थानांची – ब्रिटिशांची राजकीय हालचाल
nav02फ्रेंच आणि ब्रिटिशांच्या युरोपातील संघर्षांचे पडसाद भारतातही उमटून या दोघांमध्ये व्यापारी संघर्ष चालू झाला होता. १७१७ साली कंपनीने जहांगीर बादशाह कडून व्यापारास करमाफी आणि स्वत;चे सन्य बाळगण्याची परवानगी मिळविली. त्यानंतर बंगालचा नवाब आणि फ्रेंच यांच्या संयुक्त फौजा आणि कंपनीचे सन्य यांच्यात पलासी उर्फ प्लासी येथे झालेल्या लढाईत कंपनीच्या सन्याच्या विजयामुळे कंपनी आणि भारताच्या इतिहासाला अनपेक्षीत कलाटणी मिळाली. या विजयामुळे बंगाल प्रांत आणि नवाब कंपनीच्या ताब्यात आला आणि तेथल्या राजकोषातून फार मोठी संपत्ती त्यांना मिळाली. सुपीक बंगालवर कर लादून ब्रिटिशांनी आपली लष्करी ताकद वाढवली. १७५७ सालच्या प्लासी विजयानंतरच ईस्ट इंडिया कंपनीला भारतात सत्ता संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा वाटू लागली.
प्लासी पाठोपाठ १७६४ साली झालेल्या बसरच्या लढाईत कंपनीसन्याने अवधचा नवाब शुजा-उद् – दौला, बंगालचा नवाब मीर कासिम आणि मोगल बादशाह शाह अलम द्वितीय यांच्या संयुक्त फौजांचा धुव्वा उडविला. त्यानंतर अलाहाबादेत झालेल्या करारान्वये कंपनीच्या हातात बंगाल, बिहार, ओरिसा आणि उत्तरप्रदेशचा काही भाग अशा मोठय़ा प्रदेशाचा दिवाणी आणि महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळाला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

अभंगधारा – ५. दारं-खिडक्या..
(काही आवृत्तींत मंगळवारच्या अंकात क्रमांक ३ हा भागच पुनर्मुद्रित झाला आहे. त्यामुळे ‘काकप्रश्न’ या चौथ्या भागाचा हा सारांश..) ज्ञानेंद्रच्या सांगण्यावरून कर्मेद्रनं मुंडक उपनिषदातला मंत्र वाचला. त्यात एकाच झाडावरच्या या दोन पक्ष्यांच्या दोन तऱ्हा सांगितल्या होत्या. दु:ख भोगणारा पक्षी जेव्हा पलीकडच्या फांदीवरील शांतचित्त पक्ष्याला पाहतो ना, तेव्हा त्याच्या अलिप्ततेचा महिमा जाणवून शोकरहित होण्याचा उपायच जणू त्याला उकलतो.. तसा ऐलतटावर, संसारात पिचलेल्या माझं लक्ष पैलतीरी गेलं तर जाणवेल, अरे कोण आहे मी? हे सारं का भोगतो आहे? कोऽहं? हा प्रश्न ऐलतटावरून पैलतटावर लक्ष गेल्याशिवाय येणारच नाही.. या पैल या शब्दावरून ज्ञानेंद्रला केन उपनिषदातला मंत्र आठवतो, मग पुढे..

ज्ञानेंद्रनं एकवार जाणून तिघा मित्रांकडे पाहिलं आणि त्याची दृष्टी खिडकीबाहेर जगाच्या पसाऱ्याकडे गेली. हिरवीगार शेतं.. पाय पसरलेले डोंगर.. ओबडधोबड माणसं.. लहान-मोठी, श्रीमंत-गरीब घरं.. धूळ माखलेले रस्ते.. हारीनं खेटलेली दुकानं.. मळकट भगवे झेंडे डोईवर घेतलेली एखाद-दोन मंदिरं.. नजर जाईल तिथं माणसंच आहेत. ज्याचं-त्याचं ‘जग’ आहे! या ‘जगा’तली प्रत्येक गोष्ट याच माणसांच्या भावविश्वातून तर साकारली आहे.. अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या ओढीनं जो तो आपलं ‘जग’ घडवत तर आहे.. आणि या अशा भावसंपन्न चराचरात परब्रह्म व्याप्त आहे! किती विलक्षण भासतं हे सारं. डोळ्यांसमोरून वेगानं सरत असलेल्या दृश्याइतक्याच वेगानं मनात उमटत असलेल्या या विचारतरंगांत हरवलेला ज्ञानेंद्र आपल्याशीच बोलल्यागत म्हणाला..
ज्ञानेंद्र – केन उपनिषदात परब्रह्माचं वर्णन आहे..
हृदयेंद्र – परब्रह्म म्हणजे सद्गुरूच! श्रीगुरूगीतेतही भगवान शंकर सांगतात, गुरुर्साक्षात परब्रह्म!
कर्मेद्र – बरं, काय वर्णन आहे परब्रह्माचं?
ज्ञानेंद्र – परब्रह्म कसं आहे? त्याला स्थूल इंद्रियांनी नाही जाणता येत.. हे चराचर विश्व आहे ना, त्याला आम्ही या हाडामांसाच्या शरीरातल्या ज्ञानेंद्रियांनी जाणतो.. त्याद्वारेच या जगाशी आमचा संपर्क आहे, संबंध आहे, संयोग आहे.. डोळ्यांनी आम्ही हे जग पाहातो.. कानांनी ऐकतो.. त्वचेनं स्पर्शतो.. पण या विश्वात कणाकणांत व्याप्त असलेल्या परब्रह्माला या इंद्रियांनी नाही जाणता येत! केन उपनिषदातला मंत्र सांगतो, ‘न तत्र चक्षुर्गच्छति, न वाक्  गच्छति, नो मन:!’ तिथे डोळे पोहोचत नाहीत, वाणी पोहोचत नाही, मन पोहोचत नाही! ते ज्ञात आणि अज्ञाताच्या पलीकडे आहे..
हृदयेंद्र – पलीकडे.. पुन्हा पैल आलाच!
ज्ञानेंद्र – पुढे फारच सुंदर आहे रे! जे वाणी व्यक्त करू शकत नाही, पण वाणी ज्यामुळे व्यक्त होते, जे डोळ्यांना दिसत नाही, पण डोळे ज्यामुळे डोळ्यांना दिसतं, जे कानाला ऐकता येत नाही, पण ज्यामुळे कान ऐकू शकतात.. यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षूषि पश्यति। यच््रछोत्रेण न श्रुणोति, येन श्रोत्रमिदंश्रुतम्। तदेव ब्रह्मं.. तदेव ब्रह्मं! तेच ब्रह्म आहे.. तेच ब्रह्म आहे!!
या वाक्यासरशी ज्ञानेंद्रचं लक्ष पुन्हा खिडकीबाहेर गेलं.. दृश्यचौकट बदलली होती.. वस्ती बदलली होती.. माणसं बदलली होती, पण त्यांचं ‘जग’ तेच होतं.. त्याच भावना, त्याच वासना, तीच तळमळ, तेच धैर्य, तीच करुणा, तोच त्याग, तोच भोग, तोच स्वार्थ, तोच परमार्थ..तदेव ब्रह्मं.. तदेव ब्रह्मं.. विचारांच्या लाटा उसळल्या आणि डोळे किंचित पाणावले.. अगम्य पण उदात्त असं काहीतरी मनाच्या कवाडांवर धडकत होतं.. तिघेही त्याची ती भावमुद्रा पाहून मुग्ध झाले होते. कातर स्वरात हृदयेंद्रनं मौनाचा भंग केला..
हृदयेंद्र – फार सुंदर! डोळे ज्याला पाहू शकत नाहीत, पण डोळे ज्याच्यामुळे पाहातात.. त्याला पाहायचं तर डोळ्यापलीकडेच जावं लागेल ना? पण हे डोळे तर अशाश्वतात गुंतले आहेत.. त्यांना तिथली दृष्टी वळवावी लागेल.. पलीकडे पाहावंच लागेल.. प्रत्येक इंद्रियाला असं पैलतीरी वळावंच लागेल!
ज्ञानेंद्र – कावळा दारावर ओरडतो ना? खिडकीत ओरडतो ना? ही इंद्रियं म्हणजेही तर दारं-खिडक्याच आहेत! तिथून जग ‘आत’ येतं! त्या प्रत्येक इंद्रियद्वाराशी सद्बुद्धीचा कावळा ओरडत आहे! पैल तो गे काऊ कोकताहे..!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 1:09 am

Web Title: identity of textile industry
Next Stories
1 कुतूहल – वस्त्रोद्योगाची ओळख- ४
2 वस्त्रोद्योगाची ओळख – ३
3 वस्त्रोद्योगाची ओळख
Just Now!
X