डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

जी माणसं स्वभावाने-वृत्तीने कलाकार असतात, ज्यांच्या मनात – मेंदूत कायम कलेविषयीचे विचार चालू असतात, त्या माणसांना ९ ते ५ या चाकोरीत बसवणं अवघड, असं आपण म्हणतो. तरीही जर नोकरीवजा काम करावं लागलं तर आपल्या आवडीला संधी मिळावी, यासाठी ते अस्वस्थ होतात. याचं कारण या सर्व कला- ज्याला आपण सर्वसाधारण भाषेत आवड, छंद म्हणतो, ती खरंतर मेंदूतल्या न्युरॉन्सशी थेट संबंधित असलेली बुद्धिमत्ता असते.

शरीर आणि स्नायूवर नियंत्रण ठेवणं ही एक विशेष क्षमता म्हणजेच आपली बुद्धिमत्ता असते. या बुद्धिमत्तेला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे आजच्या आणि या पुढच्या काही भागांत आपण ही बुद्धिमत्ता समजून घेऊ. शरीर आणि स्नायू यांच्यावर नियंत्रण विविध क्रीडापटूंना आणि कलाकारांना उपयोगी पडतं. ही बुद्धिमत्ता नर्तकांकडे असावी लागते. त्यांच्यात संगीतविषयक बुद्धिमत्ता आणि शरीर-स्नायूविषयक बुद्धिमत्ता अशा दोन्ही असाव्या लागतात. कथक, भरतनाटय़म् अशा पारंपरिक नृत्यप्रकारांबरोबर वेस्टर्न डान्स, रॅप हेही आलंच.

कोणत्याही वाद्यांच्या वादकांमध्ये या दोन बुद्धिमत्ता असाव्या लागतात. तबल्यावर थाप कशी मारायची, वजन किती द्यायचं हा आदेश मेंदू स्नायूंना देतो, तर प्रत्यक्ष हवी तशी थाप येण्यासाठी हाताचे स्नायू काम करतात. सतार, संतूर अशा नाजूक तंतुवाद्यांच्या बाबतीत हेच घडतं. बासरीवादक योग्य प्रकारे फुंकर मारून अप्रतिम संगीतसृष्टी निर्माण करतात.

गायकांमध्येदेखील या दोन बुद्धिमत्तांची गरज असते. कारण हवी तशी तान गळ्यातून येण्यासाठी स्वरयंत्राची साथ लागते. श्वासावर नियंत्रण असावं लागतं. यासाठी विशिष्ट प्रकारची ताकद लागते.

शरीरविषयक बुद्धिमत्तेचं आणखी एक उदाहरण म्हणजे अभिनय. चांगला अभिनय म्हणून ज्यांना आदर मिळतो, ज्यांचं कौतुक होतं अशा व्यक्तींचं खरं बलस्थान म्हणजे त्यांचा चेहरा आणि देहबोली. अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला चेहऱ्यावरच्या स्नायूंकडून नीट काम करून घ्यावं लागतं. ते ज्याला जमतं ती उत्तम अभिनेत्री किंवा उत्तम अभिनेता असतो. सगळ्यांना हे जमत नाही. अभिनयातला ठोकळा असं विशेषण काहींना लाभतंच की ! काहींचा अभिनय ‘लाउड’ होतो. तर चांगल्या कलाकारांचा अभिनय हा तरल असतो. कारण ते या विषयातले बुद्धिमान असतात.