पिसाच्या कललेला मनोऱ्याला एक वैज्ञानिक चमत्कार म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळाली आहेच; परंतु पिसा शहरवासीयांना याचे काही अप्रूप नाही. याचे कारण म्हणजे या मनोऱ्याशेजारचे सांता मारिया कॅथ्रेडल आणि बाप्टीस्ट्री यांच्या वास्तूसुद्धा अर्धा ते एक अंशातून कलल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील काही खासगी प्रासाद, सेंट मायकेल चर्च आणि सेंट निकोलाय चर्च यांचे बेल टॉवरसुद्धा एक ते दीड अंशातून झुकलेत! हा सर्व चमत्कार झालाय तो तिथल्या मूळच्या दलदलीच्या जमिनीमुळे. पिसाच्या कलत्या मनोऱ्याचे बांधकाम ११७३ साली सुरू झाले. पाच वर्षांत ११७८ मध्ये मनोऱ्याचे तीन मजले बांधून झाल्यावर तो कलतोय हे लक्षात आल्यावर काम थांबले. मनोऱ्याचा वास्तुरचनाकार बोनॅनो पिझानो होता आणि त्याचा मूळ आराखडा आठ मजल्यांचा आणि ५६ मीटर उंचीचा होता. तांत्रिक अडचणी, राजकीय अस्थर्यामुळे मनोऱ्याचे थांबलेले काम १२७२ साली परत सुरू झाले आणि १२७८ मध्ये सात मजले पूर्ण झाले. या काळात चौथ्या मजल्यापासून वरचे मजले झुकावाच्या बाजूने अधिक उंचीचे बांधले गेले, पण झुकाव वाढतच राहिला. अखेरीस १३७० साली या मनोऱ्याचा आठवा मजला बांधून पूर्ण झाला. अशा रीतीने या कामाला दोन शतकांचा कालावधी लागला. १९३४ मध्ये इटालीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलीनीने मनोऱ्याच्या पायात ३६१ मोठी छिद्रे पाडून त्यात सिमेंट ग्राऊटिंग इंजेक्ट करण्याचा प्रयोग करून बघितला. तरीही त्याचे कलणे वाढलेच आहे. आजपर्यंत मनोऱ्याचा झुकाव थांबण्यासाठी अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग होऊनही मनोऱ्याचे कलणे वाढतेच आहे. मध्यंतरी मनोऱ्याच्या झुकावाच्या विरुद्ध बाजूला पायात ६०० टन शिसे भरण्याचा प्रयोग मात्र थोडाफार यशस्वी झालाय. त्याआधी त्याचा झुकाव ओळंब्याच्या बाहेर साडेचार मीटर होता तो सध्या ३.८ मीटरवर स्थिर झालाय. तळमजल्यापेक्षा आठवा मजला ३.९९ अंशांनी झुकलाय. अत्यंत मोहक अशा पांढऱ्या संगमरवराच्या शुभ्र खांबांनी आणि जाळीदार झरोक्यांनी प्रत्येक मजला सुशोभित झालेला हा मनोरा त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्यातल्या दोषामुळेच अधिक प्रसिद्धी पावला हे विशेष!

– सुनीत पोतनीस

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

sunitpotnis@rediffmail.com

 

 

वड

आपल्या सर्वाना परिचित असलेला भव्य वृक्ष म्हणजे वड. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव आहे ‘फायकस बेंगालेन्सिस म्हणजे ‘वट’ कुलातील हा भारतीय वृक्ष आहे. भारतात सर्वत्र आढळतो. हा इंग्रजीमध्ये ‘बनियन ट्री’ म्हणून ओळखला जातो. वडाच्या प्रचंड वृक्षाखाली थंडगार सावलीमध्ये वाटसरू आराम करतात, एकमेकांना भेटतात, वस्तूंची देवघेव करतात, व्यापार करतात.

अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या पारंब्या जमिनीत घुसतात, झाडाला घट्ट धरून ठेवतात आणि आपला विस्तार वाढवितात. याचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात. हिरवट रंगाची, फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात. पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. फळामध्ये लहान अळ्या, कीटक असतात त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत.

फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो. रस्त्याच्या कडेला हा सहसा लावला जातो. पण मोकळ्या जागेत हा छान वाढतो. याच्या पानाच्या पत्रावळी जेवणासाठी वापरतात. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वाचा औषध म्हणून उपयोग करतात. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. याचे तेल केस वाढविण्यासाठी वापरतात. याची उगवणक्षमता चांगली आहे. त्यामुळे सर्वानाच जवळचा वाटतो.

भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. कलकत्याजवळ सीबपूर वनस्पती उद्यानात ३५० वर्षे वयाचा वडाचा वृक्ष आहे. मद्रास येथील थिऑसॉफिकल सोसायटी आणि सातारा शहराजवळ असेच प्राचीन वडाचे वृक्ष आहेत. एकूणच या वृक्षाचे आयुर्मान जास्त असल्यामुळे याचे नाव ‘अक्षय वृक्ष’ असे पडले असावे.

– अनिता कुलकर्णी (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org