22 October 2019

News Flash

जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन

दणकट शरीरयष्टी आणि बहुमुखी प्रतिभा असलेल्या मलिक अंबरचे कर्तृत्व स्तिमित करणारे आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

मोगल बादशाहीच्या तीन पिढय़ांमधले सत्ताधारी अकबर, जहांगीर आणि शाहजहान यांनी अहमदनगरचा पाडाव करून निजामशाही नष्ट करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले. त्यामध्ये अकबर आणि शाहजहानला काही अंशी तात्पुरते यश आलेही, पण जहांगीरला मात्र नामुष्की पदरी आली. याचे एकमेव कारण म्हणजे निजामशाहीचा वजीर आणि तारणहार मलिक अंबर याचे शौर्य आणि मुत्सद्देगिरी. या अपयशाचे सल जहांगीरला एवढे खुपत होते की त्याने अबुल हुसेन या चित्रकाराकडून मलिक अंबरचे एक मोठे चित्र तयार करून घेतले. या चित्रात जहांगीर स्वत धनुष्यबाणाने मलिकचा शिरच्छेद करताना दाखवलं होतं!

दणकट शरीरयष्टी आणि बहुमुखी प्रतिभा असलेल्या मलिक अंबरचे कर्तृत्व स्तिमित करणारे आहे. त्याचे अदम्य साहस, सनिकी व्यवस्थापन, कुशल राजनीती, चोख प्रशासन यांच्या पाठबळावर त्याने मोडकळीस आलेल्या अहमदनगरच्या निजामशाहीला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली. या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या. त्याची पाणीपुरवठा योजना, रस्तेबांधणी, इमारतींचे बांधकाम प्रसिद्ध आहे. खडकी म्हणजे सध्याचे औरंगाबादमध्ये त्याने बांधलेली पाणचक्की अजूनही कार्यरत आहे. मलिकने अनेक विद्वान, कलाकारांना आश्रय दिला. हैदर अली या अरबी लेखकाला आश्रय देऊन ‘इक्ब अलजवाहर’ हा ग्रंथ लिहून घेतला. ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ ला झाला. त्यानंतर त्याचा मुलगा फतेहखान निजामशाहीचा वजीर झाला.

– सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

First Published on March 12, 2018 1:58 am

Web Title: malik ambar administration