डॉ. यश वेलणकर

माणसाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे का हा प्रश्न मेंदू संशोधनातही अभ्यासला जातो. त्यासाठी माणूस निर्णय घेतो त्या वेळी मेंदूत काय होते ते पाहिले जाते. माणसाने कोणत्याही बोटाची हालचाल करावी असे सांगितले असता तो उजव्या हाताच्या बोटाची हालचाल करतो. ती करण्यापूर्वी अर्धा सेकंद त्या बोटाशी निगडित मेंदूतील भाग सक्रिय होतो. शास्त्रज्ञांनी संशोधनात सहभागी व्यक्तींच्या डाव्या हातातील बोटाशी निगडित मेंदूतील भाग उत्तेजित केला असता माणसे अध्र्या सेकंदाने उजवा हात न वापरता डावा हात वापरतात. पण हा निर्णय आपण आपल्या इच्छेने घेतला असे त्यांना वाटते. त्यामुळे मेंदुशास्त्रज्ञांच्या एका गटाला असे वाटते की प्रोग्रामिंग झालेले असते त्यानुसार मेंदू निर्णय घेतो. एखादा निर्णय मी घेतला असे माणसाला वाटत असले तरी तसे नसते, मेंदूने अर्धा सेकंद आधीच त्याच्या पूर्वानुभवानुसार निर्णय घेतलेला असतो. म्हणजेच माणसाला निर्णयस्वातंत्र्य नाही. काही शास्त्रज्ञांनी मात्र हे मान्य न करता प्रयोग सुरू ठेवले. कारण हे मान्य केले तर एखाद्या गुन्ह्यसाठी कुणाला शिक्षा देणेही अयोग्य ठरते. गुन्हेगाराच्या मेंदूचे प्रोग्रामिंग तसे होते त्यामुळे त्याने ती कृती केली. चोरी करायची की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य माणसाला नसेलच तर त्याला शिक्षा करणे अयोग्य ठरते. नंतरच्या संशोधनात असे लक्षात आले की, माणसाच्या मेंदूत अनेक विचार येतात. त्यातील कोणत्या विचाराला महत्त्व द्यायचे याचे स्वातंत्र्य माणसाकडे असते. माणूस हे स्वातंत्र्य वापरतो त्या वेळी त्याच्या मेंदूतील प्री फ्रन्टल कोर्टेक्स सक्रिय होतो. मनात अनेक विचार येतात. कोणते विचार यावेत याचे स्वातंत्र्य माणसाकडे नाही. मात्र त्यातील कोणत्या विचाराला महत्त्व देऊन ‘कृती करायची’ याचे स्वातंत्र्य माणसाकडे आहे. सारे विचार योग्य असतात, साऱ्या कृती योग्य नसतात. चोरी करू या आणि नको करू या असे दोन्ही विचार येतात पण त्यातील कोणत्या विचारानुसार कृती करायची हे माणूस निवडू शकतो. याचसाठी बुद्ध, पतंजली, ख्रिस्त यांनी शील, यमनियम, दहा आज्ञा सांगताना काय करू नये हे सांगितले आहे. अयोग्य कृती करण्यापासून स्वत:ला थांबवणे ‘ध्यान कुठे द्यायचे’ हे स्वातंत्र्य वापरले तरच शक्य होते. मनात येणाऱ्या सर्व विचारांचे भान ठेवून कशावर ध्यान द्यायचे हे स्वातंत्र्य माणसाला आहे. ते वापरण्यासाठी लक्ष देण्याचे कौशल्य विकसित करायला हवे.

yashwel@gmail.com