06 August 2020

News Flash

वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज – १९८७

खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर एका पत्रकाराने त्यांना विचारले

वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज

१९८७ चा  ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल  वि. वा. शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांना प्रदान करण्यात आला. १९६७ ते १९८२ या काळातील त्यांच्या साहित्याचा यासाठी विचार करण्यात आला. या अगोदर १९७४ मध्ये वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि पहिल्यांदाच मराठी भाषेचा सन्मान झाला होता.

खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर एका पत्रकाराने त्यांना विचारले, तुमच्याऐवजी हे पारितोषिक दुसऱ्या कुठल्या मराठी साहित्यिकाला मिळाले असते तर तुम्हाला आनंद झाला असता? तर खांडेकरांचे उत्तर आले- ‘कुसुमाग्रज.’ आणि खरोखरच त्यांच्यानंतर १३ वर्षांनी का होईना, पण कुसुमाग्रजांना  ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. १९४२ साली वि. स. खांडेकरांनी स्वखर्चाने कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. या संग्रहासाठी त्यांनी कविता मागण्यासाठी अनेक पत्रे लिहिली तर प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या कुसुमाग्रजांनी याचे हस्तलिखित एक वर्ष झाले तरी पाठविले नव्हते. योगायोगाची गोष्ट अशी की, मराठी भाषेचा असा दोनदा सन्मान झाला ते खांडेकर आणि शिरवाडकर हे दोघेही दत्तक गेले होते. दोघांचे पहिले नाव अनुक्रमे ‘गणेश’ व ‘गजानन’ आणि दत्तकविधानानंतर दोघांचे नाव झाले ‘विष्णू’.

कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि साऱ्या महाराष्ट्राला आनंदाचे उधाण आले. पुरस्कार देण्याचा समारंभ सुरू होता तेव्हा ज्ञानपीठाचे अध्यक्ष श्रीयांश प्रसाद जैन म्हणाले की, हा कुसुमाग्रजांचा गौरव नसून, कुसुमाग्रजांमुळे ज्ञानपीठ पुरस्काराचा गौरव झाला आहे. लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष बलराम जाखड  यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्यांनी कुसुमाग्रजांचा ‘साहित्यिक कोलंबस’ म्हणून गौरव केला.

कुसुमाग्रज यांचा जन्म पुण्यात २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते. कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण िपपळगाव या छोटय़ा खेडय़ातच झाले. नाशिकजवळच्या ‘वणी’ या गावी त्यांची आत्या राहायची. शाळेला सुट्टी लागली की सारी भावंडे आत्याकडे जायची. आत्याच्या घरात उत्तमोत्तम पुस्तकांनी खच्चून भरलेले कपाट होते.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

गुणवत्तावाढीसाठी मधमाश्यांचे शरीरमापन

वनस्पती आणि प्राण्यांच्या गुणवत्तावाढीसाठी निवडपद्धतीने प्रजनन करता येते. त्यासाठी काही गुणवत्ता निकष ठरवले जातात. उदाहरणार्थ, शर्यतीच्या घोडय़ांची पदास करताना त्यांची वजन-उंची, अन्य शारीरिक मापे, पळण्याचा वेग व आरोग्य विचारात घेतले जाते. त्यात मातृपतृक गुणांचा विचार होतो. त्याचप्रमाणे मधाचे उत्पादन वाढवायचे असेल तर अधिक मध देणाऱ्या मधमाश्यांच्या शरीराची-अवयवांची मोजमापे ही मधमाश्यांचे प्रजनन निवडपद्धतीने करण्यासाठी उपयोगी पडतात.

मध आणि मेण ही मधमाशीपालनातून मिळणारी आíथकदृष्टय़ा महत्त्वाची दोन उत्पादने आहेत. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. अधिक मध गोळा करणाऱ्या मधमाश्या निवडून त्यांचे प्रजनन करण्यासाठी त्यांच्या शरीराचे, सवयींचे मापन करणे अनिवार्य ठरते.  प्रजननासाठी मधुबनात ठेवलेल्या १००-२०० पाळीव मोहोळांमधील मधमाश्यांचे वर्षभर  निरीक्षण करण्यात येते. त्यांचे स्वभावधर्म, वर्तन, मधसंकलन करण्याची क्षमता, मोहोळातून उठाव करून जाण्याची वृत्ती, डंख मारण्याची वृत्ती, रोगप्रतिबंधक क्षमता, इ. अशा अनेक गुणात्मक कसोटय़ा निवडपद्धतीत वापरतात. याविषयीच्या नोंदी वर्षभर ठेवतात.  पाश्चात्त्य कुंवार राण्यांचं कृत्रिम पद्धतीने रेतन करतात. त्यासाठी निवडलेली राणी आणि नरही गुणवत्तापूर्ण वंशातील असावा लागतो.

या गुणात्मक कसोटय़ांप्रमाणेच शरीरमापनाच्या सांख्यिकी कसोटय़ाही वापरल्या जातात. एका मोहोळातील शंभर कामकरी मधमाश्या शरीरमापनासाठी घेतल्या जातात. या  मधमाश्यांच्या शरीराची लांबी, छातीच्या भागाची रुंदी, पंखांची लांबी-रुंदी, जिभेची लांबी यांचं सूक्ष्म पद्धतीनं काटेकोर मापन केलं जातं. त्यांची सरासरी काढली जाते. याप्रमाणे विविध मोहोळांतील मधमाश्यांचा गट घेऊन असे मापन केले जाते.   प्रत्येक मोहोळातील ठरावीक संख्येच्या गटाच्या मधमाश्यांच्या शरीराची ही मापे नोंदवली जातात. मोठय़ा आकाराच्या कामकरी मधमाश्यांची उड्डाणक्षमता, मधसंकलनक्षमता अधिक असते. अशा मापनाच्या आकडेवारीच्या सरासरीची मधुबनातील मोहोळांतर्गत तुलना करून उच्च गुणवत्तेच्या मोहोळाची राणी नरपदाशीसाठी निवडली जाते.

या प्रकारच्या शरीरमापनातून मधमाश्यांच्या विविध प्रकारांचेही निश्चितीकरण करता येते. त्यांना नसíगक प्रादेशिक जातीप्रकार (इको टाइप्स) म्हणता येईल. गुणवत्तावाढीसाठी मधमाश्यांमध्ये संकर करून योजनापूर्वक मधोत्पादन वाढवता येते.

– डॉ. क. कृ. क्षीरसागर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2017 2:39 am

Web Title: marathi articles on kusumagraj
Next Stories
1 जॉन नेपियर
2 खनिज तेलाचे मोजमाप
3 मोठय़ा प्रमाणावर साठवलेल्या घनपदार्थाचे मोजमाप
Just Now!
X