डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

आपला मेंदू सतत कोणती ना कोणती तरी माहिती ग्रहण करत असतो. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमांमधून मेंदूवर सतत कोणती ना कोणती तरी माहिती येत असते. या आवश्यक आणि अनावश्यक माहितीतलं मेंदूतल्या हिप्पोकॅम्पसमध्ये काय साठवून ठेवायचं आणि काय नाही, याचा निर्णयही मेंदू्च घेतो. परंतु ज्या वेळी ही माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूच्या विविध संबंधित अवयवांपर्यंत पोहोचवली जाते, तेव्हा नेमकं घडतं काय?

ज्ञानेंद्रियांद्वारा आलेली माहिती विद्युत संदेश या प्रकारची असते. एक न्यूरॉन विद्युत स्वरूपात संदेश आणतो. आणलेली माहिती अ‍ॅक्झॉनद्वारे दुसऱ्या न्यूरॉनला दिली जाते. या प्रक्रियेत विद्युत संदेशाचं रूपांतर रासायनिक संदेशात होतं. अवघ्या काही सेकंदांत हा सारा व्यवहार घडून येतो.

माणूस नवनवीन माहिती ग्रहण करत असतो आणि मेंदू अशा प्रकारे अखंडपणे न्यूरॉन्सच्या जोडण्या करण्याच्या कामात असतो. अशा जोडण्या होतात, हा शोध डोनाल्ड हेब या कॅनेडियन संशोधकानं १९४९ मध्ये लावला. यामुळेच माणसाच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर खऱ्या अर्थानं प्रकाश पडला. हेब यांना ‘न्यूरोसायकोलॉजी’चे जनक मानलं जातं.

या आधारावर संशोधकांनी संशोधन सुरू ठेवलेलं आहे. त्यामधला एक मुख्य भाग म्हणजे- ज्या वेळी या न्यूरॉन्सच्या जोडण्या होतात, त्या वेळी ती माहिती नेमकी कशा प्रकारे मेंदू साठवून ठेवत असेल? यात संशोधकांना दोन प्रकार आढळून आले आहेत :

(१) एकाच वेळेला सर्व माहिती पुरवणं आणि ती साठवून ठेवणं हा एक प्रकार; आणि (२) पुन्हा काही वेळानंतर ती माहिती नक्की पोहोचली आहे की नाही, हे बघणं आणि ती पाठवत राहणं. यावर संशोधन सुरू आहे.

ज्या वेळी हे संशोधन पूर्ण होईल, त्या वेळी एखादा विषय आत्मसात करत असताना, शिकत असताना मेंदूत नक्की कोणत्या स्वरूपाच्या रचना होतात, कोणत्या क्रमानं मेंदू लक्षात ठेवतो, माणूस जेव्हा मनातल्या मनात एखादा विचार करतो तेव्हा मेंदूमध्ये कशा प्रकारे प्रक्रिया घडतात, हे समजणं अधिक सोपं होईल. मेंदूसंशोधनातला हा एक महत्त्वाचा टप्पा असेल.