केम्ब्रिजच्या आयझॅक न्यूटन संस्थेच्या सभागृहात १९९३च्या जूनमध्ये एक व्याख्यानमाला सुरू होती. ‘एकमापांकी रूप, विवृत्तीय वक्र आणि गाल्वा प्रतिरूपण (मॉड्युलर फॉम्र्स, एलिप्टिक कव्र्ह्ज अ‍ॅण्ड गाल्वा रिप्रेझेंटेशन्स)’ असे व्याख्यानाचे शीर्षक होते. काही तरी सनसनाटी बातमी ऐकायला मिळणार अशी कुणकुण जमलेल्या दोनेकशे गणितज्ञांना लागली होती. व्याख्यानाच्या शेवटी वक्त्याने फर्माच्या अखेरच्या प्रमेयाचे विधान लिहिले आणि विनयाने म्हटले, ‘‘मी ते सिद्ध केले आहे. मला वाटते, मी इथेच थांबावे.’’ काही मिनिटांमध्ये आंतरजालावाटे बातमी जगभर पसरली. कोण होता तो वक्ता? ते होते ११ एप्रिल १९५३ रोजी केम्ब्रिज येथे जन्मलेले ब्रिटिश गणितज्ञ अँड्र्यू वाइल्स!

कुशाग्र बुद्धीच्या अँड्र्यूना लहानपणापासून गणितात गती होती. वयाच्या दहाव्या वर्षी स्थानिक वाचनालयात गणितावरचे पुस्तक वाचताना त्यांना फर्माच्या अखेरच्या प्रमेयाबद्दल माहिती मिळाली. वास्तविक ते एक अनुमान होते, ज्याची सिद्धता भल्याभल्या गणितज्ञांना ३०० वर्षांहून अधिक काळ हुलकावणी देत आली होती. वाइल्सनी ते सिद्ध करण्याचा मनाशी निश्चय केला. पुढे त्यांनी १९७४ साली बी.ए. आणि मग एम.ए. पदवी प्राप्त करून जॉन कोट्स या गणितज्ञाच्या मार्गदर्शनाखाली १९८० मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली.

नंतर प्रिन्स्टन विद्यापीठात पुढील संशोधनासाठी दाखल झालेल्या वाइल्स यांची १९८२ पासून तिथेच प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. वाइल्सनी फर्माच्या अखेरच्या प्रमेयावर पुन्हा काम सुरू केले. जवळपास सात वर्षे स्वत:ला झोकून देऊन, एकांतात काम केले. अंकशास्त्रातील नवे निष्कर्ष आणि फ्रेय, माझुर, रिबेट, सेर, इवासावा अशा अनेक गणितींच्या कामाची एकमेकांशी सांगड घातली. त्यातील त्रुटींवर, रिचर्ड टेलर या आपल्या विद्याथ्र्यासह काम करून १९९४ मध्ये अखेर प्रमेयाची सिद्धता पूर्णत्वास नेली. ध्येयाने प्रेरित मनुष्य काय करू शकतो याचे आधुनिक काळातील हे आदर्श उदाहरण!

या कार्याबद्दल फर्मा, आबेल, वूल्फ, कोल अशी प्रतिष्ठित पारितोषिके त्यांना मिळाली. रॉयल सोसायटीचे कोप्ले पदक मिळाले आणि ब्रिटिश राजसत्तेकडून ‘सर’ ही पदवीही मिळाली. अगदी अलीकडेच ऑक्सफर्डमध्ये स्थापन केलेल्या गणितातील पहिल्या ‘रेजियस प्राध्यापका’च्या पदावर त्यांची नेमणूक झाली आहे. चाळिशीची मर्यादा ओलांडल्यामुळे ‘फील्ड्स’ पदक मिळाले नाही, पण चांदीची थाळी देऊन त्यांना खास सन्मानित करण्यात आले. त्यांच्या विद्यार्थ्यांनीही गणितात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

 

टीप : ‘काटकोन त्रिकोणांचा गुणाकार?’ या लेखात (८ एप्रिल) दुसऱ्या स्तंभातील दुसऱ्या ओळीत ‘(अ+ब i) ७ (क+ख i) = (अक-बख) + (अख+बक)’ ऐवजी ‘(अ+ब i) ७ (क+ख i) = (अक-बख)+(अख+बक) i ’ असे वाचावे.

– प्रा. श्रीप्रसाद तांबे  

 

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org