भारतीय मुस्लीम समाजाचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या पश्तून किंवा पठाण समाजाच्या ‘पठाण’ या नावाची व्युत्पत्ती अनेक प्रकारे सांगितली जाते. अफगाणिस्तानातील प्राचीन काळातील ‘पत्ता’ किंवा ‘पख्ता’ या जमातीच्या नावावरून हे नाव आले असावे हे एक कारण आहे. विल्यम क्रुकसन या इतिहासकाराच्या मते पुश्तो भाषेतील पुख्ताना या शब्दावरून पठाण शब्द आला असावा. एन्थोवेन या इतिहासकाराच्या मते अगदी सुरुवातीस आलेले पश्तून प्रथम पाटणा शहरात स्थायिक झाल्यामुळे त्यांना पठाण नावाने ओळखले जाते. हिरालाल या इतिहासकारांनी पश्तूनचा अपभ्रंश पठाण झाला असे लिहून ठेवलंय. पठाण हे नाव पश्तून लोकांना उर्दू भाषिकांनी रूढ केलं असावं.

‘पश्तूनवाली’ ही त्यांची पारंपरिक जीवनशैली आणि संस्कृती. स्वाभिमानी, स्वत:च्या प्रतिष्ठेला जपणारा आणि त्यासाठी वाटेल ते करणारा पठाण समाज ‘पश्तूनवाली’ पालन करण्याचा प्रयत्न करतो. आदरातिथ्य, पाहुणचार करण्यात पठाण मनुष्य जसा पुढे आहे तसाच सूड, वैरभाव याबाबतीत अतिशय कट्टर समजला जातो. त्यांच्यातील वैरभाव पिढय़ान्पिढय़ा टिकतो. बहुतेक पठाण ‘खान’ हे आपले आडनाव म्हणून लावतात. इसवी सनाच्या दहाव्या शतकात गझनीच्या मुहम्मदाने भारतीय प्रदेशावर केलेल्या आक्रमणांच्या काळात त्याच्या तुर्की-अफगाण लष्करातून पठाण सैनिक भारतात आले हा त्यांचा भारतीय प्रदेशातील प्रथम प्रवेश. त्यानंतर ११९३ मध्ये मुहम्मद घोरी आणि पुढे कुतुबुद्दीन ऐबक यांनी दिल्लीत स्थापन केलेली गुलाम वंशाची सल्तनत, १२९० मध्ये खिलजी वंशाची सल्तनत, १३२० मध्ये दिल्लीवरील तुघलक वंशाची सल्तनत, १४१४ साली सईद किंवा सय्यद सल्तनत, १४५१ साली लोधी वंश सल्तनत आणि काही अल्पकाळ सुरी वंशाचा दिल्लीवर अंमल होता. अशी साधारणत: ३५० वर्षे या तुर्की-अफगाण सुलतानांची दिल्लीवरील सत्ता टिकली. या तुर्की-अफगाण सत्ताधाऱ्यांच्या दिल्लीतील सत्ताकाळात मोठय़ा संख्येने भारतीय प्रदेशात आलेले पठाण सैनिक दिल्लीचा परिसर आणि बराचशा उत्तर भारतात स्थायिक झाले.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com