आपल्या विषारी आणि किरणोत्सारी गुणधर्मामुळे घातक असणारं पोलोनिअम मूलद्रव्य म्हणजे राखाडी – चंदेरी रंगाचा, इतर धातूंच्या तुलनेत कमी उत्कलनांक असलेला धातू! १८९८ साली शोधल्या गेलेल्या या किरणोत्सारी मूलद्रव्याच्या गुणधर्माविषयी संशोधकांच्या मनात अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे काही वेळा पोलोनिअम हे धातूसदृश मूलद्रव्य मानलं जातं.

पोलोनिअमचे रासायनिक गुण आवर्तसारणीमध्ये त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या टेल्युरिअमसारखे आहेत. पण असं असलं तरी त्याचे काही गुणधर्म हे आवर्तसारणीमध्ये आपल्या शेजारी असलेल्या बिस्मथ मूलद्रव्यासारखे आहेत.

A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

पोलोनिअमची सगळी समस्थानिकं किरणोत्सारी आहेत. पाच किलो रेडिअम जेवढे अल्फा कण उत्सर्जति करतं तेवढे अल्फा कण केवळ एक ग्रॅम पोलोनिअम करतं. अल्फा कण उत्सर्जति होत असताना जेव्हा पोलोनिअमचा ऱ्हास होत असतो तेव्हा खूप मोठय़ा प्रमाणावर उष्णता ऊर्जासुद्धा बाहेर पडते. या उष्णतेमुळे आजूबाजूचं तापमान बऱ्यापैकी वाढतं. अर्धा ग्रॅम पोलोनिअम असलेल्या कॅप्सूलचं तापमान ५०० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त होतं, इतक्या मोठय़ा प्रमाणावर उष्णता ऊर्जा बाहेर पडते. पोलोनिअमच्या या गुणधर्माचा उपयोग करून त्याचा आण्विक उष्णता स्रोत म्हणून वापर केला जातो. उष्णतेबरोबरच या प्रक्रियेत प्रकाशाच्या स्वरूपातसुद्धा ऊर्जा बाहेर टाकली जाते. त्यामुळे पोलोनिअममधून निळ्या रंगाचा झोत बाहेर पडताना दिसतो.

अल्फा कणांबरोबरच प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर टाकली जात असल्यामुळे त्या उष्णतेनं द्रवरूप पोलोनिअमचं लगेच बाष्पीभवन होतं. त्यामुळे पोलोनिअम जर व्यवस्थित पद्धतीनं सीलबंद केलं नाही तर ते नाहीसं झाल्याचं आढळतं.

पोलोनिअम हे तसं अत्यंत कमी प्रमाणात सापडणारं मूलद्रव्य आहे. युरेनिअमच्या खनिजामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात ते मिळतं. १९३४ साली अमेरिकेमध्ये केलेल्या प्रयोगांवरून हे समजलं की, अणुभट्टीमध्ये बिस्मथवर न्यूट्रॉनचा मारा करूनसुद्धा पोलोनिअम मिळवता येतं. पोलोनिअमची ३३ समस्थानिकं ज्ञात आहेत. बहुतेक सर्वच समस्थानिकांचा अर्धायुष्य काल तुलनेने खूपच कमी असल्याने पोलोनिअम अत्यल्प प्रमाणात उपलब्ध होतं. पोलोनिअम -२१० हे आपल्या शरीराला अत्यंत घातक ठरण्यामागे या समस्थानिकाचा १३८ दिवस इतका कमी अर्धायुष्य काल कारणीभूत आहे.

– हेमंत लागवणकर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org