13 July 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : स्वत:च्या वर्तनाची जबाबदारी

वय वर्ष सोळाचे मित्रमैत्रिणी जे आणि जसं ठरवतील, तशीच मुलं-मुली वागत असतात.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

आई-बाबा आणि शिक्षक-शाळा यांनी कितीही चांगल्या वातावरणात शिकवलं असलं, तरी ‘टीनएज’ व त्यानंतरची काही वर्ष तरुण मुलं-मुली वेगळाच रस्ता धरताना दिसताहेत. ही गोष्ट केवळ एखाद्दुसऱ्या घरापुरती मर्यादित नाही, तर बऱ्याच घरांत मुलं काही प्रमाणात बहकल्यासारखी वाटतात.

याचं कारण या वयात मुलं निसर्गत:च काही प्रमाणात बंडखोर झालेली असतात. मेंदूत आणि शरीरात वेगळीच ऊर्जा खेळत असते. या ऊर्जेचं काय करावं, हे त्यांनाही कळत नाही. मुलांचे निर्णय हे आई-बाबांच्या नाही, तर बहुतांशी त्यांच्या स्वत:च्या आणि मित्रमैत्रिणींच्या हातात असतात.

वय वर्ष सोळाचे मित्रमैत्रिणी जे आणि जसं ठरवतील, तशीच मुलं-मुली वागत असतात. या एकाच कारणामुळे मुलांच्या लहानपणी शांत असलेलं घर, मुलं वयात येतात तेव्हा अस्वस्थ होतं. मुलांच्या वागण्याचा परिणाम अवघ्या घरादारावर झाल्याशिवाय राहत नाही. घरात कोणत्याही वेळेला पहाटेपासून रात्रीपर्यंत कधीही युद्धजन्य परिस्थिती उद्भवू शकते. यात अनेकदा मुलांचाही आवाज वरचढ असतो आणि आई-बाबांनी स्वत:च्या म्हणण्यानुसार गोष्टी रेटायचा प्रयत्न केला तर वातावरण जास्त तापतं.

प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा विकास होण्याचा हा काळ असतो. नाठाळपणा, त्याच्याबरोबर बरीचशी बेफिकिरी, जोडीला आपलंच म्हणणं खरं करण्याची वृत्ती वाढते. मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलांमुळे एकूणच पसारा करणं, स्वत:च्या वस्तू जागच्या जागेवर न ठेवणं, वस्तू विसरणं, कामं विसरणं, वैयक्तिक स्वच्छतेकडेसुद्धा पुरेसं लक्ष न देणं, अव्यवस्थितपणा, घरच्या माणसांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष, त्यांच्यासोबत कुठं जायचं नाही, थोडक्यात त्यांचं फारसं काही ऐकायचं नाही.. असं बरंचसं चुकीचं, पण तितकंच नैसर्गिक असं मुला-मुलींचं वर्तन असतं. यात भरीला मोबाइलसारखं यंत्र त्यांच्या हातात पडलेलं आहे. याचा परिणाम मुलांच्या निर्णयक्षमतेवर होतो.

मात्र हे सगळं खरं असलं, तरी या वयात मुलांना लहान मूल समजून चालत नाही. उपदेश केलेले चालत नाहीत. तसं समजलं नाही, तर बऱ्याच गोष्टी आटोक्यात येण्याची शक्यता वाढते. मुलांना समजून घेत त्यांच्याशी व्यवहार ठेवला आणि स्वत:च्या वर्तनाची जबाबदारी स्वत:कडे घ्यायला शिकवलं, तर मुलं नक्की विचार करायला शिकतात. हेच विचार त्यांना चुका करण्यापासून दूर ठेवतात.

contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 12:05 am

Web Title: responsibility for ones own behavior abn 97
Next Stories
1 कुतूहल : चलत्चित्रणाचा शोध
2 मेंदूशी मैत्री : गोंधळ
3 कुतूहल : छायाचित्रणाचा प्रारंभ
Just Now!
X