लोखंड आणि बोरॉन यांच्याबरोबर असलेलं निओडायमिअमचं ‘निओमॅग्नेट’ हे संमिश्र, जगातलं सर्वात शक्तिशाली ‘चुंबक’ म्हणून प्रसिद्ध आहे, हे आपण मागेच पाहिलं आहे. या चुंबकानंतर दुसऱ्या क्रमांकाचं शक्तिशाली चुंबक आहे, सॅमॅरिअम आणि कोबाल्ट यांचं संमिश्र! सॅमॅरिअम या मूलद्रव्याचा एक अणू आणि कोबाल्टचे पाच अणू किंवा सॅमॅरिअमचे दोन अणू आणि कोबाल्टचे १७ अणू एकत्र येऊन जे संमिश्र तयार होतं, ते जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं शक्तिशाली ‘चुंबक’ गणलं जातं.

सौरऊर्जेवर चालणाऱ्या विद्युत विमानांमध्ये सॅमॅरिअम-कोबाल्टचं चुंबक वापरतात. त्याशिवाय चुंबक शक्तीवर चालणारी गिटार्स आणि तत्सम अनेक वाद्यांमध्ये या चुंबकाचा मोठा सहभाग असतो. शक्तिशाली असण्याच्या बाबतीत सॅमॅरिअमच्या चुंबकाचा दुसरा क्रमांक असला तरी, एका बाबतीत ते ‘निओमॅग्नेट’पेक्षा सरस आहे. साधारणपणे ३०० ते ४०० अंश सेल्सिअसला, ‘निओमॅग्नेट’चं चुंबकत्व नष्ट होतं. पण सॅमॅरिअमचं चुंबकत्व मात्र जवळपास ७०० अंश सेल्सियसपर्यंतही अबाधित राहतं.

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लॅन्थॅनाइड कुटुंबातल्या अणुक्रमांक ६२ असलेल्या सॅमॅरिअमचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘सॅमॅरिअम’ची काही संयुगं किंवा क्षार, उत्प्रेरक म्हणून वापरता येतात. उत्प्रेरक म्हणजे असं रसायन जे प्रत्यक्ष रासायनिक अभिक्रियेत भाग न घेता, इतर काही रासायनिक प्रक्रिया घडण्यासाठी फक्त मदत करतं. सध्या ‘प्लास्टिक’ हा पर्यावरणाला हानी पोहोचवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या विघटनाच्या वेगवेगळ्या पद्धतीवर संशोधन चालू आहे. त्यापैकी एका पद्धतीत ‘सॅमॅरिअम’च्या संयुगाची मोठीच मदत होते. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठीही ‘सॅमॅरिअम’चे क्षार उत्प्रेरक म्हणून वापरतात.

‘सॅमॅरिअम-१५३’ हे ‘सॅमॅरिअम’चं किरणोत्सारी समस्थानिक कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरलं जातं. या मूलद्रव्यातून बाहेर फेकली जाणारी बीटा प्रारणं कर्करोगाच्या पेशींना नष्ट करू शकतात. ‘सॅमॅरिअम-१४९’ या ‘सॅमॅरिअम’च्या समस्थानिकाचा विशेष गुणधर्म म्हणजे या मूलद्रव्याचे अणू जास्तीचे न्युट्रॉन शोषून घेऊ शकतात; त्यामुळेच अणुभट्टीमध्ये ‘सॅमॅरिअम-१४९’ या समस्थानिकाचा उपयोग नियंत्रक म्हणून केला जातो.

सन १८७९ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पॉल एमिली यांनी या मूलद्रव्याचा शोध लावला. एका रशियन खाणकाम पदाधिकाऱ्याच्या, कर्नल सॅमॅरस्काय, याच्या नावावरून लॅन्थॅनाइडच्या एका खनिजाला ‘सॅमॅरस्काइट’ असं नाव दिलं गेलं होतं. त्यावरूनच पुढे या मूलद्रव्याला ‘सॅमॅरिअम’ असं नाव बहाल करण्यात आलं.

– मानसी राजाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org