ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर विल्यम क्रुक्स यांनी ‘थॅलिअम’ या मूलद्रव्याचा शोध लावला.  रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विज्ञानाच्या दोन्ही शाखांमध्ये आपल्या संशोधनाने त्यांनी मोलाची भर घातली. विल्यम क्रुक्स यांचा जन्म लंडनचा. शालेय शिक्षण संपवून विल्यम हे रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्री येथे कार्बनी रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी दाखल झाले. अभ्यास चालू असतानाच ते ऑगस्ट हॉफमन यांचे सहायक म्हणून काम करू लागले. लवकरच त्यांची गाठ मायकेल फॅरॅडेंशी पडली आणि ते प्रकाशकीय भौतिकी (optical physics) कडे वळले.

सन १८५०-१८६० या दशकात त्यांनी रॉयल कॉलेजमध्ये सहायक, रॅडक्लिफ वेधशाळेच्या हवामान विभागात अधीक्षक आणि नंतर चेशायर येथील महाविद्यालयात रसायनशास्त्राचे व्याख्याते म्हणून काम केले. १८६० मध्ये लंडन येथे त्यांनी स्वत:ची खासगी प्रयोगशाळा उभारली आणि पूर्णवेळ संशोधनास सुरुवात केली.

वर्णपट विश्लेषणाचा (spectral analysis) वापर करून सेलेनिअमच्या संयुगांतील घटकांचे प्रमाण ठरवण्याचे काम करत असता विल्यम यांना थॅलिअम या नव्या मूलद्रव्याचा शोध लागला व ते वेगळे करण्यात यशस्वी झाले. यानंतर थॅलिअमच्या गुणधर्माचा अभ्यास त्यांनी केला आणि या मूलद्रव्याचा अणुभारही त्यांनी निश्चित केला.

विरळ वायू भरलेल्या काचनलिकेतून जाणाऱ्या विद्युत प्रवाहावर संशोधन करत असताना,  नलिकेतील वायूचा दाब कमी केला असता एका विशिष्ट दाबानंतर कॅथोडमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात असे त्यांच्या लक्षात आले. हेच ते कॅथोड किरण! कॅथोड किरण सरळ रेषेत प्रवास करतात, ते काही विशिष्ट पदार्थावर आदळले असता उष्णता निर्माण होते आणि दीप्ती दिसून येते हे त्यांनी दाखवून दिले. निर्वात नलिका वापरून बनवलेली साधने (vacuum devices) आणि त्यांचे पुढील संशोधन यांची इथूनच सुरुवात झाली. प्लाझ्मावर संशोधन विल्यम यांनीच सुरू केले. आपल्या संशोधनाने रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील अनेक शोधांचा पायाच त्यांनी घातला. १०० टक्के अतिनील आणि  ९० टक्के अवरक्त (इन्फ्रारेड) किरणे रोखणारे चष्मे, प्रारण ऊर्जा मोजण्यासाठी ‘रेडिओमीटर’ हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय शोध.

विविध क्षेत्रांत विल्यम क्रुक्स यांनी संशोधन केले व शोधनिबंध प्रसिद्ध केले. रॉयल पदक, डेव्ही पदक, कोपले पदक, अ‍ॅल्बिर्ट पदक असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. ब्रिटिश सरकारने ‘नाइटहूड’ (उमरावपद) देऊन त्यांचा गौरव केला.

डॉ. सुभगा कार्लेकर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक

Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ग्रामविकासाची कहाणी