19 February 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : अभ्यास : स्वत:हून

ज्या पालकांची मुलं नुकतीच शिक्षणाला सुरुवात करताहेत, त्यांना अभ्यासाची गोडी लावणं तुलनेने सोपं जाईल.

(संग्रहित छायाचित्र)

 श्रुती पानसे

ज्या पालकांची मुलं नुकतीच शिक्षणाला सुरुवात करताहेत, त्यांना अभ्यासाची गोडी लावणं तुलनेने सोपं जाईल. मात्र, ज्यांची मुलं वरच्या वर्गात आहेत, ज्यांना पाठांतर करून परीक्षेत लिहिणं, स्वत:चा स्वत: अभ्यास न करता पालक आणि टय़ूशन्स यांच्यावर अवलंबून राहायची सवय लावलेली आहे, त्यांना ही सवय कमी करायला वेळ लागेल. यासाठी पालकांनी हळूहळू मदत कमी करायला हवी. पहिली-दुसरीच्या मुलांना कदाचित जास्त गरज लागेल. पण तिसरीच्या पुढे ही गरज कमी व्हावी. क्लास/ टय़ूशनचीही गरज लागू नये; तेही दहावीपर्यंत. आणि अर्थातच त्याच्याही पुढे.

मुलांनी स्वत:हून अभ्यास करावा यासाठी अशा काही गोष्टी करणं आवश्यक आहे :

(१) त्यांचं बोलणं ऐकणं – मनात आलेले विचार बोलले गेले, की विचारांना स्पष्टता येते. त्यामुळे मुलांना बोलू द्यायला हवं. त्यांचे विचार लक्षपूर्वक ऐकायला हवेत.

(२) शैक्षणिक साधनं – शास्त्रीय आधारावर निर्माण केलेल्या शैक्षणिक साधनांचा वापर मुलांसाठी अवश्य करावा. या साधनांचा वापर शाळेतच नाही तर घरीही करता येतो.

(३) अभ्यास सहली – शालेय सहली या अभ्यास सहलीच असाव्यात. इतिहास- भूगोल-विज्ञान या विषयांशी संबंधित ठिकाणं सहलींसाठी निवडावीत. कौटुंबिक सहलींसाठीदेखील प्रत्येक निसर्गरम्य, मौजमजेचं ठिकाण हे अभ्यासाचं असतं, ही दृष्टी पालकांनी ठेवली तर मुलांनाही ‘कुठे गेल्यावर काय बघायचं, आणि त्यातून कोणती माहिती मिळवायची’ याचं ज्ञान मिळेल.

(४) प्रकल्प – शाळेकडून प्रकल्पासाठी विषय मिळतात, ही एक मोठीच संधी आहे, असा दृष्टिकोन निर्माण करायला हवा. अनेक पालक प्रकल्पांबद्दल नकारात्मक बोलतात, काही पालक तर स्वत:च प्रकल्प करून देतात. असं न करता मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं. प्रकल्पाद्वारा शिकलेली तंत्रं कायमस्वरूपी उपयोगी पडणार आहेत.

(५) खेळ – मुक्त हालचाली करणं, खेळणं हा तर बालपणाचा गाभाच. विविध विषयांशी संबंधित खेळ अनेक शिक्षक तयार करत असतात. खेळ हे शिक्षणाचं खूपच चांगलं साधन आहे.

(६) गप्पा – इतरांशी गप्पा मारून, त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांशी गप्पा मारूनदेखील बरीचशी माहिती मिळवता येते. अशा व्यक्तींना प्रश्न विचारणं, उत्तरं ऐकून घेऊन शंका विचारणं, ते लक्षात ठेवून ताडून बघणं हाही अभ्यासच आहे.

contact@shrutipanse.com

First Published on August 30, 2019 12:10 am

Web Title: study by yourself brain abn 97
Next Stories
1 कुतूहल : प्रतिजैविकांचे युग
2 कुतूहल : जीवनसत्त्वांचा शोध
3 मेंदूशी मैत्री : स्वयंअध्ययन
Just Now!
X