निळसर राखाडी रंगाचा टँटलम उष्णता आणि विद्युतसुवाहक आहे. टँटॅलमचा एक खास स्वभाव म्हणजे कुठल्याही द्रावणाचा भले आम्ल असो की शरीरातील रक्त किंवा अन्य द्रव, त्याला हा धातू अजिबात दाद देत नाही. शरीरात कुठेही म्हणजे दातात भरण्यापासून, हृदयाचा पेसमेकर किंवा कृत्रिम गुढघा असो, सर्जिकल इम्प्लांट्स (आरोपण) असो शरीर, टँटॅलम हा धातू अगदी सहज स्वीकारतो. याच गुणधर्मामुळे हाडवैद्यांना हा धातू आरोपणासाठी वापरणे खूप सोयीचा ठरत आहे.

कोणत्याही आम्लाचा परिणाम होत नसल्याने रासायनिक अभिक्रियेसाठीच्या काही उपकरणांमध्ये, पाइपमध्ये टँटॅलमचा वापर होतो, पण यालाही अपवाद आहे. हायड्रोफ्लोरिक आम्ल, उष्ण सल्फ्युरिक आम्ल आणि उष्ण अल्कलींचा मात्र टँटॅलमवर परिणाम होतो.

३०१७ अंश सेल्सिअस इतका उच्च वितळणांक आणि गंजरोधक असल्याने टँटॅलमचा वापर निर्वातभट्टी (vacuum furnace) मध्ये केला जातो.

टँटॅलमचे महत्त्व आज फार वाढले आहे, कारण प्रत्येक मोबाइल फोनमध्ये सुमारे ४० मिलिग्रॅम टँटॅलम असते. टँटॅलम हे कॅपॅसिटर्समध्ये फारच प्रमाणात वापरले जाते त्याचे कारण त्याची प्रचंड संधारण क्षमता.

टँटॅलमच्या या गुणधर्मामुळे कमीत कमी आकारात भरपूर शक्ती साठवता येते, त्यामुळे याचे महत्त्व वाढले आहे, कारण कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा आकार छोटा करणे हे टँटॅलममुळे सहज शक्य होत आहे. रेझिस्टर्स व कॅपॅसिटर्सच्या रूपात टँटॅलम आता सेल फोन, डीव्हीडी (DVD)  प्लेअर, लॅपटॉप्स, हार्ड ड्राइव्ह्ज, प्ले स्टेशन्स अशा उपकरणांमध्ये उपयोगात आणले जात आहे. लवकरच त्याचा तुटवडा भासून रिसायकल (पुनर्वापर) करण्याची अत्यंत गरज निर्माण होणार आहे. त्याच्या निष्क्रियता (इनर्टनेस), काठिण्य, गंजरोधक व उच्च उत्कलन बिंदूमुळे प्रयोगशाळांमध्ये, विमानाच्या भागांमध्ये, शस्त्रास्त्रांमध्ये व खास उपकरणे बनवताना टँटॅलमचा वापर होतो. असे हे टँटॅलम आपल्या रोजच्या जीवनात खरोखरच अढळपद मिळवून बसले आहे.

टँटॅलम अतिशय कठीण धातू असल्याने इतर धातूंबरोबर उत्तम व कठीण असे संमिश्र बनविण्यासाठी उपयोगात आणला जातो. टँटॅलमच्या संमिश्राच्या उच्च वितळण बिंदूमुळे, त्यांचा उपयोग विमाने, क्षेपणास्त्रे किंवा अणुभट्टीच्या भागांकरिता केला जातो.

– डॉ. कविता रेगे

मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ , office@mavipamumbai.org