News Flash

थुलिअम : दुर्मीळातील दुर्मीळ

थुलिअमच्या गोष्टीत वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाची, तपस्येची गाथा आहे.

थुलिअमच्या गोष्टीत वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाची, तपस्येची गाथा आहे. अर्बिअम ऑक्साइड म्हणजेच अर्बियावर अभ्यास करताना, त्यात लपलेले थूलिया म्हणजेच थुलिअम ऑक्साइड सापडले. लॅन्थनाइड कुटुंबाचा इतिहास व अभ्यास म्हणजे शास्त्रज्ञांचे ध्यास पर्वच म्हणावे लागेल. मुळात पृथ्वीच्या कवचात कमी प्रमाणात असणारे मोनाझाइट, गॅडोलीनाइट, झिनोटाइम, युक्झेनाइटसारख्या खनिजातील अनेक मूलद्रव्ये ओळखणे, वेगळे करणे हेच कठीण. त्यात १५ सदस्यांचे लॅन्थनाइड कुटुंबाला आवर्तसारणीत अचूक स्थान देणे याला मानवाची विलक्षण बुद्धी आवश्यक आहेच; परंतु त्याहूनही अधिक म्हणजे जिद्द व अपार वाट बघण्याची क्षमता. थुलिअमच्या शोधातसुद्धा ती अधोरेखित होते. एक पीपीएमपेक्षा कमी विपुलतेत सापडणारा थूलिया म्हणजेच थुलिअम ऑक्साइड, पेर थिओडोर क्लेव्ह याने १८७९ मध्ये अर्बयिावर अभ्यास करताना शोधला. स्कँडिनेवियातील थूल प्रांतावरून थुलिअम हे नाव दिले.

अर्बयिात सापडलेला थूलिया शुद्ध अवस्थेत मिळविण्यासाठी अचंबित करणाऱ्या एखाद दोन अथवा दोनेकशे नव्हे, तर १५ हजार शुद्धीकरण प्रक्रिया केल्या. पुढे थूलियापासून १९११ साली चार्ल्स जेम्स याने थुलिअम मिळविला.

अणुक्रमांक ६९ असणाऱ्या थुलिअमची – अणुभार १४५ ते १७९ च्या दरम्यान असणारी – तीसहून अधिक समस्थानिके सापडतात. शुद्ध थुलिअम धातू चंदेरी चमकणारा असतो. मऊ तर इतका की सुरीनेही कापता येतो. इतर लॅन्थनाइड मूलद्रव्यांप्रमाणेच ळे3+ आयनिक अवस्थेत थुलिअमची संयुगे असतात. सर्वसाधारण लॅन्थनाइडप्रमाणे थुलिअमचे गुणधर्म जरी असले तरी काही ठळक वैशिष्टय़े ही थुलिअमची खासियत आहे. जसे की, थुलिअमची अपरूपे ज्यांचा उल्लेख अन्य लॅन्थनाइडबाबत फारसा होत नाही. अपरूपे म्हणजेच एका मूलद्रव्याचे अनेक स्वरूपात असणे. अशी अपरूपे आपल्याला कार्बन, सल्फर, फॉस्फरस अशा मूलद्रव्यांमध्ये सापडतात.

थुलिअममध्ये टेट्रागोनल अल्फा थुलिअम व हेक्झागोनल असे बिटा थुलिअम ही अपरूपे आढळतात. या धातूची उपयुक्तता इतर लॅन्थनाइड धातूंबरोबर मिश्रधातू मिळविण्यासाठी होते. यीट्रीअम अ‍ॅल्युमिनम गारनेट (अ‍ॅ) लेझर्समध्ये थुलिअम वापरले जाते.

– रवींद्र देशमुख

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 12:22 am

Web Title: thulium chemical element
Next Stories
1 अर्बिअम
2 संस्कृत पंडित डॉ. विल्सन (२)
3 पेर थिओडोर क्लेव्ह
Just Now!
X