News Flash

टंगस्टनसारखा कोणी नाही..!

टंगस्टन. पांढऱ्या करडय़ा रंगाचं एक धातुरूप मूलद्रव्य.

टंगस्टन. पांढऱ्या करडय़ा रंगाचं एक धातुरूप मूलद्रव्य. कोणत्याही धातूपेक्षा त्याचा वितलनांक जास्त आहे, हे त्याचं प्रमुख वैशिष्टय़. जास्त म्हणजे किती? तर ३४०० अंश सेल्सिअस. आणि वितळलेलं टंगस्टन सूर्याच्या जवळसुद्धा टिकेल कारण त्याचा उत्कलनांक ५५०० अंश सेल्सिअस आहे. आपला विजेचा दिवा, त्यात तंतूसारखी असणारी तार टंगस्टनची असते, हे तर तुम्हाला माहीत आहेच. टंगस्टन विजेच्या दिव्यात वापरतात, ते त्याच्या उच्च वितलन बिंदूमुळेच. ज्वालाविरोधी द्रव्यं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, एक्स रे उपकरणं, उच्च तापमानाच्या भट्टय़ा, वेल्डिंगचे इलेक्ट्रोड्स, इतकंच नव्हे तर रॉकेटच्या किंवा क्षेपणास्त्रांच्या काही भागातून अत्युष्ण जळालेले इंधन वायू बाहेर पडतात, तेथील भाग तयार करण्यासाठी टंगस्टन विविध रूपांत वापरतात. थोडक्यात सांगायचं तर जिथं-जिथं अतिशय उच्च तापमानाला तोंड द्यावयाचं असेल त्यावेळी टंगस्टनचा वापर स्वाभाविक आहे.

टंगस्टनचा वितलनबिंदू खूप जास्त आहेच, पण शुद्ध स्थितीत त्याची ताणशक्तीही अत्युच्च आहे. दर चौरस सेंटिमीटरला ४० टन!  उत्तम प्रतीच्या पोलादापेक्षा ही ताकद कितीतरी जास्त आहे. अगदी ८०० अंश सेल्सिअस तापमानालादेखील ही ताकद टिकून राहाते.

या धातूचा अजून एक गुणधर्म म्हणजे तन्यता. या क्षेत्रातही टंगस्टन मागे नाही. फक्त २५० ग्रॅम टंगस्टनची अगदी बारीक अशी तार काढायची ठरवली तर तिची लांबी शंभर किलोमीटर भरेल.

जडपणाच्या बाबतीतही टंगस्टन मागे नाही. त्याची घनता २० अंश सेल्सिअसला १९.३ ग्रॅम प्रति घनसेंमी इतकी आहे. म्हणजे जवळपास सोन्याइतकी. काहीवेळा घनतेच्या दृष्टीने सोन्याऐवजी टंगस्टन वापरलं जातं. दागदागिने बनवतानाही टंगस्टनचा वापर केला जातो.

१७ व्या शतकापासून चिनीमातीच्या वस्तू रंगवण्याची कला चालत आलेली आहे. त्यांचं रंगसौंदर्य प्रसिद्ध आहे. पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या, जांभळ्या, हिरव्या रंगांचे असलेले ते नाजूक रंग टंगस्टनयुक्त रंग आहेत. टंगस्टनमुळेच त्यांना चमक आली आहे. सापेक्षत: टंगस्टन निष्क्रिय आहे. त्यावर सामान्य आम्ले, अल्कली किंवा आम्लराज यांचा परिणाम होत नाही. या गुणधर्माचा उपयोग विविध उद्योगांमध्ये केला जातो.  टंगस्टन सर्वात जास्त वापरलं जातं ते पोलादाबरोबर मिसळण्यासाठी.

– चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 2:22 am

Web Title: tungsten chemical element
Next Stories
1 कुतूहल : भक्षक लांडगा आणि जड दगड
2 जे आले ते रमले..: लँबटनचे कष्टसाध्य सर्वेक्षण (२)
3 कुतूहल : टँटॅलम आरोपण
Just Now!
X