मुळात, पेट्रोल रंगहीन असते व पाण्यासारखे दिसते. पण अन्य पेट्रोलियम पदार्थापासून त्याची सहज ओळख पटावी म्हणून त्यात नारिंगी रंग मिसळला जातो. उच्च ज्वलनक्षमतेच्या पेट्रोलला लाल रंग दिला जातो, तर लष्करात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट पेट्रोलला निळा रंग असतो. त्यात असलेली हायड्रोकार्बन रसायने ३०० से. ते २१०० से. या तापमानाच्या दरम्यान उकळतात. त्यातील विविध हायड्रोकार्बन संयुगांचे प्रमाण संतुलित केलेले असते व त्यामुळे विशिष्ट तापमानाला त्याचा ठरावीक अंश उकळून त्याचे बाष्पात रूपांतर होते. पेट्रोलचे हे उत्कलन त्याच्या गाडय़ातील इंजिनाच्या कार्याशी निगडित असते. या इंधनाची घनता ७२० ते ७७५ कि.ग्रॅम प्रति लिटर असायला हवी. तसेच त्यातील सेंद्रिय रसायने, असंपृक्त असेंद्रिय रसायने व बेंझिन या रसायनांच्या प्रमाणावर देखील आवर घालून ठेवावा लागतो. गाडय़ांच्या इंजिनातली पेट्रोलची ज्वलनक्षमता ऑक्टेन क्रमांकाने मोजली जाते. सध्या आपल्याकडे ९१ आणि ९७ या ऑक्टेन क्रमांकाची पेट्रोल इंधने विक्रीस उपलब्ध असतात व जितका ऑक्टेन क्रमांक जास्त तितके ते जास्त खर्चिक असते. पेट्रोल हे स्फोटक इंधन असून, ते इंजिनात जळत असताना धड.. धड.. आवाज येतो व त्याला ‘नॉकिंग’ असे म्हणतात. या धडधडण्यावर आवर घालण्यासाठी पूर्वी त्यात टेट्राथाइल लेड नावाचे संयुग मिसळीत; परंतु इंजिनाच्या धुराडय़ातून बाहेर पडणारी शिशाची संयुगे वातावरण प्रदूषित करू लागली, तेव्हा त्या संयुगाचे उच्चाटन करून बिनशिशाचे (अनलेडेड) पेट्रोल बाजारात आले. अलीकडे, त्यात एकतर मिथाइल टश्र्चर्रा बुटाइल इथर (एम.टी.बी.ई.)सारखी सेंद्रिय रसायने मिसळतात किंवा पेट्रोलची निर्मिती करताना त्यातील चक्रीय शृंखलायुक्त हायड्रोकार्बन रसायनाचा अंश वाढवितात. ही सारी अँटी-नॉकिंग रसायने इंधन जळत असताना ऑक्टेन- बूस्टर म्हणून काम बजावतात व वाहनाचे कार्य हळुवार करण्यास हातभार लावतात. या इंधनात भेसळ झाल्यास त्याच्या कार्याचे संतुलन बिघडते आणि गाडीच्या इंजिनाच्या नासधुशीसोबतच वातावरणातील हवेचे प्रदूषणदेखील वाढते.
 जोसेफ तुस्कानो (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा -इथे करुणा शिल्परूप झालीय
भाषा अपरिचित आणि संस्कृती त्याहून; अशा देशाच्या राजधानीत अचानक चिरपरिचित आणि काळजाला स्पर्श करणारं आढळलं आणि राष्ट्र, वेश, जगण्याच्या चालीरीती यांना भेदून उरणारी मानव्यता मनात भरून आली.
आपण सगळी माणसं असतो. प्रेम, राग, आशा-निराशा, बंधुभाव या सर्व भावना सगळ्यांच्या सारख्याच असतात. एकमेकाला धरून राहण्याची, आधार देण्याची उमंग ही प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्तिसमूहात अस्तित्वात असते.
भिन्न भाषा म्हणजे भावना आणि विचारांना दिलेली शब्दरूपं, ती रूपं वेगवेगळी असली तरी मनातल्या भावना व गरजा सगळ्यांच्या समान असतात.
मोठमोठय़ा शब्दांचे ‘फंडे’ मारीत नाहीये. मित्रा, सेऊल (सोल) या दक्षिण कोरियाच्या राजधानीतील ‘वॉर मेमोरिअल’समोर उभं असताना या जाणिवांचा उमाळा प्रत्यक्ष अनुभवलाय, तोच इथं मांडतोय.
तसं काय, प्रत्येक राष्ट्राचे सीमेलगतच्या किंवा दूरच्या देशाशी भांडणतंटे असतात. या इतिहासाचा दस्तावेज प्रत्येक देश आपापल्या गुंतलेल्या हितसंबंधांप्रमाणे आलेखित करतो. त्याच्या अभ्यासावरून त्या देशाची राजकीय भूमिका आणि महत्त्वाकांक्षेची ओळख होते.
पण खरा इतिहास घडतो तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांच्या घरात. त्याचं वाचन करण्यासाठी माणसांच्या डोळ्यांत पाहावं लागतं. लोकांनी लिहिलेलं ललित साहित्य वाचावं लागतं. त्यांनी चितारलेली चित्रं, उभारलेली शिल्पं पाहावी लागतात. अशा कलाविष्कारातून त्या जनतेच्या सुख-दु:खांचा अंदाज येतो.
‘सेऊल’ या शहरात फिरताना त्या लोकांशी भावनिक वेव्हलेंग्थ जुळत नव्हती, पण सेऊलच्या हृदयात मांडलेल्या वॉरमेमोरिअलपाशी येऊन थांबलो की हे आधुनिक चकचकीत संदर्भ गळून पडतात. दक्षिण आणि उत्तर कोरिआ यांचं विभाजन, त्याआधीची कोरिअन वॉर. चीन व अमेरिकेची दंडेली हा इतिहास ओळखीचा होता; परंतु त्या विभाजनानं उद्भवलेल्या दु:खाचं शिल्परूप तिथं समोर उभं ठाकतं. दोन कोरिअन बंधू एकमेकांच्या नजरमिठीत इथं कैद झालेले दिसतात. कोसळणाऱ्या धाकटय़ा भावाला (उत्तर कोरिआचा प्रतिनिधी) धट्टाकट्टा दक्षिण कोरिअन बंधू सावरतोय अशी सूचक देहबोली.
कदाचित युद्धभूमीवर समोरासमोर शत्रू म्हणून उभं ठाकल्यानंतर एका क्षणी ‘वैरभाव सोडून आपण बंधुभावानं एकत्र येऊ,’ असं म्हणत ते एकमेकांना मिठी मारताहेत, असं वाटतं. दोन शत्रू राष्ट्रांचे सैनिक म्हणून परस्परांशी झुंजणारी प्यादी न होता. माणुसकीतून एकमेकांच्या जवळ येऊ. ‘अरे तुझ्या नि माझ्या धमन्यांतून वाहणारं रक्त या काळ्या मातीतून जन्माला आलंय,’ असं म्हणताहेत. या जाणिवेचा तो साक्षात्कारी क्षण शिल्पबद्ध झालंय, असं वाटतं. प्रेम, करुणा हेच खरं ईश्वराचं स्वरूप.
यातली कोणतीच भावना आणि अनुभूती तर परकी वाटली नाही. विद्रोहातून न विझणारी वेदना हा तर माझ्या मातीला मिळालेला शाप आहे. माझ्या देशातही असंच शिल्प उभारता येऊ शकतं!
थक्क होऊन पाहता-पाहता ते शिल्प अस्पष्ट दिसू लागलं. पाणावलेल्या डोळ्यांनी कसं दिसणार? सांग ना मित्रा!
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व -ब्राह्मणीधर्म हा व्यक्तिनिष्ठ धर्म नव्हे
राजारामशास्री भागवत धर्माचे अतिशय चिकित्सक अभ्यासक होते, त्यांची धर्म चिकित्सा मूलगामी होती. त्याचा हा एक नमुना –  ‘‘भूपृष्टावर आज जे धर्म विराजमान आहेत, ते प्राय: व्यक्तिनिष्ठ धर्म होत. ख्रिस्ती, महंमदी वगरे धर्म व्यक्तिनिष्ठ होत. ख्रिस्त नावाचा एक पुरुष झाला व महंमद नावाचाही एक पुरुष होऊन गेला. ख्रिस्त नावाच्या व्यक्तिविशेषाने जो धर्म स्थापला, तो ख्रिस्ती धर्म. बौध्ह व जैन हे धर्म व्यक्तिनिष्ठ होत. मोशे नावाचा एक पुरुष आला, त्याने जो धर्म स्थापला, तो यहुदी धर्म. जरत्स्तोत्र नावाच्या पुरुषाने जो धर्म स्थापला, तो पारशांचा धर्म. ख्रिस्तस मानल्याशिवाय स्वर्ग नाही, हे क्रिस्त्यांचे म्हणणे. महंमदास पगंबर समजणार नाही, तो नरकी जाईल, हे अिवध्रचे म्हणणे. बौद्धांचा, जैनांचा, यहुद्यंचा व पारशांचाही सिध्दांत असाच. त्या त्या व्यक्तींवर व त्या त्या व्यक्तींच्या वचनावर विश्वास ठेविला नाही तर स्वर्गसुख नाही, हा अशेष व्यक्तिनिष्ठ धर्माचा सिद्धांत होय. रूमी लोकांचा व यवन (ग्रीक ) लोकांचा हेही धर्म व्यक्तिनिष्ठ नव्हते. हे सर्व धर्म जातिनिष्ठ होते. ब्राह्मणी धर्म हा मूळचा, ब्रह्म नावाचे जे लोक ब्रह्मावर्तातील होते त्यांचा धर्म होता. पुष्कळ काळ लोटल्यावर जाती एकान्तिक होऊन बसल्या, तेव्हा ब्राह्मण नावाची विशिष्ट जात उत्पन्न झाली, व त्यामुळे धर्माचा जातिनिष्ठपणा विगलित होऊन जातिविशिष्टनिष्ठपणा त्यास आला. हा जातिविशिष्टनिष्ठपणा पूर्वीच्या मिस्र देशातील धर्मात मात्र होता. मिस्र देशातील लोकांमध्ये पूर्वीच्या काली पुजारी, शिपाई, पशुपाळ, डुकरपाळ, व्यापारी, दुभाषी व नावाडी अशा सात जाती असून, पुजाऱ्यांच्या जातीच्या हाती धर्माची सर्व कळ असे, व ब्राह्मणी धर्मातल्या यव्हांच्या जातींप्रमाणेच या जाती जरी अगदी पूर्वी एकांतिक नव्हत्या, तरी शेकडो वर्षांनी पुढे एकांतिक होऊन पडल्या होत्या.’’ ही माहिती सांगून राजारामशास्त्री भागवत निक्षून सांगतात,
‘‘ या पूर्वीच्या मिस्री धर्मास सोडून ब्राह्मणी धर्मासारखा दुसरा जातिविशिष्ठनिष्ठ धर्म या भूमंडळावर ऐकिवात किंवा वाचण्यात नाही.’’